पुरवठा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांच्या "नरडयात" नोटांचे बंडल लोटले की राशन दुकानदार समाजातील गोरगरीब व वंचित लोकांच्या "तोंडातील घास" कसे खुल्या बाजारात विकतात हे आजरोजी कुणाही पासून लपून राहिलेले नाही.
अकोला जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पुरवठा विभागामार्फत राशन दुकानांमधून होत असलेला अन्न धान्याचा पुरवठा गरजू लाभार्थ्यांना न देता सरळ सरळ खुल्या बाजारात विकल्या जात असल्याने अवकाळी पावसाने आलेल्या दुष्काळात सर्वसामान्य व गरजू लोकांना उपाशी राहण्याची वेळ आली असून पुरवठा विभागातील अधिकारी मात्र पोट फुटेपर्यंत "मलिदा खात" आहेत.
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सातपुड्याच्या कुशीत जनुना नावाचे गाव असून ह्या गावात सर्वच आदिवासी ग्रामस्थ राहतात. ह्या गावात आजच्या घडीला तेथील बायका व पुरुषांना पावसाळी परिस्थितीमुळे रोजगाराचे कोणतेच साधन नाही.अशात हे सर्व आदिवासी ग्रामस्थ शासनाच्या पुरवठा विभागाच्या रेशन प्रणाली मधून स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणाऱ्या धान्यावर अवलंबून आहेत.मात्र ह्या गावात असलेल्या ह्या रेशनच्या दुकानातून त्यांना दरमहा नियमित कधीच धान्य मिळत नसल्याने कधी कधी उपाशीपोटी राहून जीवन जगण्याची अत्यंत कठीण वेळ त्यांच्यावर आली आहे.
जनूना ह्या आदिवासी गावात जवळच्याच अकोलि जहांगीर गावातील सौदागर नामक रेशन परवाना धारक व्यक्तीच्या वतीने गुड्डू नामक व्यक्ती रेशन दुकान चालवित असून त्याच्या अरेरावी व दादागिरीने सर्व रेशन कार्डधारक आदिवासी वैतागले आहेत.ह्या आदिवासींना शिक्षणाचा काहीच गंध नसल्याने ह्या दुकानदाराची तक्रार कुठे व कोणाकडे करावी हे सुद्धा माहित नसल्याने सदरहू रेशन दुकानदार नेहमीच आपली मनमानी करीत असल्याचे ह्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आज ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे.आज हा दुकानदार सकाळी जनूना गावात आला व त्याने ह्या जवळपास १२१० आदिवासी कार्डधारकांना बोलावून धान्याचे वाटप करीत असल्याचे सांगून पोज मशीन वर ह्या सगळ्यांचे अंगठे (थंब) लावून घेतले.सकाळी ११ वाजतापासून दुपारी ४ वाजेपर्यंत हा सर्व अंगठे लावून घेण्याचा कार्यक्रम चालल्यानंतर हा गुड्डू नामक व्यक्ती जो पसार झाला तो अजूनही ह्या गावकऱ्यांना दिसलाच नाही.अर्थात त्यांना धान्य वाटप केल्याबद्दल मशीनवर अंगठे लावून घेऊन त्यांना कोणत्याच प्रकारचे धान्य न देता बेपत्ता झाल्याने ह्या आदिवासी कार्डधारकांची चांगलीच फसवणूक ह्या दुकानदाराने केली आहे, हे अगदी स्पष्ट झाले आहे.
ह्या आदिवासी कार्ड धारकांना दरमहा ३५ किलो धान्य अंत्योदय योजनेतून वाटप व्हायला पाहिजे मात्र आज त्यांच्या घरात ह्या दुकानदाराने धान्याचा एक दानाही दिलेला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
अकोट तहसील कार्यालयात कार्यरत असलेले पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी व पुरवठा निरीक्षक ह्याच दुकानदारांकडून हफ्ते वसुली करून कधीच कोणत्याही रेशन दुकानाला भेट देत नसल्याने हे सर्व दुकानदार आजच्या घडीला सर्वसामान्य लोकांच्या तोंडातील घास काढून ते धान्य खुल्या बाजारात विकून लक्षाधीश होत आहेत. मात्र गोरगरीब व गरजू नागरिक मात्र उपाशीपोटी दिवस काढत आहेत.
शासन गोरगरिबांच्या हितासाठी राबवीत असलेल्या ह्या योजनेवर देखरेखीसाठी पुरवठा विभाग चालवित असून ह्या विभागाच्या मार्फत संपूर्ण देखरेख केल्या जाते. अकोट येथील तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांची देखील नियमित धान्याचा पुरवठा होतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी आहे.मात्र एसी ऑफिसमध्ये बसून थंड हवा खाणारे हे अधिकारी कधीच कोणत्याच दुकानाला भेटी देत नसल्याने हे दुकानदार गरिबांच्या तोंडचे घास काढून घेतात ही वास्तविकता आहे.
आता ह्या प्रकरणात तरी संबंधित अधिकारी ह्या दुकानदारावर काय कारवाई करता हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे.

1 टिप्पण्या
😒😟😣😠😱😓मादरचोदो कुठे फेडसाल हे पाप 😡
उत्तर द्याहटवा