समाजातील गोरगरीब व गरजू लोकांना मदत करण्याची भावना आज कुठेच शिल्लक राहिली नसून उलट त्यांच्याच "घशातील घास" बाहेर काढून तो "स्वतः खाण्याची" वृत्ती सर्वत्र वाढली आहे. शासनाच्या गोरगरीब लोकांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्या साठी देखील "दलाली खाणारे" महाभाग या जगात काही कमी नाहीत.तर शासन यंत्रणेत असलेले "झारीतील शुक्राचार्य" त्यांच्या घशात गेलेला घास देखील काढून स्वतःच्या पोटात टाकायला मागे पुढे पाहत नाहीत.
असाच एक किस्सा आज अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील धारणी तालुक्यात घडला असून,एका गरीब व्यक्तीकडून त्याला मंजूर झालेल्या "रमाई घरकुल" योजनेच्या निधीतील तिसऱ्या हफ्त्याचा धनादेश काढून देण्यासाठी पंचायत समितीच्या ग्रामीण आवास योजनेच्या कंत्राटी अभियंत्याने १५ हजार रुपयांची मागणी करून त्याचा १ ला हफ्ता १० हजार रुपयांची लाच घेत असताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडून "जेरबंद" केले आहे.
पंकज रमेश निघोट,वय ३० वर्षे, असे ह्या लाचखोर अभियंत्याचे नाव असून तो धारणी पंचायत समितीत ग्रामिण गृहनिर्माण विभागात (RHE) ह्या कंत्राटी अभियंता पदावर काम करीत आहे.
तक्रारदाराने काल दि. ०९/०७/२०२५ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार तक्रारदार यांना रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झालेले असून त्याचे तिसऱ्या टप्याची रक्कम मंजूर करून त्याचा धनादेश काढून देण्याकरीता पंचायत समिती धारणी येथे कार्यरत असलेल्या पंकज रमेशराव निघोट,रा.धनाई नगर,सुरेश धुर्वे याचे घरी किरायाने, धारणी, जि. अमरावती, मुळ पत्ता रा.शेंदोडा खुर्द,ता. तिवसा,जि.अमरावती ह्याने १५,००० रूपये लाचेची मागणी केली असल्याबाबत लेखी तकार दिली होती.
सदर तकारीची सत्यता पडताळणी दरम्यान आज दि.१०.०७.२०२५ रोजी लाचखोर अभियंत्याने पंचासमक्ष त्यांचे घरकुलाच्या तिसऱ्या टप्याचे रक्कमेचा धनादेश काढून देण्यापूर्वी १०,००० रुपये व धनादेश दिल्यानंतर ५,००० रुपये दयावे लागतील अशी सरळ सरळ लाचेची मागणी करून लाच स्विकारण्याचे मान्य केले.
अमरावती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात धनादेश काढून देण्याकरीता १०,००० रुपयाची लाचेची रक्कम पंचांसमक्ष तक्रारकर्त्याकडून स्विकारत असताना ह्या लाचखोर कंत्राटी अभियंत्याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडून जेरबंद केले आहे.आदिवासी तालुक्यातील गोरगरीब लोकांना "लुटण्याचा धंदा" मांडून बसलेल्या ह्या लाचखोर अभियंत्याविरुद्ध धारणी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरहु कारवाई अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पो.नि.सुजाता बन्सोड, पो.नि.चित्रा मेसरे, पो.नि.ज्ञानोबा फड, पोलीस अंमलदार प्रमोद रायपुरे, शैलेश कडू,आशिष जांभोळे,चालक पोउपनि. सतीश कीटुकले, पोहवा.शेडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.




0 टिप्पण्या