अकोल्यात ऐन दिवाळीच्या दिवशी पावसाने मारली "गरिबांच्या पोटावर लाथ"...


   आजच्या जगात "गरिबांचा कुणीच वाली" उरलेला नाही हे अगदी सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे.ज्याचे कुणीच नाही त्याचा देवच वाली असतो असे म्हणतात.परंतु हा देवही गरिबांचा वाली नसून गरीब म्हणून "जन्माला येणेच व्यर्थ आहे" हे आज अकोल्यात झालेल्या अवकाळी पावसाने दाखवून दिले आहे.

   गेल्या काही दिवसांत पावसाने आणि त्यामुळे आलेल्या महापुराने शेतकरी व शेतमजुरांच्या "तोंडचा घास" हिसकावून घेतल्याचे सगळ्या जगाने उघड्या डोळ्याने पाहिले आहे.परंतु ज्या सरकार नावाच्या यंत्रणेने हे सर्व पाहून खोटा का होईना "कळवळा" दाखवित त्यांना काहीतरी मदत देणे अपेक्षित असताना त्यांच्यासोबत "साता जन्माची दुश्मनी" काढल्या गेली आहे.

   आलेल्या पुराने व झालेल्या ढगफुटीने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांसोबतच प्रत्यक्षात पाच फुटांपर्यंत माती सुद्धा वाहून नेली असून आज रोजी ह्या शेतकऱ्यांच्या "उघड्या बोडक्या" शेतात उजाड माळरान तयार झाले असून त्यात पीक घेणे तर सोडा सरळ चालणे देखील "शिडी लावून उंटाच्या ...डीचा मुका" घेण्यासारखी परिस्थिती झाली आहे.

   ह्याच शेतकऱ्यांनी आपल्या वाहून गेलेल्या शेतात माती दिसेल तिथे दिवाळीच्या खर्चासाठी "फुल नाहीतर फुलाची पाकळी" म्हणून झेंडूची फुले लावून आज अकोल्याच्या बाजारपेठेत विकायला ही फुले आणली होती.अगदी बेभाव म्हणजे २५ ते ३० रुपये किलोने ह्याच भिकेला लागलेल्या शेतकऱ्यांच्या "स्वप्नांचा" आणि त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या झेंडूच्या फुलांचा ह्याच शेतकरी आणि कामकऱ्यांच्या पैशांवर गब्बर झालेले व्यापारी व आठव्या वेतन आयोगानुसार लाखांच्या घरात पगार घेणाऱ्या लोकांनी अक्षरशः "बाजार मांडला" होता.

   हे सर्व पाहून ह्या सृष्टीची रचना करणाऱ्या जगन्नियंत्याला देखील हे पहावे गेले नाही आणि त्याने ह्या गोरगरीब लोकांच्या नशिबाचा आणि मांडण्यात आलेल्या "आयुष्याचा हा बाजार" क्षणात उठवून सगळ्यांनाच चांगलीच अद्दल घडविली आहे.

   आज दुपारी दोन वाजताच्या दरम्यान अवकाळी पावसाने सगळ्यांची "दानादान" उडवून देत अकोल्यातील हा बाजार काही क्षणातच उठविला. दिवाळीच्या सणासाठी आणि काहीतरी "किडूकमिडूक" मिळेल ह्या आशेने काल रात्रीपासून "उपाशी तापाशी" जागा पकडून मातीच्या पणत्या, मापले, झेंडूची फुले,पूजेसाठी लागणारे फोटो व इतरही काही वस्तू विक्रीसाठी आणणाऱ्या लोकांना सर्वकाही "आवरून" घरचा रस्ता धरावा लागला आहे.

   तर लाखांची गुंतवणूक करून शासकीय फीचा आणि मनपाच्या जागेसाठीच्या कराचा भरणा करून फटाके विक्रीसाठी आणणाऱ्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यात अवकाळी झालेल्या पावसाने "पाणी आणले" असून त्यांच्याही स्वप्नांचा फटाका "फुसका"च निघाला आहे.

  एकंदरीतच ह्या जगात "गरिबांचा कुणीच वाली" नाही हे पुन्हा एकदा सप्रमाण सिद्ध झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या