भातकुलीच्या ठाण्यामधील पो.कॉ.अब्दुल रहिमची "अधुरी कहाणी"...


   जुन्या काळातील एक अत्यंत सुरेल आणि सुरेख असे एक अजरामर गीत आहे, "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी". अगदी ह्याच गीताला शोभेल अशी एक घटना अमरावती जिल्ह्यातील भातकुली याठिकाणी घडली आहे.

  अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असलेले भातकुली पोलिस ठाणे आहे. अंदाजे २५/३० हजार लोकवस्तीचे हे गाव आहे. ह्याच पोलिस ठाण्यात अब्दुल रहीम अब्दुल करीम नावाचा व्यक्ती पो.हे.कॉ. पदावर नोकरीला आहे. त्याचे थोडेथोडके नव्हे तर ५४ वर्षांचे वय झालेले असून सेवानिवृत्तीला चारच वर्षे बाकी आहेत.त्याचे सगळे काही व्यवस्थित व सुरळीत सुरू होते.मात्र "नीयती"ला हे पाहवले गेले नाही,आणि ह्याच नियतीने योग्य वेळ पाहून आपला "फासा" टाकला व त्या फासात निवृत्तीच्या "उंबरठ्या"वर आपल्या मुलाबाळांसह सुखेनैव जीवन जगत असलेल्या अब्दुल रहिमला चांगलेच अडकवून त्याच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणे केलेल्या नोकरीवर "पाणी फेरले" आहे.आपल्या परिवाराच्या सुखासाठी शिल्लकचे "दोन पैसे कमावण्याच्या नादात" अब्दुल रहिमची "सुखी संसाराची कहाणी मात्र अधुरीच राहिली" आहे.

   नियती कुणाकडून कोणत्यावेळी काय आणि कसे कृत्य करून घेईल हे सांगताच येत नाही.आयुष्यभर इमानेइतबारे,वरिष्ठांच्या शब्दाबाहेर न जाता नोकरी करणाऱ्या अब्दुल रहीमच्या मनात अडीच ते तीन महिन्यांपूर्वी आपल्या एका सहकार्याचे ऐकून "काळेबेरे" आले आणि त्याने त्याच ठाण्यात आरोपी असलेल्या एका व्यक्तीला लाच मागितली. "अडला नारायण धरी गाढवाचे पाय",या उक्तीप्रमाणे त्या आरोपीने मागणी केलेल्या रकमेपैकी १० हजाराची रक्कम त्यावेळी दिली.असे त्या तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे.

   परंतु उर्वरित २० हजार रुपयांची रक्कम भातकुली पोलिस ठाण्यात आरोपी असलेल्या तक्रारदाराला द्यावयाची नसल्याने त्याने थेट अमरावती एसीबीचे कार्यालय गाठले आणि आपली लेखी तक्रार सादर करून संपूर्ण घटनाक्रम कथन केला.

   ह्या प्रकरणातील तक्रारदाराने एसीबीला दिलेल्या तक्रारीची थोडक्यात हकीकत अशी आहे की, यातील तक्रारदार याचे विरुध्द पोलीस स्टेशन भातकुली जि.अमरावती येथे अप.नं.१३७/२०२५ बी.एन.एस कलम १०८,२२९(३).३(५) नुसार गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान तपासी अधिकारी यांनी तक्रारदार यांचे भावाला अटक केली होती तर तक्रारदार यांनी न्यायालयातुन अटकपुर्व जामीन घेतलेला आहे. गुन्ह्याचे तपासी अधिकारी यांनी तकारदार यास दाखल गुन्हयाच्या तपासात मदत करण्याकरीता व "केस ढीली" बनवून न्यायालयात फायदा होईल, त्यासाठी तक्रारदाराकडे ५०,००० रुपयांची मागणी केली होती. तेव्हा १०,००० रुपये आरोपी असलेल्या तक्रारदाराने तपासी अधिकारी यांना दिले होते. परंतु तक्रारदारास तपास अधिकारी यांनी मागणी केलेली उर्वरीत लाच रक्कम द्यावयाची नसल्याने त्यांने दि. ११/०८/२०२५ रोजी एसीबी कार्यालय अमरावती येथे तक्रार नोंदविली होती.

   तक्रारदार याच्या तक्रारीच्या अनुषंगाने दि.११/०८/२०२५ रोजी शासकीय पंच यांचेसमक्ष पोलीस स्टेशन भातकुली जि. अमरावती येथे लाचमागणी पडताळणी कार्यवाही आजमावली असता, पो.हे.कॉ. अब्दुल रहीम अब्दुल कदीर यांनी तकारदार यांना तपास अधिकारी यांचेकडे तपासावर असलेल्या गुन्ह्यात मदत करण्याकरीता २०,००० रूपयाची लाच रक्कमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

   आलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोन शासकीय पंचांसमक्ष पडताळणी केली असता त्यात सत्यता आढळून आली.मात्र पुढे तक्रारकर्त्याने ह्या प्रकरणांत काहीच रस न दाखविल्याने अथवा इतर काही कारणास्तव सापळा कारवाई आयोजित करता आली नाही व प्रकरण थंड बस्त्यात पडले.परंतु तक्रारकर्त्याने जरी माघार घेतली असली किंवा सापळा कारवाई होऊ शकली नसली तरी "हातावर हात देऊन बसतील तर ते एसीबीवाले कसले".?

    अमरावती एसीबीचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप यांनी ह्या प्रकरणाची पुढील चौकशी अकोला एसीबीकडे देऊन अहवाल मागितला होता.त्यानुसार मिलींद बहाकर, पोलीस उप अधिक्षक, प्रविण वेरूळकर पोलीस निरीक्षक, पोलीस हवा.डिगांबर जाधव, अविनाश पाचपोर, पो.शी.किशोर पवार, गोपाल किरडे आणि चालक पो.अंम, सलीम खान यांनी या प्रकरणाची गेल्या दीड महिन्यांत संपूर्ण चौकशी करून पोलिस अधीक्षक ह्यांना नुकताच अहवाल सादर केला.

    त्या अहवालानुसार भातकुली पोलिस ठाण्यातील पो.हे.कॉ.अब्दुल रहीम अब्दुल कदीर, वय ५४ वर्ष, ब.नं. २२, रा. सुर्या पेट्रोलपंप मागे, जाकीर कॉलनी,अमरावती याचेविरूध्द पोलीस स्टेशन भातकुली, पोलीस आयुक्तालय अमरावती शहर, येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या