अकोल्याचे तहसीलदार सुनील पाटील फरारच...



    राज्यभरात महसूल विभागात महसूल सप्ताह साजरा केला जात असतांनाच काही अधिकारी व कर्मचारी यांनी लाच घेऊन महसूल विभागात नेमके कसे कामकाज चालते याची "झलक" नव्हे तर संपूर्ण "सिनेमाच" तमाम जनतेला दाखवून दिला आहे.या सप्ताहा दरम्यान एक दोन नव्हे तर तब्बल १३ अधिकारी, कर्मचारी यांना राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली असल्याने महसूल विभागात चालत असलेल्या भ्रष्टाचाराचा "जाहीर बोभाटा" झाला आहे.

      याच महसूल सप्ताहादरम्यान भ्रष्टाचाराची मालिका कुठेही खंडित होऊ नये म्हणून अमरावती विभागातील अकोला येथील तहसीलदार सुनील पाटील यांनीही आपला हातभार लावला आहे. राज्यात भ्रष्टाचाराच्या बाबतीत अकोल्यातील महसूल विभाग तसूभरही मागे नाही हे एसीबीने तीन महिन्यात केलेल्या चार कारवायां वरून अगदी सप्रमाण सिद्ध झालेले आहे.

      नाशिकचा तहसीलदार बहिरम १५ लाखात अडकला तर वाशीमच्या मानोऱ्यातील राठोड नावाचा अव्वल कारकून दीड लाख घेताना पकडला गेला मात्र अकोलेकरांना वाईट एकच वाटते की त्यांच्या जिल्ह्यातील एक रिटायरमेंटला आलेला अनुभवी तहसीलदार फक्त ८ हजार रुपयांमध्ये अडकला.पाच पंचवीस लाख रुपये घेतले असते तर जरा बरे वाटले असते.याही ठिकाणी अकोल्याचे मागासलेपण राज्यभरातील लोकांना दिसून आले.

     गुरुवार दि.१०/८/२०२३ ला एसीबीच्या अधिकाऱ्यांची सुनील पाटील यांच्याबाबतीत कारवाई सुरू असताना ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीला उपस्थित होते, त्याच दरम्यान त्यांना कुणाचा तरी फोन आला आणि पाचच मिनिटात सुनील पाटील त्या बैठकीतून "गायब" झालेत. तेव्हापासून त्यांचा मोबाईल "नॉट रीचेबल" असून ते फरार झाले असल्याने एसीबीच्या अधिकाऱ्यांना अद्याप पर्यंतही दिसून आले नाहीत. अमरावती एसीबीचे अधिकारी त्यांचा कसून शोध घेत असून त्यांच्या अकोल्यातील रणपिसे नगरातील बंगला व राष्ट्रीय महामार्गावरील येवत्याच्या फार्म हाऊस वर देखील झाडाझडती घेण्यात आली आहे.

      एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात येण्याच्या भीतीने गायब झालेले तहसीलदार सुनील पाटील हे तहसील कार्यालयातून म्हणजेच आपल्या कर्तव्यावरून देखील कुणालाही न सांगता गायब असून जिल्हाधिकारी यांना त्यांनी कोणतीच माहिती वा अर्ज दिलेला नाही.ते नसल्यामुळे कार्यालयीन कामकाज खोळंबले असून सर्वसामान्य जनतेची गैरसोय होत आहे.ते आणखी किती दिवस "फरार" राहतील हे आजच काही निश्चितपणे सांगता येत नाही.यासाठी त्यांना अकोला जिल्हाधिकारी यांनी कोणतीही नोटीस बजावलेली नाही अथवा त्यांच्या ठिकानी दुसऱ्या कुणाची प्रभारी म्हणून नेमणूक सुद्धा केली नाही.जनतेला होणारा त्रास लक्षात घेता तहसीलदार सुनील पाटील यांच्याबाबत शिस्तभंगाचा शासनाला प्रस्ताव पाठवून त्यांच्यावर कारवाई करीत दुसऱ्या कुणाची तरी नेमणूक करणे गरजेचे असतांना अकोल्याचे नूतन जिल्हाधिकारी यांच्याकडून मात्र अशी कोणतीही कृती घडलेली नाही.एसीबीच्या अधिकाऱ्यांनी राज्याच्या महसूल सचिवांना सुनील पाटील यांच्या बाबतीत काळविलेले असतांना सचिवांनी देखील पाटील यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई अद्याप तरी केलेली नाही.

     संपूर्ण देश भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतानाच महसूल विभागातील सुपर क्लास १ च्या तहसीलदार पदावरील एक अधिकारी "अटकेनंतर जेल" मध्ये जाण्याच्या भीतीने ती अप्रिय कारवाई  टाळण्यासाठी "फरार" राहत असेल तर भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या ७५ वर्षांत सर्वसामान्य जनतेने काय मिळविले ? गोरे इंग्रज तर गेले मात्र "सिस्टीम" मधील हे आपले काळे "वारसदार" त्यांनी इथेच ठेवले आहेत. त्यामुळे जनतेला खरे स्वातंत्र्य अजूनही मिळालेच नाही हे मोठ्या खेदाने म्हणावे लागत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या