ऑगष्ट महिन्यांत राज्यातील महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार करून पैसे कमावण्याची सुरू केलेली शर्यत थांबण्याचे नावच घेत नसून उलट या शर्यतीला आणखीच जोर चढल्याचे दिसून येत आहे.
संपूर्ण "महसूल सप्ताह" या लाचखोरांनी गाजवून सोडला असून विभागातील लहान मोठे,अधिकारी व कर्मचारी कुठे हजार तर कुठे लाखो रुपये लाचेची मागणी करून आणि ती प्रत्यक्षात स्वीकारून एकमेकांवर "चढाओढ करीत" एसीबीच्या गळाला लागत असल्याच्या सत्य घटना दररोज राज्यातील नागरिकांना पाहवयाला मिळत आहेत.
भ्रष्टाचाराच्या बाबतीत महसूल विभागाने केवळ राज्यातच नव्हे तर "जागतिक स्तरावर रेकॉर्डब्रेक" केले असल्याचे आजच्या तारखेत तरी स्पष्टपणे दिसून येत आहे.त्यामुळे राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग फक्त महसूल विभागावरच "सुपाऱ्या घेऊन" कारवाया करीत असल्याचीही कधी कधी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही.
गेल्या १ ऑगष्टपासून एसीबीच्या कारवायात अडकलेल्या भ्रष्टाचारी अधिकारी,कर्मचारी यांना जामीन सुद्धा मिळालेला नसतांना त्यांना कारागृहात जाऊन सोबत करण्यासाठी महसूल विभागातील त्यांचे भाऊबंद लाच घेऊन "एसीबीचा पाहूनचार" घेण्यासाठी आतुरलेले असल्याचे दिसून येत आहे.हे जर का असेच सुरू राहीले तर राज्यातील कारागृहात आधीच असलेल्या इतर गुन्ह्यातील कैद्यांना बाहेर काढून वा त्यांच्या शिक्षा माफ करून महसूल विभागातील या नव्या भ्रष्टाचारी कैद्यांसाठी कारागृहे मोकळी करावी लागतील किंवा भ्रष्टाचारी गुन्हेगारांची शासनाला वेगळी कारागृहे बांधावी लागतील.
याच "चुरसबाजीत" काल पंढरपुरातील सेवनिवृत्तीला एकाध वर्ष बाकी असलेल्या नायब तहसीलदाराने देखील आपला नंबर लावला असून आपल्या विभागबंधूंना साथ देण्यासाठी एसीबीच्या कारवाईला सामोरा गेला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील राज्यातील लाखो लोकांचे दैवत असलेल्या विठ्ठलाच्या पंढरपुरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार असलेल्या अप्पासाहेब शिवाजी तोंडसे याने वीस गुंठे शेतजमिनीच्या खरेदीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी मिळवून देण्यासाठी आपल्या दलालांमार्फत तक्रारदाराकडून पंचांसमक्ष १५ हजार रुपयांची लाच घेतली असता सोलापूर एसीबीने रंगेहाथ पकडले आहे.
या प्रकरणातील तक्रारदार यांनी त्यांच्या शेताच्या लगत असलेल्या १० गुंठे शेतजमिनीच्या खरेदीचा सौदा केलेला असून त्या साठी उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्याने तसा प्रस्ताव कार्यालयाला सादर केलेला आहे,बरेच दिवस झाले तरी विषय मार्गी लागत नसल्याने तक्रारदाराने याच कार्यालयातील नायब तहसीलदार अप्पासाहेब तोंडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी २० हजार रुपयांची मागणी केली होती.मात्र तक्रारदार यांना ही रक्कम द्यावयाची नसल्याने त्यांनी एसीबीला तक्रार देऊन कारवाईची मागणी केली असता,एसीबीने त्यांच्या तक्रारीची पंच यांच्या समक्ष पडताळणी केली.यादरम्यान आप्पासाहेब तोंडसे याने तडजोड करून २० हजार ऐवजी १५ हजार रुपये घेण्याचे मान्य करून ही रक्कम खाजगी इसम सचिन विठ्ठल बुरांडे,व तुकाराम बाळकृष्ण कदम दोघेही रा.पंढरपूर यांच्याजवळ देण्यास सांगितले. यावरून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून लाचेची रक्कम पंच यांचे समक्ष तुकाराम कदम यांचेकडे दिली असता त्याने ही रक्कम नायब तहसीलदाराला देण्यासाठी सचिन बुरांडे कडे दिली असता त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही रंगेहाथ पकडून नायब तहसीलदार अप्पासाहेब तोंडसे यालाही अटक केली.याप्रकरणी पंढरपूर पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई सोलापूर एसीबीचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या नेतृत्वातील पथकाने केली असून त्यांना याकामी शिरीष सोनवणे,अतुल घाडगे,सलीम मुल्ला व राहुल गायकवाड यांनी सहकार्य केले.


0 टिप्पण्या