वरूड नगर पालिकेच्या विद्युत अभियंत्याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिला "शॉक"...


   स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरकारी कार्यालयांपेक्षाही फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो हे सगळ्यांनाच माहीत आहे.परंतु सर्वच संबंधितांचे हात एकमेकांच्या हाताखाली दबलेले असल्याने कुणीच कुणाविषयी बाहेर बोलायला धजावत नाही.ह्या ठिकाणी सर्वच काही एकमेकांचे हितसंबंध जोपासून "एकमेका साह्य करू,अवघे धरू सुपंथ" ह्या उक्तीप्रमाणे सर्व कारभार अगदी बिनबोभाटपणे चालत राहतो.

      असाच प्रकार अमरावती जिल्ह्यातील वरूड नगर पालिकेत देखील चालत होता.परंतु देण्या घेण्याच्या बाबतीत थोडे बिनसल्याने हा व्यवहार चव्हाट्यावर आला.विद्युत विभागातील अभियंत्याने त्या विभागातील काम करणाऱ्या कंत्राटदाराला "अगदी खिंडीत गाठून" अव्वाच्या सव्वा लाच अर्थात "कमिशन"ची मागणी केल्याने त्याने चिडून जावून एसीबीच्या कार्यालयात तक्रार दाखल केल्याने ह्या विद्युत् अभियंत्यासह त्याच्या दलालाला देखील एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लाच घेत असताना रंगेहात पकडून चांगलाच "शॉक" दिला आहे.  

   १) महेश मुरलीधर दुपारे,वय ३८ वर्षे, व्यवसाय नौकरी, पद विदयुत अभियंता (वर्ग ३),नगर परिषद,वरूड, जि.अमरावती, राह. इंदिरा गांधी नगर,बिनाकी लेआउट, प्लॉट नं. २८, नागपुर. व २) शरद ज्ञानेश्वर बेलसरे, वय ४४ वर्षे, व्यवसाय कंत्राटी इलेक्ट्रीशन, नगर परिषद, वरूड,जि.अमरावती, राह. संभा पेठ, राजुरा नाका, घर नं. १४२, वरूड, जि.अमरावती अशी ह्या दोघांचीही नावे आहेत.

     तकारदार हे इलेक्ट्रीकल कंत्राटदार असुन त्यांचेकडे एम.एस.ई.डी.सी. एल.चे काम करण्याने लायसन्स आहे. वरूड नगर परिषदेमध्ये नवीन रस्त्यांची कामे चालु असुन त्या रस्त्याचे कामात अडथळा ठरणारे  इलेक्ट्रीक पोल्स व डि.पी. हटविण्याचे कामाचे कॉन्ट्रॅक्ट तकारदार यांना मिळाले आहे. त्याप्रमाणे त्यांची वरूडमध्ये चौधरी मंगल कार्यालय ते पार्डी रोड तसेच शासकिय विश्रामगृह ते मटन मार्केट अशी दोन कामे चालु असुन त्यातील झालेल्या कामाचे ३,००,००० रुपये व २,५०,००० रुपये अशी दोन कामांची बिले त्यांनी नगर परिषद, वरूड येथे सादर केले होते. सदरचे कामाची मोजमाप पुस्तिका मंजुर करून कामाचे बिल मंजुरीकरीता लेखा शाखेत पाठविण्यासाठी यातील आरोपी महेश मुरलीधर दुपारे,विद्युत अभियंता यानी तक्रारदार यांचेकडे एकुण बिल रक्कमेचे ३५ टक्के लाच रक्कमेची मागणी केल्याबाबत तकारदार यांनी दि. १९/०५/२०२५ रोजी एसीबीला तकार दिली होती.


   सदर तक्रारीवरुन दि.२०/०५/२०२५ रोजी शासकिय पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये आरोपी महेश मुरलीधर दुपारे यांनी वरील नमुद बिलांचे कामाचे मोजमाप पुस्तिका मंजुर करून कामाचे बिल मंजुरी करीता लेखा शाखेत पाठविन्यासाठी  २,५०,००० रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १,५०,००० रुपये लाच रक्कम स्विकारण्याची समंती दर्शविली.

    दि.२२/०५/२०२५ रोजी शासकिय पंचासमक्ष आयोजित करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे महेश मुरलीधर दुपारे याने लाचेची रक्कम खाजगी इसम शरद ज्ञानेश्वर बेलसरे,याला स्विकारण्यास सांगितली. त्याप्रमाणे खाजगी इसम शरद ज्ञानेश्वर वेलसरे याने १,५०,००० रुपये लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून पंचांसमक्ष इलेक्ट्रीकल विभागाच्या कार्यालयात स्विकारताना त्याला ताब्यात घेतले, त्याच वेळेला दुसऱ्या पथकाने विद्युत अभियंता महेश मुरलीधर दुपारे याला ताब्यात घेतले आहे.

    दोन्ही आरोपींविरुध्द पो.स्टे.वरूड, अमरावती ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    सदरची कार्यवाही सापळा आधिकारी पो.नि. भारत जाधव व पो.नि. केतन मांजरे,पोलीस अमंलदार उपेंद्र थोरात,वैभव जायले,शैलेश कडु व चालक पोहवा.राजेश बहिरट यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या