नांदेड एसीबीने लाच मागणी प्रकरणांत फरार झालेला लाचखोर आरोपी लोकसेवक रुपेश देविदास जाधव याला अखेर काल दि. ११/८/२०२३ रोजी अटक करून त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि.०९.०६.२०२३ ला दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोपी रुपेश देविदास जाधव व्यवसाय सरकारी नोकरी,पद तलाठी,सज्जा शिवपुरी/तामसा रा.मधु आस्था निवास, शाहूनगर नांदेड याने तामसा पो.स्टे.गु.र.न. ५७/२०२३ (क) ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील तक्रारदार यांचे पत्नीस माहेर कडून मिळालेल्या जमिनीचा फेरफार नोंद करून सातबाऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी ७,००० रुपये लाचेची मागणी करून ६,००० रुपयांवर तडजोड करून फोन पे द्वारे मिळविण्याचा प्रयत्न केला. यावरून पो. स्टे. तामसा येथे सदरहू गुन्हा दिनांक २०.०६.२०२३ रोजी दाखल झाला होता.यातील आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार झाला होता. एसीबी नांदेडचे अधिकारी हे आरोपीला अटक करण्यासाठी त्याचे मागावर होते. परंतु आरोपी नेहमी प्रमाणे हुलकावणी देण्यात यशस्वी होत होता.
काल दि.११.०८.२०२३ रोजी आरोपी जाधव हा हादगांव हद्दीतील जवळगाव येथे लपून बसला असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील,एसीबी नांदेड यांना मिळाल्याने पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे,नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक प्रीती जाधव यांचेसह पोलीस अंमलदार संतोष वच्चेवार,बालाजी मेकाले व चालक नीलकंठ यमुनावाड यांनी सापळा रचून आरोपी रुपेश जाधव यांना जवळगाव येथून गुंगारा देऊन पळून जाताना हदगाव येथील पेट्रोल पंपावर शिताफीने पकडले.
त्यास आज रोजी तदर्थ सत्र न्यायाधीश-१ नांदेड यांच्या न्यायालयात समक्ष हजर केले असता न्यायालयाने लाचखोर आरोपी रुपेश जाधव याला तीन दिवस दि.१५.०८.२०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


0 टिप्पण्या