गेल्या काही वर्षांपासून राज्यात मागणाऱ्यांची नवीनच जमात उदयास आली असून त्या जमातीने खऱ्या व गरजवंत मागणाऱ्या लोकांनाही (अर्थात भिकारी) मागे टाकले आहे.ही जमात फक्त वर्षांतून एकदाच म्हणजेच दिवाळीलाच मागण्यासाठी बाहेर पडते आणि वर्षभर पुरेल इतके आपल्या गाठीशी बांधून ठेवते.
रुपये दोन रुपये मागणारे हे लोकं दुसरे काही करता येत नसल्याने म्हणा वा हाता पायाने अपंग असल्याने मागून आपले जीवन जगतात.मात्र ह्या नव्या जमातीचे तसे काहीच नसून ही जमात चक्क महागडे फोन हातात घेऊन दुचाकी,चारचाकी वाहनाने समोरच्याकडे जाऊन मागते.अर्थात जेव्हढी मोठी गाडी तेव्हढे जास्त पैसे मिळतात त्याच्या रुतबा व उपद्रव मूल्यावरून मागणाऱ्याचा आणि त्याच्या मागणीचा विचार होतो.
दोन नंबरचे धंदे करणारे व पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी ही ह्यांची मागण्याची आवडती ठिकाणे आहेत. त्यांच्याकडे मागायला गेल्यावर ह्यांचा नेहमीचा आणि आवडीचा संवाद असतो."काय साहेब खूप दिवसांनी आलो आहे,यावर्षी जरा वाढवून द्या.महागाई खूप वाढली आहे,सगळ्यांचेच भाव वाढले आहेत.तुमची कमाई आणि हफ्ते सुद्धा वाढले आहेत.आम्हालाही काही वाढवून द्या". साहेब सुद्धा यांच्यापेक्षा जास्त "घाट" पाहून आलेले असतात.तेही सांगतात सगळ्यांच्याच "डिमांड" वाढल्या आहेत. वरच्यांनाही द्यावेच लागतात,"मिठाई" पाठवावीच लागते.तुम्हाला मध्ये पुन्हा देतो.आता भागवून घ्या.
साहेब मग ते कुठलेही आणि कोणत्याही विभागातील असो त्यांना मात्र हे दरवर्षी प्रमाणे नेहमीचेच झालेले असते.तेही त्याला अनेक कारणे सांगून थोडेफार देवून तर नवख्याला चक्क "टरकावून" लावतात,मात्र जे जास्त "उपद्रवकारी" असतात त्यांना त्यांच्या "लायकी" नुसार द्यावेच लागतात.
"धंदेवाले व व्यावसायिक" ह्यांना देखील दरवर्षीचे हेच दुखणे असून त्यांनाही काहीतरी तरतूद करून ठेवावीच लागते.नाहीतर हे मागणारे पुढे विनाकारण त्रास देतात व मग त्यापेक्षा जास्त खर्च होतात.ह्या धंदेवाल्यांकडे ह्या मागणाऱ्या लोकांच्या फक्त "दोनच कॅटेगरी" असतात,त्या म्हणजे "चवनी छाप व कलदार".ज्याची त्याची लायकी पाहून द्यावेच लागतात.पावसाळी नव्हे तर दिवाळीला उगवलेल्या ह्या छत्र्यांवर दोन चार थेंब पाणी टाकावेच लागते.नाही टाकले तर ह्या छत्र्या केव्हा उलट्या होतील, काहीच सांगता येत नाही.
ह्या वर्षी जरी राज्यात महापुराने थैमान घातले असेल गणपती,नवदुर्गा बंदोबस्तात धंदे बंद ठेवावे लागले असतील किंवा वसुलीकडे लक्ष न दिल्याने कुणी मध्येच हात दाखविला असेल,तरी देखील दिवाळीला ह्या मागणाऱ्या लोकांना नाराज करून चालत नाही.द्यावेच लागतात.
अनेक शहरात तर काही मागणाऱ्यांनी ह्या वसुलीसाठी चक्क मानसेच ठेवली असून त्यांची मस्तपैकी चांदी होत आहे.ह्यालाच सरळ सरळ भाषेत "तेरी भी चूप मेरी भी चूप" असे म्हणतात.काही मागणारे तर चक्क त्यांना जेव्हढे पाहिजे तेव्हढे नाही दिले तर पाहून घेण्याचीही भाषा वापरतांना ह्या वर्षी आढळून आले आहेत.
काही ठिकाणी तर ज्या साहेबांनी ह्या मागणाऱ्याच्या "ढुंगणावर लाथ मारून त्यांच्याच ठाण्यात चार दिवस त्याचा पाहुणचार केला तोही चवनी छाप" ह्याच साहेबांना मला इतकेच पाहिजेत,कमी चालणार नाहीत.असे म्हणतो तेव्हा त्याच साहेबांची आणि त्यांच्या "साहेबगिरी"ची कीव करावीशी वाटते.
ह्या मागणाऱ्या लोकांत देखील चक्क साडे बारा जाती असल्याचे आजच माहीत पडले आहे.ह्यातील काही समजदार,इज्जतदार, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे परिचित अथवा त्यांच्याकडे ऊठबस करणारे,काही वरच्या अधिकाऱ्यांनी फोन करून सांगितलेले.तर काही कधीही न दिसलेले,संपर्कात नसलेले, तर काही कुणीतरी वाटप सुरू आहे, सगळ्यांनाच मिळतात म्हणून आलेले असतात.अर्थात ह्या सगळ्यांसाठीच दरवर्षी बजेट लावून ठेवावेच लागते.मात्र हे बजेट वर जाऊ न देता,आहेत त्यातही काहीतरी उरले पाहीजेत.अशा पद्धतीने दोन दिवसांची ही "जत्रा" चालवितात.
ह्यावर्षी मात्र बरेच साहेब फायद्यात राहिले आहेत कारण काल शनिवार व आज रविवार आल्याने कार्यालयांना तशीच सुट्टी होती.तर साहेब लोकं देखील काम करतात त्या शहरांत राहत नसल्याने आपापल्या गावी निघून गेले असल्याने कुणालाच काहीच देण्याचा प्रश्नच येत नाही.
तर काही अधिकारी सगळ्यांनाच त्यांच्या लायकी प्रमाणे "मिठाईचे डबे" त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था लावून ठेवतात. नगदी कुणालाही देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.अशा लोकांच्या दारात कुणीही कधीच येत नाही.अर्थात त्यांचे खातेच तसे असते.
यावर्षी तर शासनाची तिजोरी रिकामी असल्याने सांबाकडे कंत्राटदारांची बिले द्यायलाही पैसे नाहीत.म्हणून मग यावर्षी मागणाऱ्या लोकांना देखील ही माहिती असल्याने ते तिकडे फिरकले सुद्धा नाहीत,आणि "सांबा"चे अधिकारी फायद्यात राहिलेत.केवळ ह्या वर्षीच नव्हे तर दर वर्षीच फक्त "धंदेवाले" आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या "साहेबां"चीच चांगली दिवाळी असते.आणि हीच गोष्ट ह्या मागणाऱ्या जमातीला माहीत असल्याने त्यांची गर्दी आणि त्यांचा ओढा फक्त ह्याच दोन लोकांकडे असतो.

0 टिप्पण्या