२ कोटींच्या लाचेतील ५० लाखांचा १ ला हफ्ता घेणाऱ्या पीएसआय चिंतामणीला रंगेहाथ अटक...


    राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकताच दक्षता सप्ताह साजरा केला आहे.ह्या सप्ताहात लाचखोरीबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये जागृती करीत असतानाच राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून भ्रष्टाचार करून पैसे घेणार नाही अशी शपथ देखील घेण्यात आली आहे.

   मात्र हा सप्ताह संपता बरोबर राज्य पोलिस दलातील कायद्याचे पालन करण्याची व करवून घेण्याची ज्याची जबाबदारी आहे त्याच पोलिस उपनिरीक्षकाने चालू आर्थिक वर्षातील एसीबीच्या रेकॉर्डवरील सर्वांत मोठी लाचेची मागणी करून त्यातील पहिला हफ्ता हातोहात घेत असतानाच त्याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली आहे.

    प्रमोद चिंतामणी,वय ३५ वर्ष, पोलिस उप निरीक्षक,नेमणूक आर्थिक गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, रा.फ्लॅट नंबर ५०४, सोपान रेसिडेन्सी,गंगोत्री पार्क, दिघी रोड,भोसरी,पुणे.तर मुळगाव कर्जुले (हर्या) ता.पारनेर जि.अहिल्यानगर, असे ह्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

    यातील व्यवसायाने वकील असलेल्या  तक्रारदाराने त्यांचे पक्षकारांच्या वतीने ही तक्रार दिली असून त्यांच्या पक्षकारांच्या  विरुद्ध बावधन पोलीस स्टेशनला गु.र.न.२५६/२०२५  कलम ३१६(२), ३१६(५),३१८(४), ३३६(२), ३१६(३),३३८,३३९,३(५) नुसार गुन्हा दाखल झालेला आहे 

     ह्या दाखल करण्यात आलेल्या  गुन्ह्यामध्ये पक्षकारांच्या वडिलांना सुद्धा अटक झाली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. 
    
   सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड येथील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याच्याकडे आहे. 
    
    सदर गुन्ह्यामध्ये तक्रारदारांच्या पक्षकाराला मदत करण्यासाठी व पक्षकारांच्या अटकेतील वडिलांच्या जामीन अर्जावर जामीन मिळेल असा "से" दाखल करण्यासाठी यातील लाचखोरपोलीस उपनिरीक्षक  प्रमोद चिंतामणी, ह्याने तक्रारदाराकडे स्वतःसाठी २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पुणे येथे दिली होती.
   
  तसेच याबाबत लाचखोर पीएसआय विरुद्ध  एसीबीकडे तक्रार करण्याबाबतचे अधिकार त्यांच्या पक्षकाराने त्यांना दिल्याचे लेखी पत्र सादर केले आहे.

  एसीबीच्या कार्यालयात दि.१३/१०/२०२५ रोजी प्राप्त झालेल्या लेखी तक्रारीच्या अनुषंगाने दि.२७/१०/२०२५ रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता पडताळणीमध्ये आरोपी पीएसआय चिंतामणी याने पक्षकराकडून तक्रारदार वकिलाला मिळणाऱ्या 'फी'चा अंदाज घेतला तसेच पक्षकारांच्या बँक खात्यात शिल्लक रकमेचा अंदाज घेऊन लाचखोर प्रमोद चिंतामणी याने तक्रारदार यांना त्यांच्या पक्षकाराला गुन्ह्यात मदत करण्यासाठी व त्या गुन्ह्यात अटकेत असलेले पक्षकारांच्या वडिलांच्या जामीन अर्जावर पाहिजे तसा "से" देण्यासाठी स्वतःसाठी दोन लाखाच्या प्राथमिक लाच मागणीमध्ये अचानकपणे वाढ करून "दोन कोटी रुपयांची लाच" मागितली.त्यापैकी एक कोटी स्वतःसाठी व त्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना एक कोटी असे दोन कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
   
   तसेच पीएसआय प्रमोद चिंतामणी याने तक्रारदाराकडे वरील कारणासाठी मागितलेल्या दोन कोटी रुपयांच्या लाच रकमेपैकी ५० लाख रुपयांचा पहिला हप्ता लवकरात लवकर देऊन उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरल्याचे निष्पन्न झाले.

    त्यानुसार आज  दि.०२/११/२०२५ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान लाचखोर पीएसआय प्रमोद चिंतामणी ह्याला उंटाड्या मारुती मंदिरासमोर,रस्ता पेठ, पुणे शहर येथे तक्रारदाराकडून लाच मागणी पडताळणी कारवाईदरम्यान मागितलेल्या दोन कोटी रकमेतील ठरलेल्या ५९ लाखाच्या पहिल्या हप्ता रकमेपैकी ४६,५०,००० रुपयाची लाच तक्रारदाराकडून स्वीकारली असता त्याला पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले.
                           
   लाचखोर पीएसआय प्रमोद चिंतामणी ह्याची अंगझडती घेतली असता स्वीकारलेली  लाच रक्कम ४६,५०,०००  रुपये (त्यामध्ये १,५०,००० रुपये रकमेच्या खऱ्या नोटा आणि ४५,००,००० रुपयांच्या रकमेच्या (खेळण्यातील नोटा), सॅमसंग fold व अँपल कंपनीचा आयफोन असे दोन मोबाईल फोन,रोख ३६०० रुपये तसेच शासकीय ओळखपत्र आढळून आले आहे.लाचखोर आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचे दोन्ही मोबाइल तपासकामी जप्त करण्यात आले आहेत. 

   आरोपीच्या पीएसआयच्या घराची झडती घेण्यासाठी  पथक तात्काळ रवाना करण्यात आले आहे असून घर झडतीची प्रक्रिया सुरु आहे.
 
   सदरहू लाचखोर पीएसआय प्रमोद चिंतामणी ह्याच्या विरुद्ध समर्थ पोलीस स्टेशन,पुणे शहर आयुक्तालय, येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कालमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

   सदरहू यशस्वी सापळा कारवाई दयानंद गावड़े,पोलिस उप अधीक्षक,यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी अविनाश घरबुडे,पोलीस निरीक्षक, सापळा अधिकारी
प्रसाद लोणारे,पोलीस निरीक्षक,यांच्या पथकातील पोशि. भूषण ठाकुर, रवि दिवेकर 
मपोशी.सुप्रिया काळे, प्रवीण तावरे, विकास आडके, चालक पोशी. दीपक दिवेकर व 
चालक ASI चव्हाण यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या