बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल वरठे, यांनी अकोटमध्येच बांधले घरटे...



   अकोला जिल्ह्यातील अकोट येथील महिला व बाल विकास योजनेचे बाल विकास प्रकल्प अधिकारी राहुल वरठे यांची अडीच महिन्यांपूर्वीच अकोट येथून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी याठिकाणी शासनाने बदली केली आहे.मात्र तरीही शासन आदेशाला चुना लावून वरठे अकोटलाच ठाण मांडून बसले असून अकोट येथील घरटे सोडायची त्यांची इच्छा नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.



    अकोट तालुक्यातील ग्रामीण भागात जवळपास साढेतीनशे अंगणवाड्या असून वर्षाकाठी सात ते आठ कोटी रुपयांचे या कार्यालयाचे वार्षिक बजेट आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट हा भौगोलिक दृष्ट्या सगळ्यात मोठा तालुका असून जिल्ह्यापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर असला तरीसुद्धा कुणीही वरिष्ठ अधिकारी या कार्यालयात येऊन भेट देण्याची तसदी घेत नसल्याने मनात येईल तसा कारभार करता येतो तर या गावातील लिडर लोकांचा देखील बायकां पोरांचा विभाग असल्याने कोणताही त्रास नाही.

     ग्रामीण भागातील ज्या लोकांची मुले या विभागाच्या अंगणवाडीत जातात ती लोकं कधीही गावातील केंद्रात जात नाहीत तर याठिकाणी त्यांच्या लहान लहान मुलांना कोणता व कशा पद्धतीने पोषण आहार दिल्या जातो हे विचारायची अजिबात मानसिकता नाही हे यापूर्वी देखील वारंवार सिद्ध झाले आहे.आणि नेमके याच कारणाने या तालुक्यात काम करणे अत्यंत सोयीचे असल्याची या विभागात काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची मानसिकता तयार झालेली आहे.


    अकोट ग्रामीणच्या या कार्यालयात गेल्या दोन अडीच वर्षांपासून कार्यरत असलेले राहुल वरठे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने शासनाने त्यांचे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी याठिकाणी ३० जून २०२३ लाच बदली आदेश काढले आहेत.परंतु अडीच महिने झालेत तरी देखील ते येथून जायला तयार नसल्याने आता अनेकांच्या भुवया उंचवायला लागल्या आहेत.त्याला कारण म्हणजे या तालुक्यात गेल्या दोन महिन्यां पासून ग्रामीण भागातील जवळपास ४५ अंगनवाड्यावर मदतनीस यांच्या भरतीचा कार्यक्रम चालू आहे. सिडीपीओ राहुल वरठे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून ही भरतीप्रक्रियेची मान्यता त्यांच्या कार्यकाळात मिळवून आणलेली असल्याने ती पूर्ण करण्याचा त्यांचा सगळा अट्टाहास सुरू आहे.आणि केवळ त्यासाठीच बदलीच्या ठिकाणी रुजू न होण्याची त्यांची मानसिकता अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे.

    दरम्यान या भरती प्रक्रियेत बरेच काहीतरी काळेबेरे झाले असल्याची चर्चा असून जाहीर करण्यात आलेल्या आक्षेप यादीवर अनेक गावातील उमेदवारांनी आक्षेप नोंदविले असून त्यावर अद्यापही कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही हीच आता मुळात आक्षेपार्ह बाब ठरली आहे.जिल्हा कार्यालयातून आक्षेप यादीवरील आक्षेपांच्या सुनावणीसाठी गेल्याच आठवड्यात तीन सदस्यीय पथक पाठविण्यात आले होते,मात्र त्यांनी रीतसर सुनावणी न घेता केवळ थातुरमातुर कारवाई करून केवळ तोंडाला पानेच पुसली असल्याचे बोलले जात आहे.सिडीपीओ राहुल वरठे यांची येथून बदली झाली असली तरी त्यांना येथून पदमुक्त करण्यात न आल्याने या महिला उमेदवारांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.त्यामुळे जाहीर करण्यात आलेली आक्षेप यादी रद्द करून सर्व प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविण्यात यावी अशी मागणी महिला वर्गातून पुढे येत आहे.वरठे यांची येथून रवानगी न करता त्यांच्याच कार्यकाळात राबविण्यात आलेल्या निवड प्रक्रियेतून तयार करण्यात आलेली जाहीर करण्यात आल्यास न्यायालयात जाणार असल्याचे देखील काही उमेदवारांनी बोलून दाखविली आहे.यासोबतच वरठे यांचे काही किस्से देखील बाहेर येत असून  त्यांच्यामुळे त्रस्त झालेले तोंडं बंद करून बसलेले लोकं आता मात्र बोलायला लागले आहेत.गेल्या महिनाभर आधी अकोल्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी म्हणून अमरावती येथील आलेल्या श्रीमती कौलखेडे ह्या वरठेला पाठीशी घालून कार्यमुक्त करीत नसल्यामुळे अकोट तालुक्यातील अनेक पात्र महिला उमेदवार बाल सेवे पासून वंचित राहनार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता अकोट सिडीपीओ राहुल वरठेला त्वरेने कार्यमुक्त करावे अशी मागणी जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या