अकोला जि.प.च्या वादग्रस्त १५५ पैकी आज पुन्हा ४० एकर जमिनीचा १२ लाखांत उभ्या पिकासह लिलाव...



    अकोला जिल्हा परिषदेच्या मालकीच्या बाळापूर तालुक्यातील हाता येथील विद्या मंदिर फार्म या नावाने ओळखल्या जात असलेल्या, गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या जमिनीचा पुनश्च लिलाव करण्याची जाहिरात प्रसिद्ध करून आज हाता याठिकाणी लिलाव आयोजित करण्यात आला असता १५५ एकर पैकी फक्त ४० एकर जमिनीचा उभ्या पिकासह १२ लाख ३० हजार ५०२ रुपयांत लिलाव करण्यात आला आहे.उर्वरित ११५ एकर जमिनीला कुणीच बोली लावली नाही,तर या शेतात काहीही पेरलेले नाही.


        या शेतीच्या याआधीच्या  लिलावात झालेल्या अनियमितता व बनवाबनवी "विद्रोही मराठा"ने जिल्ह्यातील जनतेच्या निदर्शनास आणून दिल्यावर १५५ एकर जमीन केवळ तीन लाख सत्तर हजार रुपयांत एक वर्षासाठी अगदी क्षुल्लक रकमेत अंजली मायदेव (आंबेडकर) यांनी घेतल्याचे उघड झाल्याने त्यानंतर त्यांनी स्वतःहून हे शेत वाहितीचे अधिकार सोडत असल्याचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला दिले होते.हे अधिकार सोडत असतानाच त्यांनी भरलेले ३,७०,००० रुपये व शेत वाहितीसाठी तथा पेरणीसाठी करण्यात आलेल्या कोणत्याही खर्चाची मागणी जि.प.ला केली नव्हती हे विशेष,त्यांनी मागणी केली असती तरी प्रशासन त्यांना ही रक्कम परत देण्यास बांधील नव्हते.


   बाळापूर तालुक्यातील हाता येथील विद्या मंदिर फार्म या १५५ एकर शेत जमिनीचा उभ्या पिकांसह आज सोमवार दि.१६ ला सकाळी ११ वाजता जि.प शाळा हाता येथे लिलाव आयोजित करण्यात आला होता. याबाबत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शुक्रवार दि.१३ रोजी इच्छुक नागरिकांच्या माहिती साठी मातृभूमी या वृत्तपत्रात जाहीर सूचना देखील प्रसिध्द करण्यात आली होती.

     या विद्यामंदिर फार्मच्या गट क्र.५६७ मध्ये ४० एकर शेतीत सदर शेतीच्या आधीच्या लिजधारक अंजली मायदेव यांनी सोयाबीन पीक पेरलेले आहे.त्यामुळे आगामी रब्बी हंगामासह १९ ऑक्टोबर ते ३१ मार्च २०२४ पर्यंत ही जमीन भाडे पट्ट्यावर देण्यात येणार होती. याची लिलावाची सरकारी किंमत १८ लाख एवढी ठेवण्यात आली होती.४० एकर शेतजमिनी मध्ये पीक उभे असल्याने त्याची किंमत आणखी वाढणार असल्याचा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज होता.तर पेरणी केलेल्या शेत जमिनीचे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून मूल्यांकन आधीच काढण्यात आले होते.


      अकोला जि.प.च्या कृषी विभागाकडून २०२३-२४ या वर्षा साठी दोन तीन वेळा लिलाव करण्यात आला.मात्र दोन पहिल्या लिलावात एकही शेतकरी सहभागी झाला नसल्याने तीसऱ्यांदा झालेल्या लिलावात सरकारी किंमतीपेक्षा निम्मा भाव आल्याने हा विषय मंजुरीसाठी जिल्हा परिषदेच्या २३ जून २०२३ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला परंतु कमी दर आल्याने चौथ्यांदा लिलाव करण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी सभेने मंजुरी देऊन जि.प अध्यक्षांना ह्या शेतीच्या बाबतीत विशेषाधिकार देण्यात आले होते.मात्र त्या प्रक्रियेत विरोधी पक्षाच्या सदस्यांना विश्वासात घेऊन ही प्रक्रिया पार पाडण्यात यावे हे देखील ठरले होते. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संगीता नंदकिशोर अढावू यांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून तीन लाख सत्तर हजार रुपये म्हणजेच अत्यंत कमी रकमेत लिफाफा पद्धतीने प्रस्ताव मागवून जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्षाच्या कुटुंबातील सदस्य यांना ही शेती एक वर्षासाठी वाहितीसाठी देऊन जि.प.चे फार मोठे नुकसान केले होते.


   मात्र या लिलावावर आक्षेप घेण्यात आल्याने तशी तक्रार विभागीय महसूल आयुक्त यांच्याकडे दाखल करण्यात आली होती.त्यावर विभागीय आयुक्तांनी जि.प.सीईओ व जि.प.अध्यक्ष यांना या प्रक्रियेबाबत स्वयं स्पष्ट अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.याबाबत "विद्रोही मराठा"ने वेळोवेळी सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडून जिल्हा परिषदेच्या १५५ एकर शेतीच्या लीज प्रकरणांत करण्यात आलेले "गौडबंगाल" उघड केले होते.त्यानंतर भाडेपट्ट्यावर एक वर्षा साठी कराराने शेती घेतलेल्या लिजधारक अंजली मायदेव (आंबेडकर) यांनी या शेतीवरील उभ्या पिकासह वाहितीसाठी भरणा केलेल्या रकमेवरील ही दावा सोडला होता.


    आज सोमवार दि.१६/१०/२०२३ रोजी गट क्र.५६७ या ४० एकर शेत जमिनीसाठी हाता येथीलच संजय भगवान खाडे यांनी १२ लाख ३०हजार ५०२ रुपयांची बोली बोलून ती मान्य करण्यात आल्याने अकोला जिल्हा परिषदचे अध्यक्षा यांनी जाणीवपूर्वक केलेले नुकसान भरून निघालेले असून उर्वरित जमिनीसाठी देखील येत्या काही दिवसांत पुन्हा करण्यात येणाऱ्या लिलावाची प्रक्रिया पार पाडल्यावर अनपेक्षित असा लाभ होणार हे मात्र नक्की.

   आज झालेल्या लिलावाची माहिती जिल्हा परिषदच्या कृषी विभागा कडून विभागीय आयुक्त निधी पांडे यांना सादर करण्यात आल्यावर त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या अपील प्रकरणांत या लिलाव प्रक्रियेचा नक्कीच फरक पडणार असून आता त्या नेमका काय आदेश पारित करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या