राज्याच्या पोलिस दलातील वरून खालपर्यंत सर्वच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा पोळा फुटला असून त्याला अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे यांचाही अपवाद नाहीच.त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्फत रीतसर अर्ज करून अमरावती रेंजच्या विशेष पोलिस उप महानिरीक्षक यांना अकोला जिल्ह्यातून इतरत्र म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यात बदली मागितली होती. परंतु त्यांनी दोनच दिवसांपूर्वी केलेल्या अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये माळवे ह्यांनी केलेल्या विनंतीला अगदी स्पष्ट शब्दांत नकार दिल्याचे सर्वश्रुतच आहे.
येत्या दोन तीन दिवसांत अकोट शहरातील त्यांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांची जिल्ह्यातच कुठेतरी बदली होण्याची शक्यता आहे.त्यामुळे त्यांना अकोट शहरातील नागरिकांच्या वतीने जाता जाता एकच विनंती करावीशी वाटते की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत शहरांत सुरू असलेले दोन नंबरचे धंदे, जसे की शहराच्या चौका चौकात सर्रास,अगदी खुलेआम सुरू असलेले अवैध दारू वाहतूक, वरली व जुगाराचे अड्डे बंद करून, मगच जावे.
आज रोजी अकोट शहरातून ग्रामीण भागात वाहत असलेला देशी दारूचा महापूर देखील थांबवणे अत्यंत गरजेचे झाले आहे.शहराच्या शेठ सोनू चौकातून तालुक्याच्या प्रत्येक गावागावात दुचाकी वाहनांवरून देशी दारुची वाहतूक दिवस निघाल्यापासून रात्रीपर्यंत विना रोकटोक, शहर पोलिसांच्या आशीर्वादाने बिनबोभाट सुरूच असते.ह्या दारूमुळे केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागात देखील कित्येक घराघरांत कौटुंबिक कलहाचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि ह्याला अकोट शहर पोलिसच जबाबदार आहेत. कारण सर्वसामान्य जनतेला दिसत असलेले हे अवैध धंदे केवळ पोलिसांनाच दिसत नसल्याने सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे.
ह्याच पोलिसांच्या आशीर्वादाने शहरातील बऱ्याच बारमध्ये नकली दारू व बियरची जोरात विक्री सुरू असून कित्येक ग्राहकांचे आरोग्यावर त्याचे घातक परिणाम दिसून येत आहेत,हे सर्व माहीत असूनही माळवे साहेबांचे पोलिस अधिकारी,कर्मचारी मुद्दाम डोळेझाक करताहेत की त्यांना ह्याची काहीच कल्पना नाही, हे मात्र सर्वसामान्यांच्या समजण्या पलीकडचे आहे.
अकोट शहर पोलिस ठाण्यात अवैध धंदे व गुन्हेगारांना शोधण्याची जबाबदारी असलेले डी.बी.पथक नेमके काय काम करते.? हा प्रश्न उपस्थित होत आहे.हे पथक कामाची कामे करते की काहीतरी "अर्थ" असेल अशीच कामे करते हे, हे शहर वाशीयांना आता तरी सांगण्याची काहीच गरज नाही.
वरली मटका व अवैध दारूच्या धंद्यातून लाखो रुपयांची दररोज उलाढाल होत असल्याने ही "धंदेवाईक" मंडळी चांगलीच गब्बर झाली असून कुणालाही विकत घेण्याची ह्यांची भाषा असते.ह्या लोकांच्या आपापसांतील एरियाच्या विषयावरून कधीही मारामारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भविष्यात धंद्यांमधील वर्चस्वाच्या लढाईत सर्वसामान्य नागरिकांचा बळी जावू द्यायचा नसेल तर ह्या धंदेवाईकांवर पोलिसांनी आजच "अंकुश" लावणे फार गरजेचे आहे.
"विद्रोही मराठा"ला आजपर्यंत कधीही दारू व वरली मटक्याच्या धंद्याच्या बातम्या लावण्याची गरज पडली नाही.परंतु आज अकोट शहरातील ह्या "समाज विघातक" विषयांची दखल घ्यावी लागली तर,हा विषय भविष्यात ह्या शहरासाठी किती घातक, परिणाम करणारा असू शकतो ह्याचा विचार करण्याची आज वेळ शांतताप्रिय नागरिक व ही शांतता कायम ठेवण्याची "जबाबदारी" असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी आवर्जून विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. तेव्हा अकोट शहर पोलिस स्टेशनचे विद्यमान ठाणेदार ह्यांना एकच "मागणे" आहे की,त्यांनी सामाजिक जबाबदारी व आपले कर्तव्य समजून हे धंदे नाही कायमस्वरूपी, तर किमान ते ह्या ठाण्यात ठाणेदार असेपर्यंत तरी बंद करावेत ही अकोटकर जनतेच्या वतीने विनंती आहे.



0 टिप्पण्या