अकोला तहसीलदार सुनील पाटील यांच्यावर एसीबीची कारवाई...





     गेल्या महिन्यात ३० जूनला अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकोला तहसील कार्यालयात कारवाई करीत महसुलच्या अकोला तहसील कार्यालयातील नासिर खान मुनाफ खान नामक कर्मचाऱ्याला लाच मागणी केल्यावरून तक्रारीची पडताळणी झाल्यावर अटक करून गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली होती त्याच प्रकरणांत अमरावती एसीबीने तहसीलदार सुनील पाटील यांनाही आरोपी केले असून अकोला न्यायालयाला तसे कालच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कळविले आहे.याप्रकरणात तहसीलदार सुनील पाटील यांना अजूनतरी अटक करण्यात आलेली नाही.

     अकोला जिल्ह्यातील महसूल विभाग एसीबीच्या रडारवर असून ही तीन महिन्यातील चौथी कारवाई आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणतेच नियंत्रण नव्हते हे ह्या वारंवार झालेल्या कारवायांवरून स्पष्टपणे दिसून येत आहे.अशा भ्रष्टाचारी कर्मचार्यांमुळे जिल्हाभरात महसूल विभागाची जनमानसातील प्रतिमा डागाळत असल्याने महसुलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही कठोर पावले उचलणे जरुरी आहे.

   नासीर खान मुनाफ खान, वय ५२ वर्षे, पद- कनिष्ठ लिपिक, तहसील कार्यालय अकोला.(वर्ग ३) असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

     यातील दिग्रस खु.ता.पातूर येथील ३६ वर्षीय तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेला मौजे कोलखेड येथील प्लॉटची नियमाकुल (सब डिव्हिजन ) ची नोंद घेण्यासाठी तहसील कार्यालय अकोला येथील कनिष्ठ लिपिक नासिर खान हा लाचेची मागणी करीत असल्याबाबत तक्रारदार यांनी दि.१२/१/२०२३  रोजी तक्रार दिली होती.दिलेल्या  तक्रारीवरून दि.१२/१/२०२३ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान तहसील कार्यालय अकोला येथील कनिष्ठ लिपिक नासिर खान यांनी तक्रारदार यांना त्यांचे कामाकारिता तहसीलदार पाटील यांचे करिता ८००० रुपये व स्वतः करिता २००० रुपये असे एकूण १०,००० रुपये लाचेची मागणी केली होती.
 
    मात्र त्यानंतर दि.१३/१/२०२३ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान नासिर खान याला तक्रारदार यांच्यावर संशय आल्याने त्यांचेकडून लाच रक्कम स्वीकारली नाही. तक्रारदार यांनी दिलेल्या निवेदनावरून यातील आरोपी लोकसेवक नासिर खान याला गेल्या ३० जूनला अकोला तहसील कार्यालयातून ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन रामदास पेठ, अकोला येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया याआधीच करण्यात आलेली आहे.याचप्रकरणांत तहसीलदार यांच्यावरही गुन्हे दाखल करून त्यांनाही आरोपी बनविन्यात आले आहे.

     सदर कारवाई तपास अधिकारी पो.नि.योगेशकुमार दंदे,यांनी केली असून लवकरच तहसीलदार सुनील पाटील यांना अटक केली जाऊ शकते.पाटील यांच्यावरील कारवाईने अकोला जिल्ह्यातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांत चांगलीच खळबळ उडाली असून वातावरण ढवळून निघाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या