गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणे केशोरी अंतर्गत काही अट्टल गुन्हेगारांवर अवैध दारू विक्री,भांडण तंटा,विनयभंग संबंधाने अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याचे विरुद्ध वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा त्यांच्या वर्तणुकीत काहीच सुधारणा झालेली नाही त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी त्यांची तडीपारी प्रस्तावित करण्यात आली होती.
या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमुळे परीसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने त्याचे विरूद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक,सोमनाथ कदम पोलीस ठाणे केशोरी यांनी सराईत गुन्हेगार १) गणेश मुखरू कांबळे रा.प्रतापगड, २) महेश मिश्रीलाल राठी रा.गोठनगाव, ३) धनंजय संतोष राठी रा. गोठनगाव, ४) जितेंद्र तुळशीराम गजभिये रा. गोठनगाव, ५) सिंधू जितेंद्र गजभिये रा. गोठनगाव, या पाचही आरोपींना गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार ( तडीपार ) करण्यासाठी कलम ५६ (अ),(ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये प्रस्ताव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अर्जुनी (मोर) यांचे कडे मंजुरीस्तव सादर केला होता.
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी,अर्जुनी मोर यांचे आदेशानुसार संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांनी विहीत मुदतीत सदर हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून सदर गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसम यांना गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती. या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी,अर्जुनी (मोर) वरूनकुमार जनार्दन सहारे यांनी सर्व पाचही जणांना एक महिन्याच्या कालावधी करीता गोंदिया जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात येत असल्याबाबतचे आदेश दिले आहेत.या आदेशामुळे परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
गोंदिया जिल्हा पोलीस व उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अर्जुनी (मोर) यांनी केलेल्या हद्दपारीच्या कारवाईमुळे अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून केशोरी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी केलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक,निखिल पिंगळे,अपर पोलिस अधीक्षक, अशोक बनकर यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली आहे.


0 टिप्पण्या