२५ नवऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक; बनावट लग्न रॅकेटचा भांडाफोड...



   राजस्थान पोलिसांनी मंगळवारी एका महिलेला अटक केली असून, तिने तब्बल २५ नवऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. ही "लुटेरी दुल्हन" म्हणजेच लुटणारी नववधू अनुराधा नावाची महिला आहे. ती उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्याची रहिवासी असून,तिला मध्य प्रदेशमधील भोपाळ येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आश्चर्य म्हणजे तिच्याविरुद्ध आतापर्यंत फक्त एकच गुन्हा दाखल आहे,तो फक्त राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील मंटौन पोलीस ठाण्यात.

    तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३ मे रोजी विष्णू शर्मा नावाच्या व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, सुनिता (मध्य प्रदेश) आणि पप्पू मीणा (राजस्थान) यांनी त्याला वधू शोधून देण्याचे आमिष दाखवले आणि अनुराधाचा फोटो दाखवून लग्नासाठी राजी केले.

    २० एप्रिल रोजी सवाई माधोपूर कोर्टाच्या परिसरात बनावट लग्न घडवून आणले गेले. यासाठी विष्णूकडून २ लाख रुपये घेण्यात आले. मात्र लग्नानंतर फक्त १२ दिवसांनीच म्हणजेच २ मे रोजी अनुराधा विष्णूच्या घरातून दागिने,रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन फरार झाली.

    पोलीस तपासात उघड झाले आहे की, भोपाळमध्ये बनावट लग्न लावून वधूच्या माध्यमातून वराला लुटणारे एक मोठे रॅकेट कार्यरत आहे. सुनिता आणि पप्पूसारखे ब्रोकर स्थानिक एजंटमार्फत लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या नवऱ्यांचा शोध घेतात आणि त्यांच्याकडून २ ते ५ लाख रुपये घेऊन लग्न लावून देतात. काही दिवसांनी वधू रोख रक्कम आणि दागिने घेऊन निघून जाते.

     अनुराधाला पकडण्यासाठी राजस्थान पोलिसांनी एक बनावट वर तयार केला. एक कॉन्स्टेबल नकली वर म्हणून तयार करून विवाह दलालांशी संपर्क साधला. त्याला अनेक फोटो दाखवले गेले, ज्यात अनुराधाचाही समावेश होता.

    अखेर अनुराधाला भोपाळमध्ये अटक करण्यात आली. ती गब्बर नावाच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करून त्यालाही २ लाखांनी फसवून त्याच्या घरी राहात होती.

    अनुराधाला राजस्थान पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून,या प्रकरणाचा तपास करताना बनावट विवाह रॅकेटमधील इतर सदस्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या