अमरावती शहरातील मौजे नवसारी येथील शासनाने आरक्षित केलेल्या भूखंड प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी चौकशीला वेग दिला असून त्यासंदर्भात महानगरपालिका व अमरावतीच्या तहसीलदारांना पत्र देण्यात आले आहे. काही ठराविक मुद्द्यांवर मागण्यात आलेली माहिती प्राप्त झाल्यावरच या भूखंड घोटाळ्याच्या तपासाला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे.
अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी गेल्याच आठवड्यात महानगरपालिकच्या आयुक्तांना काही मुद्द्यांवर माहिती मागणारे पत्र देऊन आरक्षण क्रमांक ३३,३४ व ३५ चे उपलब्ध असलेले पूर्ण कागदपत्रे मागितले आहेत. मनपाने सदरहू भुखंड कधी व कोणत्या कारणास्तव आरक्षित करून संपादित केला होता? सदरहू भूखंडांवर गेल्या काही वर्षांत भूखंड पाहून त्यांची अवैधरित्या विक्री करण्यात आली आहे,त्याबाबत अमरावती महानगर पालिकेच्या संबंधित विभागाने संबंधित लोकांना पाठविलेल्या नोटिसच्या प्रतींची मागणी केली आहे.यात शासनाचा खरोखर किती महसूल बुडाला ?, रस्ते व नाल्या बांधतांना कोणते निकष ठेवण्यात आलेत ?महावितरण कडून विजेचे कनेक्शन घेतांना मनपाने दिलेल्या नाहारकत पत्राच्या प्रती द्याव्यात, वेळोवेळी त्याठिकाणी असलेले व करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यासाठी दिलेल्या नोटिसेस आणि महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने तेथे कोणती कारवाई केली, ह्याचीदेखील विचारणा करण्यात आली आहे. तसेच अमरावतीच्या तहसीलदारांना दिलेल्या पत्रात नवसारीच्या साझ्यात असलेल्या तलाठ्यांकडे आजपर्यंत किती रहिवाश्यांनी जागा मालकी बाबत नोंदी केल्यात याची विचारणा करण्यात आली आहे.
केवळ पत्र देण्यावरच न थांबता गाडगेनगर पोलिसांनी १९ मे रोजी अमरावतीच्या महसूल आणि महानगरपालिकच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मौजा नवसारी येथील त्या वादग्रस्त गटांची मोका पाहणी करून पंचांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. त्यावेळी फिर्यादी, महानगर पालिकेच्या नगर रचना विभागाचे अधिकारी व नवसारी साझ्याचे तलाठी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.



0 टिप्पण्या