अकोला जिल्ह्यातील वैराट (राजापुर) येथील पोस्ट ऑफिसच्या सरकारी पैशावर नियत खराब करून त्या पैशांचा अपहार करणा-या फरार आरोपी सहायक शाखा डाकपाल रोहीत सिसोदीयाचा अटकपूर्व जमानत अर्ज अकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने आज फेटाळला आहे.
दहिहांडा पोलीस स्टेशनचे फाईल वरील अप. क्र. २१३/२०२५, कलम ४०९,४२० भादंवि. मधील आरोपी रोहीत रामेश्वर सिसोदीया, वय २३ वर्ष, राहणार फडके नगर डाबकी रोड जुने शहर अकोला, ता. जि. अकोला याने पोस्ट ऑफीस वैराट राजापुर कार्यालयातील रोख रक्कम रुपये ९२,१४४ रुपयांचा उपयोग वैयक्तीक कामासाठी करुन सरकारी पैशाचा अपहार केल्याच्या प्रकरणात दाखल केलेला अटकपूर्व जमानत अर्ज आज दि. १६.१०. २५ रोजी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी फेटाळला आहे.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी आरोपीच्या अटक पूर्व जामीन अर्जाला विरोध करतांना न्यायालयात युक्तीवाद केला की, यातील फिर्यादी गणेश परशुराम सोनुने,वय ४१ वर्ष सहायक डाक अधिक्षक मध्य विभाग अकोला यांनी दहिहांडा पोलीस स्टेशन येथे दि.१०.०७.२०२५ रोजी आरोपीविरूध्द फिर्याद दिली की, आरोपी रोहीत सिसोदीया तात्कालीन सहायक शाखा डाकपाल शिर्ला अंधारे हा शाख डाकपाल म्हणून वैराट राजापुर शाखा डाकघर अंतर्गत ताजनापेठ उपडाकघर येथे कार्यरत असतांना अतिरीक्त रक्कम विनाअनुमती शाखा डाकघर मध्ये ठेवल्यामुळे दि. २१.०६.२४ रोजी उपडाकपाल ताजनापेठ यांनी माहिती दिली की, दि २४.०६.२४ पासुन शाखा डाकपाल वैराट राजापुर यांनी अतिरीक्त रोख रक्कम ठेवल्याची पडताळणी करण्यासाठी वैराट राजापुर शाखा डाकघराला भेट देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मध्यविभागाचे मेल ओव्हरसियर गोपाल ढोरे यांनी दि. २४.०६.२४ रोजी वैराट राजापुर शाखा डाकघराला भेट दिली असता त्यांना असे आढळले की,आरोपी रोहित सिसोदीया याने दिनांक २२.०६.२५ रोजीचा शेवटचा दैनिक हिशोबानुसार शिल्लक रक्कम सादर करण्यास सांगीतले ज्यामध्ये शिल्लक रक्कम रुपये ९२,१४४ रुपये होती.तथापी शाखा डाकघरामधे कोणतीही भौतीक रक्कम शिल्लक आढळली नाही. शाखा डाकपाल वैराट राजापुर यांनी सांगितले की, त्यांचेकडे शाखा डाकघराची रक्कम नाही आणि ते रक्कम (युपीस अवर्गीकृत पेमेंट) म्हणुन नोंदविली व शाखा डाकपाल वैराट येथील रोहीत सिसोदीया यांचेसोबत त्यांचे घरी गेले तेथे असे आढळून आले की, कोणतीही भौतिक रक्कम उपलब्ध नाही. त्यानंतर मेल ओव्हरसियर गोपाल ढोरे यांनी आरोपी रोहित सिसोदिया यांचे निवेदन नोंदविले. नंतर रोहित सिसोदीया यांनी ताजनेपेठ उपडाकघरात युसीआर अंतर्गत ९२,१४४ रुपये रुपये जमा केले त्यामुळे रोहित सिसोदीया यांनी दि.२४.०६.२५ रोजी आपल्या कार्यालयातील रोख रक्कम रुपये ९२,१४४ रुपये कमी ठेवली व सदर रकमेचा उपयोग वैयक्तीक कामासाठी करुन सरकारी पैशाचा अपहार केला.दि.२४.०६.२५ रोजी गोपाल ढोरे यांचे तपासणी दरम्यान निदर्शनास आल्याने त्यांनी पंचनामा वरीष्ठ कार्यालयाचे आदेशानुसार आरोपी रोहीत सिसोदीया यांचे वर सरकारी पैशाचा अपहार केल्यामुळे तक्रार देण्याच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत.त्यानुसार कार्यालयीन चौकशी झाल्यानंतर आरोपीविरुध्द लेखी तक्रार दिल्यावरून वरील प्रमाणे आरोपी विरूध्द कलम ४०९,४२० भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या प्रकरणात तपास पूर्ण झालेला नाही. पोस्ट विभागाच्या कार्यालयीन चौकशी दरम्यान आरोंपी रोहीत सिसोदीया याने लेखी बयान दिले की, "माझ्याकडून चुक झाली आहे हे मी मान्य करतो व सरकारी पैसे पुर्ण भरण्यास तयार आहे". त्यामुळे या प्रकरणात आरोपीची पोलीस कस्टडीमध्ये सखोल चौकशी करणे बाकी आहे. तसेच येवढया मोठ्या शासकीय रक्कमेचे आरोपीने काय केले, याबाबत तपास करणे बाकी आहे. तसेच या प्रकरणात इतर सहकार्य करणारे आरोपी आहेत काय? याबाबत देखील आरोपीची चौकशी करणे आवश्यक आहे. आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे, कारण पोस्ट ऑफीस हे केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असून सर्वसामान्य जनतेचा पोस्टावर विश्वास आहे. या आरोपीला जामीन मंजूर झाल्यास या गुन्हयासंबधीत साक्षीदार लोकांवर दबाब आणू शकतो. तसेच आरोपी हा गुन्हा घडला तेव्हापासून ते अदयाप पावेतो फरार आहे. तसेच आरोपी हा भविष्यात पुन्हा आणखी मोठ्या प्रमाणांत अशाच प्रकारचा गुन्हा करण्याची शक्यता नाकरता येत नाही. तसेच आरोपीकडुन गुन्हयाचा घटनाक्रम जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच या आरोपीला अटकपूर्व जामीन दिल्यास चुकीचा संदेश जावू शकतो. या प्रकरणाचा तपास वरील प्रमाणे करण्याकरिता आरोपीची पोलीस कस्टडीमध्ये विचारपूस होणे आवश्यक असल्याने अटकपूर्व जमानत अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जमानत अर्ज नामंजूर केला. त्यामुळे या फरार आरोपी रोहीत सिसोदीया यास आता दहीहांडा पोलीस कधी अटक करतात याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागलेले आहे.

0 टिप्पण्या