हे पोलीस आहेत की गावगुंड ? चान्नीच्या ठाणेदाराकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण; पत्नीचा विनयभंग करून शिवीगाळ; पोलिसांचा तक्रार घेण्यास नकार...




   पातुर तालुक्यातील एका वकिलाच्या उपस्थितीत चान्नीचा ठाणेदार एका शेतकऱ्याला पोलीस ठाण्यात बोलावून बेदम मारहाण करतो. त्यानंतर काही लोक त्या इसमाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीचा विनयभंग करून शिवीगाळ करतात व धमक्या देतात. एवढे सर्व होऊनही पोलीस तक्रार घेण्यास नकार देतात उलट तक्रार केली तर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देतात. या सर्व प्रकारावरून अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था नेमकी कुठे चालली ?  जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करायला लागले आहेत.
        
   याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पातुर तालुक्यातील पिंपळखुटा येथील रहिवासी असलेले सुभाष बळीराम इंगळे यांना पोलीस पाटील यांनी २४ ऑगस्टच्या रात्री १० वाजता निरोप दिला की त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. त्यानुसार सुभाष इंगळे हे त्यांचा मुलगा श्रीराम व पुतण्या गणेश यांना सोबत घेऊन चान्नी पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी एक वकील व ठाणेदार विपुल पाटील हजर होते. ठाणेदार यांनी सुभाष इंगळे यांना एका खोलीत नेऊन सोबत असलेला मुलगा व पुतण्या यांना हाकलून दिले व सुभाष इंगळे यांना जबर मारहाण केली. पट्ट्याने व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. शिपायांना पायावर उभे करून व हात धरून झालेल्या मारहाणीत सुभाष इंगळे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांच्या हाडाला मार लागला. हा सर्व प्रकार श्रीराम व गणेश खिडकीतून पाहत असल्याचे लक्षात आल्यानंतर ठाणेदार विपुल पाटील यांनी दोघांनाही हाकलून दिले. मुलगा व पुतण्या यांनी या घटनेची माहिती त्यांचे मामा संजय शेवालकर यांना दिल्यानंतर  त्यांनाही खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देण्यात आली. एवढ्यावर ठाणेदारांचे मन शांत झाले नाही म्हणून त्यांनी पुन्हा धमकावून गावात राहिला तर जीवाने मारण्याची धमकी दिली, असे सुभाष इंगळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या मारहाणीनंतर झालेल्या प्रकाराची तक्रार घेऊन तपासणी करण्याची मागणी केली. तेव्हा पोलिसांकडून नकार देण्यात आला. या मारहाणीनंतर सुभाष इंगळे यांना चतारी येथील शासकीय रुग्णालयात नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
       
    प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर या घटनेनंतर सुभाष इंगळे यांचा मुलगा रात्री साडेअकरा वाजता घरी पोहोचल्यानंतर मिलिंद इंगळे व भाऊराव इंगळे हे त्यांच्या घरी पोहोचले व त्यांच्या पत्नीचा विनयभंग करून शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकाराची पुन्हा पोलिसात तक्रार देण्यासाठी निघालेल्या त्यांच्या पत्नीला प्रशांत वानखडे यांनी रस्त्यात अडवून पुन्हा धमकी दिली. या सर्व प्रकाराची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या त्यांच्या पत्नीची तक्रार पोलिसांनी नोंदवून तर घेतलीच नाही उलट तक्रार केली तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही अशी धमकी उपस्थित पोलिसांकडून देण्यात आल्याचे त्यांच्या पत्नीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
 
   
 
 
    या सर्व प्रकारावरून अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था शिल्लक आहे का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. तक्रारीत नमूद असलेल्या माहितीवरून हे सर्व प्रकरण शेतासाठी झाल्याचे समजते. पण एका वकिलाच्या उपस्थितीत एका न्यायाधीशांचे नाव घेऊन एक ठाणेदार एका इसमाला बेदम मारहाण करतो. नंतर काही लोक त्याच्या घरी जाऊन महिलेचा विनयभंग करून धमक्या देतात. मुलगा,पुतण्या व नातेवाईकांना धमक्या देतात. खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या व हातपाय तोडण्याच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. या सगळ्या प्रकारावरून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही ? हे पोलीस आहेत की गावगुंड ? असा प्रश्न उपस्थित होत असून कायद्याचा धाक आणि वचक राहिलेला नाही,अशा प्रतिक्रिया लोकांमधून उमटायला लागल्या आहेत.या तक्रारींच्या प्रतिलिपी गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, राज्यपाल यांना सुद्धा पाठविण्यात आल्याचे समजते. या गंभीर प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांचे लक्ष लागून आहे.

   तक्रारीसोबत जोडण्यात आलेली वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे व एक्स रे फोटो.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या