ज्येष्ठ काँग्रेस नेत्याच्या खूनप्रकरणी फरार आरोपीच्या परिवाराची भेट घेण्यामागे जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे यांचा हेतू काय.?




   गेल्या पाच महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर त्यांच्या मोहाळा या राहत्या गावातच जीवघेणा खुनी हल्ला करण्यात आला होता,आणि दुसऱ्या दिवशी त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.


    त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांना काही तासांतच अटक करण्यात यश मिळाले होते.मात्र त्याचदिवशी हिदायत पटेल यांच्या पुतण्याने अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत हिदायत पटेल यांनी मृत्यूपूर्वी त्यांना सांगितल्या नुसार पकडण्यात आलेल्या आरोपीसह इतरही काही लोकांची नावे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आली होती.


   देण्यात आलेल्या तक्रारीनुसार नोंदविण्यात आलेल्या एफआयआर मध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आणि अकोट शहराचे माजी नगराध्यक्ष संजय रामदास बोडखे यांच्या नावाचा देखील समावेश आहे.

    काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना जीवे मारण्याबाबत गुन्हा दाखल होताच ह्या सर्व लोकांनी फरार होण्यातच आपले हित पाहिले होते. प्रा.संजय रामदास बोडखे हे देखील तेव्हापासून फरारच असून अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठीचे आता पर्यंतचे त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत.तर १९ जानेवारी २०२६ ला महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार ऍड.गणेश पाटील यांनी संजय बोडखे यांना काँग्रेस पक्षातून तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याची कारवाई देखील केली आहे.


    हिदायत पटेल यांच्या मृत्यूनंतर काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या गावी जाऊन परिवाराचे सांत्वन करीत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी ह्यासाठी स्थानिक पोलिसांना देखील काही निर्देश दिले आहेत.मात्र तरीही त्यातील काही आरोपी अद्यापी बाहेरच आहेत हा भाग अलाहिदा.



     गेल्याच आठवड्यात अकोला जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी प्रकाश तायडे यांची नियुक्ती करण्यात आल्यावर त्यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेताच सर्वप्रथम अकोट तालुक्याचा दौरा केला ह्या दौऱ्यात त्यांच्याकडून हिदायत पटेल यांच्या कुटुंबीयांची भेट घेणे अपेक्षित असताना मात्र त्यांनी तसे काही न करता हिदायत पटेल यांच्या खूनप्रकरणी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेले फरार आरोपी असलेले संजय रामदास बोडखे यांच्या परिवाराची सदिच्छा भेट घेतली.


   "अकोट तालुक्यातील काँग्रेसप्रेमी व हिदायत पटेल यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना त्यांच्या मृत्यूचे दुःख आहेच परंतु काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे यांनी अकोटमध्ये येऊनही पटेल यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन न करता उलट पटेल यांच्या खुनाचा ज्यांच्यावर आरोप आहे,त्या फरार असलेल्या संजय रामदास बोडखे यांच्या परिवाराची सदिच्छा भेट घेण्यामुळे  जास्त दुःख झालेले आहे."


    ज्या हिदायत पटेल यांनी आपले सगळे आयुष्य काँग्रेससाठी खर्ची घातले त्याच पक्षाच्या एका नेत्याकडून त्यांच्या परिवाराच्या दुःखावर सांत्वनाची फुंकर न घालता उलट त्यांच्या खुनाचा ज्या व्यक्तीवर आरोप असून तो फरार आहे,त्याच व्यक्तीच्या परिवाराची भेट घेऊन पटेल परिवाराच्या जखमेवर "मीठ चोळण्या"चे काम करण्यात आले आहे.ही बाब काँग्रेस पक्षच नव्हे तर हिदायत पटेल यांच्यावर प्रेम करणाऱ्या व  सहकार परिवारातील अनेकांच्या "जिव्हारी" लागली आहे.



   प्रकाश तायडे हे जून जाणते राजकारणी व्यक्ती आहेत.त्यांना ही बाब कळत नसेल अथवा ह्या बाबत त्यांना काहीच माहिती नाही असे म्हणणे "चुकीचे ठरेल".आता इतक्यात म्हणजेच आणखी चार वर्षे तरी जिल्हा परिषद वगळता कोणतीच निवडणूक तोंडावर नाही.मग त्यांना "बोडखे परिवाराची भेट घेण्याची आताच घाई का झाली.?" हा फार मोठा प्रश्न आजतरी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात "थैमान" घालत आहे.

   प्रकाश तायडे ह्यांनी ही भेट घेऊन "काय साध्य केले" हे त्यांचे त्यांनाच ठाऊक,मात्र त्यांनी अध्यक्ष झाल्याबरोबर पक्षात "फुटीची बीजे" पेरणे सुरू केल्याची ही नांदी असल्याची सर्वत्र चर्चा आहे.शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदाचा मान मिळताच त्यांनी "बेरजेचे राजकारण करण्याऐवजी वजाबाकी" व जातीपातीचे राजकारण सुरू केल्याची मात्र कुजबुज आहे.

    ह्या भेटीवर प्रकाश तायडे जे काय द्यायचे ते स्पष्टीकरण देतीलच मात्र ते सगळ्यांनाच "पटेल" ह्याची कोणतीच खात्री आज तरी देता येणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या