वाघाची शिकार करणा-या मोस्ट वॉन्टेड गजेंद्रीबाईचा जामीन न्यायालयाने फेटाळला...



     भारताचे वैभव असलेल्या वाघांच्या शिकारी प्रकरणात देशाच्या चार ते पाच राज्यात वन विभागाच्या वाँटेड लिस्ट मधील "मोस्ट वॉन्टेड" शिकारी महिला आरोपी गजेंद्रीबाई हिचा जामीन अर्ज अकोटच्या सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी आज फेटाळून लावला आहे.


 वनपरिक्षेत्र पथक हिवरखेड यांनी दाखल केलेल्या वन अप. क्र. ५९/२९३८, गुन्हा उघड होण्याची ता.०६.०८.२०१३ कलम वन्यजिव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,४४,४९ ब ५१.५२ मधील आरोपी अट्टल महिला शिकारी गजेंद्रीबाई उर्फ शितलबाई रतन उर्फ टेलरिन पारधी, वय ५० वर्ष रा.आम देवरी थाना बीजादाण्डी जि. मंण्डला, मध्यप्रदेश हीने व तिच्या इतर साथीदार यांनी मिळुन दि.०६.०८.१३ रोजी खिरकुंड, अकोट वन्यजीव विभागाच्या परीसरात लोखंडी ट्रॅप लावुन वाघाला घटनास्थळी लोखंडी सापळ्यामध्ये अटकवुन, त्याच्या तोंडामध्ये भाला खुपसुन हत्या केली.त्यानंतर त्या मृत वाघाची चामडी व हाडे काढून साथीदारांच्या मदतीने त्या वाघाची चामडी व हाडे हरीयाणा येथील या प्रकरणातील आरोपी रंजीत भाटीया याला विकली. अशा प्रकारे वाघाची शिकार करुन त्याच्या शरीराची वाहतुक करुन,विक्री केल्याच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन  अर्ज नामंजुर केला आहे. 


   या प्रकरणात वनविभागातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी वि.कोर्टाच्या निर्दशनास आणुन दिले की, वरील प्रकरणात आरोपी गजेंदरीबाईला सहायक वनसंरक्षक मेळघाट प्रकल्प वन्यजिव विभाग यांनी  अकोट न्यायालयातुन प्रोडक्शन वारंट घेवुन मध्यप्रदेशातील मंण्डला जेलमधून ताब्यात घेवुन तीची दि.११.१२.२५ ते १३.१२.२५ पर्यंत प्रथम श्रेणी न्यायालय अकोट यांच्याकडुन वन्य कोठडी घेऊन चौकशी केल्यावर तीला जामीन न देता तिची अकोला कारागृहात रवानगी केली आहे. 


   या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी युक्तीवाद केला की, या प्रकरणात इतर साथीदार आरोपीपैकी आरोपी मनरु उर्फ बदलु बंसारी पल्टे पवार,अरकाश दरकाश चव्हाण व रंजीत मंगतराम भाटीया या तिघांना अकोट प्रथम श्रेणी न्यायालयाने ३ वर्ष सक्त मजुरी व १० हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी गजेंद्रीबाई हिच्यावर देखील अकोट प्र.श्रेणी न्यायालयात हे प्रकरण चालविल्यास तिच्या विरुध्द उपलब्ध असलेलया पुराव्यावरुन तिलासुध्दा शिक्षा होवु शकते.अशा परिस्थीतीत या महिला आरोपीची वन्यगुन्हे करण्याची पार्श्वभुमी पाहता जर जामिनावर सोडले तर ती पुन्हा फरार होईल व पुन्हा तिच्याकडून वन्यजिवांच्या शिकारीची शक्यता नाकारता येत नाही.

   या महिला आरोपीविरुध्द मध्यप्रदेश मध्ये  रानडुक्कर शिकार प्रकरण दाखल असुन तिची गुन्हेगारी पार्श्वभुमी आहे. मेळघाट अकोट वनपरीक्षेत्र परीसरात वाघाच्या शिकारी प्रकरणात ही महीला आरोपी २०१२ पासुन फरार आहे व तत्कालीन फिर्यादीमध्ये या महिला आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात शिक्षा झालेले आरोपी यांनी वनअधिकारी यांचेसमोर दिलेल्या कबुली जवाबामध्ये या महिला आरोपीचे नाव नमुद केले आहे. तसेच सदरहू महिला आरोपी स्वताःची ओळख बदलुन मध्यप्रदेशमध्ये राहत होती व तिने स्वतःच्या नावामध्ये बदल केला असून ते तीने मध्यप्रदेश येथील सक्षम वन्यअधिकारी यांचे समक्ष कबुल केले आहे. या प्रकरणात तपासअधिकारी टेकाडे,सहायक वनसंरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजिव विभाग अकोट ह्यांना तपासा दरम्यान या आरोपीने स्वतःहुन वाघाची शिकार केल्यानंतर वाघाची हाडे व चामडी ठेवल्याचे ठिकाण दाखविले असून या महिला आरोपीने सक्षम वनअधिकारी यांचे समक्ष वाघाची शिकार केल्याबाबत कबुली जवाब दिला असून तो कबुली जवाब पुरावा म्हणुन ग्राहय आहे. वाघ हा प्राणी केंद्र शासनाच्या सुची मध्ये पहिल्या क्रमांकावर आरक्षीत वन्य प्राणी आहे. अशा दुर्मीळ होत असलेल्या वन्यप्राण्याची आरोपीने शिकार केल्याने तिचा जामीन अर्ज नामंजुर करावा असा युक्तीवाद सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला.दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर अकोट सत्र न्यायालयाचे न्या.बी.एम.पाटील यांनी वाघाच्या शिकारी प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड महिला आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या