२७ गोवंशापैकी ३ गायी व २ बैलांचा अवैध वाहतूकी दरम्यान मृत्यू व पोलीसांना अंगावर ट्रक घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात आरोपी खुर्शिद जाट याचा जामीन अर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या अप.क्र. ल४३७/२०२४ कलम १०९,२८१,३(५), बीएनएस. तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधि. सहकलम ११(१) (ड) प्राण्यांना करतेने वागविणे अधिनियम सहकलम ११९ महा.पोलीस अधिनियम १९५१ सहकलम १८३,१८४,१७७ मोटार वाहन अधिनियम मधील आरोपी क्र. १ खुर्शिद ईमरान जाट, वय २८ वर्ष, रा. सहारणपूर उत्तरप्रदेश, यांनी २७ (गोवंश) गाय व बैल याचा कत्तलीकरीता निर्दयपणे वाहनामध्ये घेवून जातांना पोलीसांनी पकडण्याचा प्रयत्न करीत सदरहू वाहन पोलीसांच्या अंगावर घालून पोलीसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून चेक नाक्याचे गेट ट्रकने तोडल्याचा प्रकरणात आरोपी खुर्शीद जाट याचा जामीन अर्ज अकोट दिनांक २७.१०.२०२५ रोजी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी नामंजूर केला आहे. वरील आरोपी या प्रकरणात अकोला कारागृहात दि. ०३.१०.२०२४ पासुन बंदीस्त आहे.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध करतांना न्यायालयात युक्तीवाद सादर केला की, या प्रकरणात दि. ०२.१०.२०२४ ला अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमधील पोलीस कॉन्स्टेबल हरीश सोनवणे यांनी आरोपीविरूध्द फिर्याद दिली की, मिळालेल्या गुप्त माहीती वरून तत्कालीन सहायक पोलीस अधिक्षक अनमोल मित्तल यांच्या आदेशावरून अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचा स्टाफ खाजगी वाहनाने पोपटखेड रोडने गेले असता, एक आयशर ट्रक एच.आर.५८ सी ३४३१ भरधाव वेगाने येतांना दिसला. पोलीस स्टाफचे मदतीने त्यास थांबविण्याचा इशारा केला असता,अकोट हिवरखेड मार्गावरील फिजा हॉटेलजवळ सदर वाहन चालकाने ट्रक पोलीसांच्या अंगावर आणुन पोलीसांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तरी देखील पोलीसांनी बरेच दूर अंतरापर्यंत त्या वाहनाचा पाठलाग करून सदर वाहन थांबविले व या गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेवून वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता, त्यामध्ये एकुण २७ जनावरे (गोवंश) निर्देयतेने दोरीने बांधलेली होती. ट्रक व सर्व गोवंश मिळून एकूण २० लाख १७ हजार रूपयाचा हा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला व वरील प्रमाणे तिन्ही आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सरकारी तर्फे युक्तीवाद करतांना सरकारी वकील अजित देशमुख यांनी विद्यमान कोर्टाच्या निदर्शनास आणुन दिले की, सदर प्रकरणात शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी, अकोट यांनी २७ गोवंश यांचे जे फिटनेस प्रमाणपत्र दिले आहे. त्यामध्ये नमुद केले आहे की, हे सर्व २२ गोवंश जे जिवंत आहेत ते उपाशी पोटी असल्याने त्यांना चांगल्या खाद्याची आवश्यकता आहे व त्यांना किमान ७ दिवस तज्ञांच्या निरीक्षणामध्ये ठेवण्यात यावे तसेच यापैकी ५ गोवंशाचा मृत्यु झाला. ज्यामध्ये ३ गायी व २ बैल होते. यांना या आरोपींनी बऱ्याच दुर पर्यंत करकचुन बांधलेल्या अवस्थेमध्ये ट्रक चालविला व तशा परिस्थितीत झालेल्या जखमांमुळे या ५ गोवंशाचा मृत्यू झाला. असा अभिप्राय शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी अकोट यांनी या ५ गोवंशाच्या शवविच्छेदन अहवालामध्ये दिला आहे. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. वरील आरोपी हा मध्यप्रदेश येथून एकूण २७ गोवंश कत्तलीकरीता निर्दयपणे वाहनामध्ये घेवून जातांना मिळून आला. तसेच आरोपीने या गुन्हयात वापरलेला ट्रक भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून पोलीसांच्या अंगावर घालून पोलीसांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपींनी फॉरेस्ट चेक नाका वनमजुर यांनी वाहन थांबविण्यास सांगितले असता, आरोपीने चेक नाका तोडून सिनेस्टाईल गोवंश व ट्रकसह पळून गेले. या गुन्हयात वापरण्यात आलेला ट्रक हा अर्जदार आरोपी याच्याच मालकीचा आहे हे त्याने दाखल केलल्या सुपूर्दनाम्याच्या अर्जावरून सिध्द होते. त्यामुळे हाच अर्जदार आरोपी हा गुन्हा करतेवेळी गुन्हयातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवत होता हे उपलब्ध कागदपत्रावरुन व साक्षीदारांच्या बयानावरुन दिसुन येते.
महाराष्ट्र राज्यात गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात असतांना या आरोपीची गोहत्या करण्याची हिम्मत कशी काय होते.? अशा आरोपीला जामीन दिल्यास त्यांना कायद्याचा धाक राहणार नाही व ते अशाच प्रकारे गोवंश कत्तलीचे गुन्हे पुन्हा पुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आरोपी हा उत्तरप्रदेश येथील आहे. आरोपीला जामीन दिल्यास तो कारागृहातून बाहेर आल्यानंतर फरार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकार पक्ष हा खटला या आरोपीला कारागृहातच बंदिवासात ठेवुन जलद गतीने चालविण्यास तयार आहे. या प्रकरणातील दोषारोपपत्राचे अवालोकन केले असता आरोपींना शिक्षा होण्याइतपत सबळ पुरावा उपलब्ध आहे. त्यामुळे वरील सर्व कारणांमुळे आरोपी खुर्शिद जाट याचा जमानत अर्ज नामंजुर करण्यात यावा असा युक्तीवाद सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर विद्यमान न्यायालयाने आरोपी खुर्शिद जाट याचा जामीन अर्ज नामंजूर केला.


0 टिप्पण्या