राज्य शासनाच्या महसूल विभागातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांना शासनाकडून दिवाळीचे बक्षीस पदोन्नतीच्या रुपात मिळाले असून या करिता राज्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाल्याने निवडणूक आयोगाच्या कृपेनेच ही मुदतपूर्व पदोन्नती मिळाली आहे.
सन २०२५-२६ या वर्षाच्या निवडसूची करीता तहसिलदार संवर्गातून उप जिल्हाधिकारी संवर्गात तदर्थ पदोन्नती देण्याच्या अनुषंगाने महसूली विभाग संवर्ग वाटपासाठी पसंती संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकतीच मागविण्यात आली आहे.
सन २०२५-२६ या वर्षाच्या निवडसूची करीता तहसिलदार संवर्गातून उप जिल्हाधिकारी संवर्गात तदर्थ पदोन्नती देण्याची बाब बऱ्याच काळापासून शासनाच्या विचाराधीन होती. मात्र सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असल्याने उप जिल्हाधिकारी संवर्गातील रिक्त असलेली निवडणूक निर्णय अधिकारी यांची पदे पदोन्नतीने भरणे आवश्यक होते. राज्य निवडणूक आयोगाने उप जिल्हाधिकारी संवर्गातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची राज्यातील एकूण ११२ पदे रिक्त असल्याचे कळविले होते, त्यानुसार उप जिल्हाधिकारी संवर्गाच्या सन २०२५-२६ च्या निवडसूचीतील सेवाजेष्ठतेने आणि विहीत पात्रता पूर्ण केलेल्या ११२ अधिकाऱ्यांना तहसिलदार संवर्गातून उप जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे.
तर राज्यातील उपजिल्हाधिकारी यापदावर पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आल्याने रिक्त होत असलेल्या तहसिलदारांची पदे देखील पदोन्नतीने भरण्यात येत असून त्याकरिता नायब तहसिलदारांची पदोन्नतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याकरिता पात्र असलेल्या अधिकाऱ्यांची यादीच प्रसिद्ध करण्यात येवून पात्र नायब तहसीलदार यांना तहसीलदार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

0 टिप्पण्या