आय.पी.एल. क्रिकेट सामन्यावर सट्टा लावण्याच्या तसेच त्याकरीता इतर लोकांचे बैंक अकाउंट वापरुन फसवणुक केल्याच्या प्रकरणात आरोपीने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे अकोला जिल्हयात क्रीकेटवर सट्टा लावणा-यांचे धाबे दणाणले आहे. सदरहू आरोपी गुन्हा घडल्यापासुन फरार आहे.
अकोट शहर पोलीस स्टेशनला दाखल अप. क्र. १०७/२०२५, कलम ४.५ महाराष्ट्र जुगार अधिनियम व सहकलम ३१८(४), ४९ भान्यासं. यामधील आरोपी प्रतिक मनोहर राउत, वय २७ वर्ष, रा. हिरुळ पुर्णा ता. चांदुरबाजार जि.अमरावती याने अकोट येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता आपल्या वकिलांच्या मार्फत अर्ज दाखल केला होता.
मात्र अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी ह्या आरोपीचा हा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करतांना न्यायालयात युक्तीवाद सादर केला की, या प्रकरणात फिर्यादी पो.उप.नि.निलेश बारहाते पो.स्टे.अकोट शहर यांनी फिर्याद दिली की, पो.स्टे हददीतील एका गुन्हया तील विचारपुस करीत असतांना एका रो हाउस मध्ये ५ इसम संशयास्पद स्थितीत दिसुन आले असता पो. अधिक्षक यांचे रितसर वारंटद्वारे कार्यवाही करीत असताना,एका खोलीमध्ये दोन इसम त्यांचे समोर लॅपटॉप वर काम करतांना मिळुन आले तसेच इतर ३ इसम मोबाईल वर काम करतांना मिळुन आले. पंचासमक्ष पाहणी केली असता दि.३०.०३.२५ रोजी दुपारी ३ वाजता होणा-या दिल्ली विरुद्ध हैद्राबाद या आय.पी.एल सामन्यावर सटटा खेळतांना दिसुन आले. त्यांना सदर क्रिकेट सटयासाठीचे मोबाईल व लॅपटॉप तसेच किकेट सटटयासाठी वापरत असलेले बैंक अकाउंट कुणाचे आहे. याबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचे लॅपटॉप व मोबाईल त्यांना प्रतिक राउत याने पुरविले असल्याचे व त्याचे सांगण्यावरुन सदरचा सट्टा चालवित असल्याचे सांगितले. तसेच मोबाईलमध्ये वापरत असलेले बैंक अकाउंट बाबत विचारले असता त्यांनी सदर खाते इतर लोकांचे फसवणुक करुन सदर बँक खाते सटटयाकरीता वापरत असल्याचे सांगितले. यातील आरोपी हे आरोपी प्रतिक राउत याचे सांगण्यावरुन आय.पी.एल.चे सामन्यावर ग्राहकांना लिंक पाठवुन ग्राहकांकडून पैशाची खायवाडी करुन क्रिकेट मॅचवर सट्टा खेळतांना मिळुन आले. तसेच सदर आरोपीतांनी क्रिकेट सटटयाची खायवाडी करीत इतर लोकांचे बैंक अकाउंट वापरुन त्यांची फसवणुक केली,तसेच सदरचा सट्टा खेळण्यासाठी लागणारे मोबाईल व लॅपटॉप हे साहीत्य आरोपी प्रतिक राउत याने उपलब्ध करुन दिले व शंतनु चरपे याने सदर आरोपीतांना किकेट सटटा खेळण्यासाठी त्याचे मालकीची जागा उपलब्ध करुन दिली. अशा फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करून तपासात घेण्यात आला.
सरकारी वकील अजित देशमुख यांनी असा युक्तीवाद केला की, सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे. सदर आरोपी हा घटनेपासुन फरार आहे त्याने तपासात सहकार्य केले नाही. तसेच आरोपी याने त्याचे साथीदारासोबत संगनमत करुन तसेच कट कारस्थान रचुन फसवणुक केली आहे. तसेच सदर आरोपी यास इतर कोणी साथीदार आहेत का याबाबत सखोल विचारपूस करण्याकरीता या आरोपीला पोलीस कस्टडीमध्ये चौकशी होणे आवश्यक आहे. सदर गुन्हयामध्ये फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या आरोपीला जामीन मिळाल्यास तो न्यायालयात हजर राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे आरोपीचा अटकपूर्व जमानत अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर वि. न्यायालयाने आरोपी प्रतिक राउत याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे अकोट पोलीस या फरार आरोपी प्रतिक राउत याला कधी अटक करतात याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागलेले आहे.


0 टिप्पण्या