अकोला जि.प.चा अजब कारभार,चौकशी अधिकाऱ्याचाच काढला प्रभार...




     राज्यभरात अकोला जिल्हा हा अफलातून असून या जिल्ह्यात केव्हा.? कुठे.? काय.? आणि कसे.? विचित्र घडेल याची काहीच शाश्वती देता येत नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेच्या आधारे समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळण्याच्या व मिळवून देण्याचा ध्येयाने प्रेरित होऊन ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यात आपल्या पक्षाची अतोनात मेहनत घेऊन पाळेमुळे रुजविण्याचे प्रयत्न केलेत.भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून दलित व सवर्णांमधील सत्तेपासून वंचित असलेल्यांना सोबत घेऊन जिल्ह्यातील राजकारणावर पकड घट्ट केली.त्यांचा हा सामाजिक एकीकरनाचा राजकीय प्रयोग्य काही प्रमाणात नव्हे तर १००% यशस्वी देखील झाला आहे.

     गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील स्वतः खासदार व काही आमदार निवडून आणून महानगर पालिका, नगर पालिका,जिल्हा परिषद व पंचायत समित्यावर चांगलीच पकड निर्माण केली आहे.आजही अकोला जिल्हा परिषद ही भारिप बहुजनचे नवीन संघटन म्हणून उदयास आलेल्या "वंचितच्याच" ताब्यात असून त्याठिकाणी बाळासाहेबांचीच सत्ता आहे.मात्र ह्या सत्तेची फळे आजही केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वंचितला "जवळ करणारेच चाखत" असून ज्यांनी ही सत्ता मिळविण्यासाठी जीवाचे रान करून,स्वतःचे रक्त आटवून प्रयत्न केलेत त्यांच्यापासून ही सत्ता आणि तिची फळे कितीतरी दूर आहेत.

    जिल्हा परिषदेच्या विविध विभागात गेल्या अनेक वर्षांपासून नोकरी करीत असलेले अधिकारी, कर्मचारी हे पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून आपले "उल्लू सरळ" करीत असल्याचेच अगदी स्पष्टपणे दिसून येत असून हे "वंचितच्या आसऱ्याला" आलेले पदाधिकारी देखील त्यांनाच सर्वतोपरी सहकार्य करीत असल्याचे दिसून येत आहे.

    गेल्या महिनाभर आधी तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड व दानापूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्या गैरकारभार याबाबत जिल्हा परिषदच्या सीओ कडे तेथील नागरिकांनी स्थानिक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात तक्रारी केलेल्या आहेत.या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा परिषदच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी यांना याबाबत निर्देश दिले असता तेल्हारा पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी घुगे यांना याप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.त्यांनी याबाबतची चौकशी देखील सुरू करून तक्रारीबाबत अहवाल गटविकास अधिकारी यांना सादर केल्याची माहिती आहे.

   परंतु घुगे यांना संबंधितांनी मॅनेज करण्याचे प्रयत्न सुद्धा करून पाहिलेत परन्तु ते ऐकत नाहीत हे पाहून त्यांच्याच विरूद्ध संघटनेच्या माध्यमातून तक्रारी देण्याचा अफलातून प्रयोग संबंधित ग्राम सेवकांनी करून पाहिला आणि त्यात ते यशस्वी देखील झाले असल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषदचे मासिक सभेत अध्यक्षा सौ.संगीता नंदकिशोर अढाऊ यांनी दानापूर व हिवरखेडच्या दोन ग्रामसेवक यांच्याविरुद्ध चौकशी अहवाल देणाऱ्या विस्तार अधिकारी घुगे यांचेकडील प्रभार काढून घेण्याचे आदेश दिले असून आजरोजी सदरहू विस्तार अधिकारी यांचेकडे काहीच काम नाही.आणि हे सर्व करण्याचे कारण म्हणजे या दोन ग्रामसेवकां पैकी एक अध्यक्ष यांच्या नात्यातील असल्याची माहिती आहे.


     सत्तेचा दुरुपयोग करून त्याचा फायदा जवळच्या नातेवाईकांना करून देणे हे लोकशाही व्यवस्थेत योग्य नसून सत्तेत सर्वोच्च स्थानी बसलेल्या व्यक्तीकडून सर्वसामान्य लोकांना समान न्यायाची अपेक्षा असते आणि ते रास्त आहे.

    आज जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात ह्यात काहीच दोष नसतांना प्रभार काढून घेतलेल्या विस्तार अधिकारी यांच्याविरुद्ध ग्रामसेवक संघटनेने केलेल्या तक्रारींवर सुनावणी ठेवण्यात आलेली आहे.हे विशेष.मात्र ह्याच विस्तार अधिकारी यांनी तेल्हारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे दोन ग्रामसेवक ह्यांनी केलेल्या गैर कारभाराच्या तक्रारीवरील अहवाल देऊनही त्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.आता ह्याला काय म्हणता येईल.हा अहवाल गटविकास अधिकारी यांनी दडवून ठेवला असून तो अद्यापही जिल्हा परिषदच्या पंचायत विभागात पोहोचलेला नाही,कारवाई तर दूरच राहिली."हा सरळ सरळ चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असून यात सत्ताधारीच असल्याने कुणीही तोंड उघडण्यास तयार नाही,ही शोकांतिका आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या