राज्याच्या पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी दिवसेंदिवस अत्यंत बेजबाबदार व निर्दय होत चालले असून त्यांच्या ह्या राक्षसी वृत्तीने निरागस नागरिकांचे मात्र विनाकारण जीव जायला लागले आहेत.त्यामुळे साक्षात यमराजाने ह्यांना फ्रेंचायझी देऊन लोकांचे जीव घेण्याची परवानगी दिली की काय अशी शंका यायला लागली आहे.आजतरी राज्यात सर्वत्र खाकी सर्वसामान्य लोकांचे जीव खायला उठली उठली असल्याचे चित्र आहे.
ठाण्यातील गेल्याच आठवड्यात केलेल्या कामाचे पैसे मिळत नाहीत म्हणून शाळकरी विद्यार्थ्यांना ओलिस धरून त्यांना ढाल बनविणाऱ्या रोहित आर्य ह्याला गरज नसतानाही पोलिसांनी चकमक दाखवून ढगात पाठविल्याचे प्रकरण ताजेच आहे.तर शेजारीच असलेल्या अकोला जिल्ह्यातील ५ पोलिस कर्मचारी व अधिकारी गेल्या वर्षभरापासून कारागृहात बंदिस्त आहेत.तर मागच्याच वर्षी न्यायालयात तारखेवर हजर होत नाही म्हणून काढण्यात आलेल्या पकड वॉरंटनुसार अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे पोलीसांनी पकडून आणलेल्या आरोपीचा पोलिस कोठडीत झालेल्या अमानुष मारहाणीने दवाखान्यात मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती.
अमरावती न्यायालयाने नितेश अशोक मेश्राम,वय ३२ वर्ष, रा. मिलींद नगर, चांदूर रेल्वे, याच्याविरुद्ध १३ जून २०२४ ला
न्यायालयात हजर करण्यासाठी पकड वॉरंट काढले होते. चांदूर रेल्वे पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत दि.१० जून २०२४ रोजीच मृतक नितेश मेश्राम ह्याला पकडून पोलिस कोठडीत ठेवले होते. पोलिस कोठडीत ठेवण्यापूर्वीच त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणीही करण्यात आली होती. चांदूर रेल्वे पोलिसांनी दिनांक ११ जून रोजी पहाटे दोन वाजता निलेश मेश्राम याला अटक दाखवित पोलिस ठाण्यातील कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते. सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत आरोपीची देखरेख पोलिस कॉन्स्टेबल प्रविण मेश्राम, असीम गवळी, अमोल धोहे, प्रशांत डोके आदीं शिपायाकडे होती. दुपारी आरोपीला कोर्टात हजर करण्यासाठी बाहेर काढले असता त्याला चक्कर आल्याने तो खाली कोसळला. त्यानंतर त्याला चांदूर रेल्वेच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याच्या उजव्या खांद्याची हाडे तुटल्याचे सांगत पुढील उपचारासाठी अमरावती सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले होते,मात्र,पोलिसांना त्याला न्यायालयात हजर करण्याची घाई झाल्याने अटक करण्यात आलेल्या नितेश मेश्राम ह्याला उपचारासाठी भरती न करता न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाने त्याची शारीरिक अवस्था पाहता त्याला उपचाराची गरज लक्षात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात यावे असे आदेश दिले. मात्र चांदुर रेल्वे पोलिस त्याला त्याच दिवशी संध्याकाळी सहाच्या वाजताच्या दरम्यान अमरावती कारागृहात घेऊन गेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नितेश मेश्राम ह्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला इर्विन रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान १३ जून रोजी सायंकाळी पाच वाजून बावीस मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला.
मृतक नितेश मेश्राम याची वृद्ध आई त्याला अमरावतीच्या इर्विन हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी गेली असता पोलिसांनी तिला त्याच्यापर्यंत जावू दिले नाही,त्याचा मृत्यू झाल्याची बाब देखील लपवून ठेवण्यात आली होती.अखेर खरे काय ते माहित झाल्याने तिला ह्या गोष्टीचा प्रचंड धक्का बसला.त्याचवेळी त्याठिकाणी जमा झालेल्या मृतक नितेश मेश्रामच्या नातेवाईकांनी चांदुर रेल्वे पोलिसांवर नितेशच्या मृत्यूला जबाबदार धरीत त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात यावी अन्यथा मृतकावर अंतिम संस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली होती.
पोलिसांकडून मात्र पोलिस कोठडीत झालेल्या मारहाणीने नितेशचा मृत्यू झाल्याची बाब सतत नाकारल्यामुळे मृतकाचे नातेवाईक व मीडियाच्या वाढत्या दबावामुळे राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घेऊन केलेल्या स्वतंत्र चौकशीत नितेश मेश्राम ह्याची पोलिस कोठडीत झालेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
चांदूर रेल्वे पोलिसांकडून पोलिस कोठडीत झालेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम अहवालात स्पष्ट झाले असून, या प्रकरणी तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलिसांवर हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ह्या आरोपींमध्ये २ महिला पोलिस शिपायांचा देखील समावेश आहे.
नितेश मेश्रामच्या पोलिस कोठडीतील मृत्युप्रकरणी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमधील तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा काल दिनांक १ नोव्हेंबर २०२५ ला दुपारी २ वाजताच्या दरम्यान दाखल करण्यात आल्याने अमरावती ग्रामीण पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.नितेश मेश्राम ह्याच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या दोषी पोलीसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मेश्राम कुटूंबीय गेल्या दीड वर्षांपासून संघर्ष करीत होते.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार अजय कवडु अहिरकर, पोहवा. राजकुमार जैन, पोशि. विशाल मुकुंद रंगारी, पोहवा. प्रविण रामदास मेश्राम, पोशि. अलीम हकिम गवळी, अमोल अमृत घोडे, प्रशांत ढोके व दोन महिला कर्मचारी यांच्यासह पोलीस स्टेशनमधील इतर अनोळखी पोलीस यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चांदूर रेल्वे येथील नितेश मेश्राम याच्या मृत्यूप्रकरणी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी चांदूर रेल्वे येथे मेश्राम कुटुंबीयांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. यानंतर या प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात यावे, अशी शिफारस शासनाला करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली होती. ॲड. मेश्राम यांनी नितेश मेश्राम यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली होती. आयोगाकडे प्राप्त तक्रारीनुसार याप्रकरणी चौकशी करण्यात आली. तसेच डॉक्टर, सुरक्षा रक्षक, इर्विनच्या बाह्यरुग्ण विभागातील कर्मचारी यांचे देखील बयाण नोंदवीण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी तपासात निष्काळजीपणा केल्याने त्यांच्याविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल करावे, तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश अनुसूचित जाती जमाती आयोगातर्फे मार्च महिण्यात देण्यात आले होते. पोलिसांनी केलेली कार्यवाही आणि बयानातील तफावत आयोगाला आढळून आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून अनुसूचित जाती जमाती आयोगाने या प्रकरणाची योग्य दखल घेत पारदर्शकपणे चौकशी केल्याने अखेर या प्रकरणात नितेश मेश्रांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खुनासारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

0 टिप्पण्या