शहरातील हजारो नागरिकांच्या खिशातून कर रूपाने काढलेले कोट्यावधी रुपये आणि नगर पालिकेच्या मालकीच्या असलेल्या अब्जावधी रुपयांच्या मालमत्तांवर "जनतेचे नोकर" असूनही स्वतःला "मालक" समजून बसलेले शासन व सर्वसामान्य जनता यांच्यामधील विश्वासू समजल्या जाणारे "मध्यस्थ" असलेले काही लाचखोर अधिकारीच जेव्हा शासन व जनतेसोबत विश्वासघात करून "कमिशन"च्या रुपांत "दलाली खातात" तेव्हा अक्षरशः ते चित्र "घाणेरड्या नाल्यांमध्ये तोंड खुपसत विष्ठा शोधणाऱ्या डुकरां पेक्षाही वाईट दिसते."
आज बीड जिल्ह्यातील माजलगाव नगर पालिकेच्या अशाच एका लाचखोर चंद्रकांत चव्हाण नामक मुख्याधिकाऱ्याला सहा लाख रुपयांची लाच घेताना छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या संदर्भात अद्यापही एसीबीची कारवाई सुरूच असून छत्रपती संभाजीनगर व बीड एसीबीची पथके कसून तपास करीत आहेत.
माजलगाव नगर पालिकेतील कंत्राटे घेऊन कामे करणाऱ्या एका कंत्राटदाराच्या कामाच्या काही पेंडिंग फाईल क्लिअर करून देण्यासाठी माजलगाव नगर परिषद मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण याने तब्बल १२ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.मात्र ही रक्कम द्यावयाची नसल्याने सदरहू तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या कार्यालयात जाऊन लेखी तक्रार दिली.त्याच तक्रारीच्या सत्यता पडताळणी दरम्यान मांडवली करून १२ लाखाची रक्कम ६ लाखांवर आणण्यात आली. ही सहा लाख रुपयांची रक्कम आजच माजलगाव शहरातील पिताजी नगरी भागातील मुख्याधिकारी चव्हाण भाड्याने राहत असलेल्या घरी देण्याचे ठरले होते. त्यानुसार ६ लाख रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना राहत्या घरीच मुख्याधिकारी चव्हाणला छत्रपती संभाजीनगरच्या एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी दि.१०/०७/२०२५ ला रात्री नऊ वाजेपर्यंत सुरूच होती.या नगर पालिकेत मागील काही दिवसांपासून काहीतरी घडत होते मात्र ते पद्धतशीरपणे दडवल्या देखील जात होते.
गेल्या काही दिवसांपासून बरेच विषय वेगवेगळ्या प्रकारे चर्चेत असतांनाच आता आज नगर पालिकेच्या लाचखोर मुख्याधिकाऱ्या विरूद्ध थेट छत्रपती संभाजीनगरच्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी येवून अटकेची कारवाई केली आहे. यातच सगळे काही आले आहे. छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे आलेल्या तक्रारीनुसार आज गुरूवारी सायंकाळी उशिरा पर्यंत छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पथकाने माजलगाव मध्ये ही कारवाई करीत मुख्याधिकाऱ्याला थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ६ लाखाची लाच रक्कम घेत असताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईने सर्वत्र खळबळ माजली असून यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीच्या टिमने ही कारवाई केली असून त्यानंतर बीड एसीबीची दोन पथके लाचखोर चंद्रकांत चव्हाणच्या घराची झडती घेत आहेत.घरझडतीत आणखी काय काय सापडले याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.




0 टिप्पण्या