बिडीओने दाबला अहवाल,चौकशी अधिकाऱ्याचेच चालू हाल,दोन्ही ग्रामसेवक मात्र मालामाल..?




     अकोला जिल्ह्याचे "मिनी मंत्रालय" असलेल्या जिल्हा परिषदेत साक्षात "सत्तेचा सारीपाट" मांडल्या गेला असून ज्यांच्या हातात सत्ता आहे ते महाभारतातील "शकुनी मामा"लाही लाज वाटेल अशा प्रकारे "सोंगट्या" टाकत असून आपलेच "बिनकामाचे प्यादे" पुढे सरकवत आहेत.त्यांनाच सगळ्या प्रकारचे संरक्षण देऊन पाठीशी घालण्याचे नसते उपदव्याप करून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणाऱ्यांना मात्र विनाकारण मानसिक त्रास देऊन जेरीस आणण्याचे "कारस्थान" रचण्याचे प्रकार अधिकाऱ्यांना हाताशी धरून अथवा त्यांची दिशाभूल करून सर्रास सुरू आहेत.

    तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या दानापूर व हिवरखेड या दोन ग्राम पंचायत मध्ये अनुक्रमे के.एस.इंगळे व ए.एम.खुमकर हे दोन ग्रामसेवक कार्यरत असून या दोन्ही गावातून ग्राम पंचायत सदस्य व गावातील नागरिकांनी रस्ते,बांधकाम, स्वच्छता अभियान अंतर्गत साहित्य खरेदीबाबत अनेक तक्रारी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आलेल्या आहेत.या तक्रारींची चौकशी करण्यासाठी तेल्हारा पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी डी.ए.घुगे यांची नियुक्ती करण्यात आली होती.दोन महिन्यांपूर्वी त्यांनी दोन्ही गावातील ग्राम पंचायत मध्ये तसेच प्रत्यक्ष घटनास्थळांवर जाऊन तथा तक्रारकर्त्याचे म्हणणे ऐकून आपला अहवाल तेल्हारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,बीडीओ मुंढे यांना दोन्ही ग्रामसेवकांचा चौकशी अहवाल दि.२८/६/२९२३लाच सादर केलेला आहे.

  हे दोन्ही अहवाल विद्रोही मराठाकडे आले असुन ते आम्ही वाचकांना  उपलब्ध करून देत आहोत.आता वाचकांनीच दोषी कोण ते ठरवावे.

( हिवरखेड येथील अहवाल) 



( दानापूर येथील अहवाल)






     मात्र हा अहवाल दानापूर व हिवरखेड येथील ग्रामसेवक इंगळे व खुमकर यांच्या विरोधात जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी पदाधिकाऱ्यांकडे धाव घेत "शरणागती पत्करून" कसेही करून वाचविण्याची विनंती केली,आणि त्यांनी ती मान्यही करून या दोन्ही ग्रामसेवकांना "अभय" दिल्याची पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चा आहे.

     तेल्हारा येथील गटविकास अधिकारी हे नुकतेच ग्रामविकास विभागाच्या सेवेत आलेले "परिविक्षाधीन" अधिकारी असून त्यांना अजूनतरी या खात्याचा व कामाचा पुरेसा अनुभव नाही.मात्र हे दोन्ही ग्रामसेवक चांगलेच अनुभवी असून ग्रामसेवक संघटनेचे तालुक्यातील अध्यक्ष व सचिव आहेत.त्यांनी चौकशी अधिकारी घुगे यांना त्यांच्याविरुद्ध जाईल असा अहवाल न देण्यासाठी प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करून पाहिल्याचे पंचायत समिती स्तरावर झालेल्या चर्चेतून कळते.मात्र घुगे ऐकत नसल्याचे पाहुन त्यांनी त्यांच्याच विरुद्ध विविध आरोप करीत जि.प.अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली.




      दोन्ही ग्रामसेवक हे तेल्हारा तालुक्यातील व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संगीता अढावू यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांनी सदरहू तक्रारीची कोणतीही शहानिशा करण्याच्या भानगडीत न पडता विस्तार अधिकारी घुगे यांचेकडील प्रभार काढून त्यांचीच चौकशी सुरू केली.मात्र  भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि त्याबाबत बीडीओकडे तब्बल दोन महिन्यांपासून म्हणजेच दि.२८/६/२०२३ पासून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला न पाठविता दडवून ठेवण्यात आलेला असल्यावरही कोणतीच कार्यवाही न केल्याने ते ग्रामसेवक अगदी "उजळमाथ्याने" वावरत आहेत.हा तर सरळसरळ "चोर सोडून संन्याशालाच फाशी" देण्याचाच प्रकार असूनही कुणीच याविषयी काहीच बोलत नाही याचेच आश्चर्य वाटत आहे.

      ज्यांची चौकशी करण्यात आली व अहवालही त्यांच्याच विरुद्ध जात असतानाही त्यांना पाठीशी घालून चौकशी अधिकार्यांचीच तक्रार करून दोषी नसतांनाही त्यांचाच प्रभार सुद्धा काढण्यात आला.इतकेच नव्हे तर आठवडाभरातच म्हणजेच दि.२१/८/२०२३ ला त्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी,पंचायत हरिणारायन परिहार यांनी कर्तव्यदक्षतेचा आव आणत चौकशीसाठी बोलावून त्यांचा जाबजबाब नोंदवून घेतला.याबाबत दोन दिवसांपूर्वीच विद्रोही मराठावर सविस्तर वृत्त प्रकाशित झालेले आहे.

     काहीच दोष नसतानाही खोट्या तक्रारीवर चौकशी करून त्याचा अंतिम अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी यांचेकडे कारवाईसाठी गेलासुद्धा आहे परन्तु याच चौकशी अधिकारी घुगे यांनी ज्या दोन ग्रामसेवकांच्या बाबतीत As it is, वस्तुस्थितीवर आधारित अहवाल सादर केला तो दडवून ठेवण्यात आला असून भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या इंगळे व खुमकर या दोन ग्रामसेवकांना वाचविण्याचे अजूनही प्रयत्न केल्या जात आहेत.आणि त्यामुळेच वरिष्ठांच्या आशिर्वादाने बिडीओने दाबला अहवाल, चौकशी अधिकाऱ्यांचेच सुरू हाल,तर भ्रष्टाचाराचे आरोप आलेले ग्रामसेवक मात्र मालामाल, अशीच जिल्हा परिषदेच्या आवारात उघड उघड चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या