१५५ एकर जमीन प्रकरणी आयुक्तांचे अकोला जि.प.अध्यक्षा व सीईओ यांना आदेश...




   अकोला जिल्हा परिषदेच्या मालकीची बाळापूर तालुक्यातील हाता परिसरातील थोडीथोडकी नव्हेतर जवळपास १५५ एकर शेती जिल्हा परिषदचे नुकसान करून केवळ ३,७०,००० रुपयांना एक वर्षासाठी करार करून वाहितीसाठी देण्यात आली होती.मात्र यामध्ये जिल्हा परिषदचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार आयुक्त यांचेकडे जि.प.सदस्य गजानन पुंडकर यांनी दाखल केली होती.यावर अमरावतीच्या महसूल विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी अकोला जिल्हा परिषदच्या कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन तात्काळ खुलासा मागितला होता.


     मात्र अमरावती आयुक्त कार्यालयात या प्रकरणांत दि.२८/८/२०२३ ला आयोजित सुनावणी दरम्यान अकोला जि.प.कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांनी तो फेटाळला असून दोन दिवसांनी स्वयंस्पष्ट खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते,त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी व प्रशासन अडचणीत आले आहेत.परंतु आठ दिवसातही हा खुलासा सादर न झाल्याने आज अमरावती आयुक्त कार्यालयातून याबाबत अध्यक्षा व कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.


    हाता येथील ही १५५ एकर शेती ही कुणा सर्वसामान्य व्यक्तीने नाही तर अकोला जिल्हा परिषदेतील सत्तेचा केंद्रबिंदू असलेले "वंचितचे" सर्वेसर्वा ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी सौ.अंजली मायदेव,आंबेडकर यांनी एक वर्षाचा करार करून भाडे पट्ट्यावर घेतली होती.त्यांनी ३,७०,००० रुपयांत लीजवर घेतल्यानंतर लाखो रुपये शेती पेरणी व इतर पूरक कामांवर खर्च केल्यानंतर दि.२४/८/२०२३ रोजी अचानकपणे अकोला जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन ही एक वर्षासाठी करण्यात आलेली लीज सोडत असल्याचे जाहीर करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.मात्र त्यांनी शेती वाहितीचे अधिकार सोडले असली तरी हा विषय कायदेशीररित्या संपलेला नाही.

   अमरावती विभागीय आयुक्त यांना सादर करण्यात आलेल्या खुलाश्यात हेच लीज सोडण्याचे पत्र सादर करून तक्रारकर्त्यांची मागणी पूर्ण झाल्याने इथेच हा विषय संपला असल्याचे सांगण्यात आल्याने आयुक्त यांनी तक्रार आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून देऊन दोन दिवसांत "स्वयंस्पष्ट खुलासा" सादर करण्याचे आदेश दिले होते.मात्र गेल्या ८ दिवसांतही हा खुलासा अध्यक्षा व सीईओ जिल्हा परिषद अकोला यांनी सादर न केल्याने आज दि.५/९/२०२३ ला पुन्हा पत्र देऊन २ दिवसांत हा खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
   
 
   आम्ही या विषयावर सविस्तर वृत्त मालिका प्रकाशित करून या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच हे प्रकरण अकोला जिल्हा परिषदच्या अध्यक्षा 



    सौ.संगीता अढावू यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लावू शकते हे तेव्हाच स्पष्ट केले होते.तर कृषी विभागातील संबंधित अधिकारी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची देखील टांगती तलवार आहे ही सांगितलेले आहेच.येत्या दोन दिवसांत या प्रकरणांत संबंधितांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या