गुलाबराव गावंडे हे नाव केवळ अकोला जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण विदर्भातील प्रसिद्ध आहे. विशेषतः ग्रामीण भागात 'भाऊ' या नावाने सर्वांचं आपुलकीचं, हक्काचं आणि आदराचं व्यक्तिमत्त्व. साधी राहणी आणि नेक करणी. अडल्या नडल्यांचा हा हक्काचा आश्रम. गावखेड्यात तर भाऊ म्हणजे आजही एक जबरदस्त दरारा.वाघासारखे जीवन जगणाऱ्या गुलाबरावांनी अनेक राजकीय, सामाजिक चढउतार बघितलेत. परंतू हा वाघ कधी डगमगला नाही आणि कधी रणछोडदासही बनला नाही..आणि हेच गुण उतरले आहेत या वाघाच्या छाव्यात, होय संग्राम गुलाबराव गावंडे.. गुलाबरावांचा ज्येष्ठ चिरंजीव, राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यातील सर्वात तरुण तडफदार जिल्हाध्यक्ष.आज या छाव्याचा वाढदिवस.जेव्हा भाऊंची राजकीय कारकीर्द प्रचंड गाजत होती तेव्हा सुरुवातीला गुलाबरावांचा हा छावा शांत बसून राजकीय जंगलाचा अदमास घेत होता. हळूहळू परिस्थिती बदलत गेली आणि अखेर या छाव्याने डरकाळी फोडत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.
वाघाचा हा छावा केवळ डरकाळी फोडतो, त्याला शिकार करणे जमणार नाही. बापाच्या पुण्याईवर मुलं मोठी होत नसतात. त्याला जरा जास्तच ऍटीट्यूड आहे, अशी नानाप्रकारची चर्चा त्याच्या बाबतीत झाली. नवतरूण उमदे आशावादी नेतृत्व कुठल्याही प्रस्थापित नेत्यांना नकोच असतं.तसेच जिल्ह्यात घडत गेले. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रस्थपितांनी जसा जमेल तसा रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. काही अपवाद वगळता स्वपक्षातील नेत्यांनी देखील या छाव्यावर जाळं टाकून त्याला अडचणीत आणण्याचे मनसुबे रचलेत. विधानसभेच्या गत निवडणुकीत बाळापुर मतदारसंघात त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. छावा राजकीयदृष्टया घायाळ जरी झाला तरी हार मानेल तो हा वाघाचा बछडा नव्हे.त्याने पुन्हा चार पावलं मागे जात शिकारीवर तुटून पडायचा निर्धार केला आणि पुन्हा नव्याने कामाला लागला. थेट भल्याभल्याना मागे टाकत एका सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद मिळविले.. अलीकडे राजकारणाचं व्यावसायिकरण होत चाललं असून, सामाजिक जाणिवांचा अभाव दिसू लागला आहे. अशातही संग्राम गावंडे यांनी आपल्या वडिलांनी घालून दिलेला समाजसेवेचा शिरस्ता कायम ठेवला आहे. जिल्ह्यातील जनता संग्रामकडे आता संग्रामभैय्या म्हणून आदराने, आशेने बघत आहे. शांत, संयमी राजबिंडे व्यक्तिमत्त्व असलेल्या संग्रामकडे बघताना सुरुवातीला लोकांना जरा अडखळल्यासारखे होते, मात्र, जसजसे लोक जवळ येऊ लागतात तेव्हा या छाव्यामधील आपुलकी, स्नेहाची आणि कुणासाठी काही तरी करून दाखविण्याची भावना झळकू लागते. आता तर या रांगड्या गड्याने सुरुवात केलीय. अजूनही खूप शिखरे गाठायची आहेत. जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील एक उत्तम नेतृत्व म्हणून जनता संग्राम कडून अपेक्षा बाळगून आहे. "अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन,. आगे तो नापने के लिए सारा आसमान बाकी है"
लोकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या या हाडाच्या कार्यकर्त्याला कुठलाही दिखावा नाही. बडेजाव जमत नाही. समाजकारणातून राजकारणात आलेल्या या रांगड्या गड्याला अस्सल राजकीय बाज असलेल्या कार्यकर्त्याला सामाजिक कार्य करत त्यांनी लोकांच्या समस्या स्वतःच्या समजून लावून धरण्यात रस आहे. त्या मार्गी लावल्याशिवाय समाधान मिळत नाही. आक्रमक वृत्ती, सडेतोड बाणा आणि बेधडकपणे काम करण्याची सवय, त्यांना नडते. शिवसेनेतुन विद्यार्थी सेनेचे प्रमुख म्हणून सुरुवात झाली ती खूप लांबपर्यंत सुरूच राहील, अशी चाल टाकणे सुरू आहे. त्याचे वाढते वर्चस्व अनेकांना खुपायला लागले. काडीबाजांचे आणि चापलूसगिरीचे राजकारण सुरूच आहे. लोकांची कामं निरपेक्षपणे करताना कोंडमारा झाला तरी थांबायचं नाही, आमदारकी हुलकावणी देऊन गेली. मात्र विधानसभा गाठयचीच. अशीच वाटचाल सुरू आहे. मात्र, मोठ्या मनाच्या धडपड्या माणसाला शांत बसवत नाही. जी हुजुरी जमत नाही. मग शिवसेनेत डरकाळ्या फोडणाऱ्या या छाव्याने थेट राष्ट्रवादीत उडी घेतली. समाजसेवा हीच अंतिम मानत रुग्णसेवा, रक्तदान, वृद्धाश्रमाची जबाबदारी सांभाळत भरभक्कम कामगिरी सुरू ठेवली आहे. बड्या बड्या हॉस्पिटलमध्ये छोट्या गरीब परिवारातल्या लोकांना आवश्यक उपचार वाजवी दरात, तर कधी मोफत मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक प्रतिथयश डॉक्टरांचे उंबरठे झिजवण्यात कमीपणा मानला नाही. अकोल्यापासून मुंबईपर्यंत गरीब, गरजू व्यक्तींना उपचारासाठी पाठवून त्यांनी रुग्णसेवेची साखळी निर्माण केली. त्यांचा उदात्त हेतू आणि प्रामाणिक धडपड बघून . एका दमाच्या प्रामाणिक, जिगरबाज आणि धडपड्या कार्यकर्त्यांची फळीच जिल्हाभर उभी केली. त्यांच्या आक्रमक शैलीने समाजातील ताकत वाढत गेली. अधिकाऱ्यांना अनेक सामाजिक मुद्यांवर त्यांनी घाम फोडला. चिमूटभर स्वार्थ आणि मूठभर परमार्थ करणाऱ्या या यारबाज, जिगरबाज माणसाने आजवर बेमालूमपणे अनेकांना मदतीचा हात दिला "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले" याप्रमाणे ज्याचं कार्य मातोश्री वृद्धाश्रमात अखंडपणे सुरू आहे. ग्रामीण तरुणांच्या समस्या सोडवणारा, अनेकांच्या वेदनेवर मलमपट्टी करणाऱ्या या निस्वार्थी मित्राला, माझ्या लहान भावास जन्मापासून जवळून बघतोय. त्याने कित्येकांना रोजगार दिला. जगण्याचा आधार दिला. अनेकांना छोट्या मोठ्या व्ययवसाय उभारणीसाठी मदत, मार्गदर्शन केलं. कुणाची लग्न तर कुणाचं मरण त्याने घरच्यासारखे सांभाळले. या मित्राने समाजकारण आधी नंतर राजकारण, हे तत्व पाळलं. अनेक सवंगडी जमवले. त्यांच्या सहकार्यातून जमेल ती समाजसेवा सुरू ठेवली. संवेदनशील, हळव्या मनाच्या या तरुणाचं काम आजवर अनेकांनी अनुभवलं. लिहण्यासारखं खूप काही, पण आज इतकंच.
आज या जिगरबाज हरहुन्नरी, संवेदनशील, धडपड्या, कृतिशील, रांगड्या समाजसेवक मित्राचा आज वाढदिवस.अष्टपैलू व्यक्तिमत्व , राजकारण,क्रीडा, सांस्कृतिक ,सामाजिक क्षेत्रात कायम वावरणारा, भावाप्रमाणे आमच्यावर प्रेम करणारा,संग्रामभैय्या यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा..!!! या छाव्याची डरकाळी समाजसेवेसाठी अशीच जिल्हाभर घुमत राहो. त्याच्या सत्कार्याची ज्योत अखंड तेवत राहो, हीच सदिच्छा.!*
*- अविनाश राऊत* ( 9422164265 )





0 टिप्पण्या