राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अकोला जिल्ह्यातील ६०० अधिकारी व कर्मचारी आरोग्य यंत्रणेचा भार सांभाळत आहेत.प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रमाचे मूल्यांकन उत्कृष्ट असल्याने गेल्या १२ महिन्यात ८ वेळा अकोला जिल्हा आरोग्य सेवेत अव्वल क्रमांकावर होता.मात्र असे असतांनाही जिल्ह्यातील ह्या आरोग्य मिशनच्या कर्मचाऱ्यांना चक्क वाऱ्यावर सोडण्यात आले आहे.
तसेच महासंचालक(अतांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या आदेशाने राष्ट्रीय आरोग्य अभियानचे अधिकारी व कर्मचारी ह्यांचे मासिक मानधन दरमहा १ तारखेस करणे बंधनकारक असल्याचे आदेशीत केले असून सुद्धा गेले अनेक महिन्या पासून मानधन वेळेत होत नाही आहेत.गेल्या ३ महिन्यापासून अधिकारी व कर्मचारी आर्थिक विवंचनेत आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या हिश्शापोटीचे आठशे कोटी रुपये न मिळाल्यामुळे कर्मचार्यांना पगार देता येत नसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.गेल्या तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून एनएचएमच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अकोला जिल्ह्यात एनएचएमच्या विविध योजनांतर्गत डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक, प्रयोगशाळा तज्ज्ञ अशा विविध पदांवर ६०० कर्मचारी काम करत आहेत. त्यांना राज्य सरकारमार्फत मानधन दिले जाते. मात्र तीन महिन्यांपासून हे मानधन मिळालेले नाही.
अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कर्मचारी ह्यांनी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि शहर अध्यक्ष सौरभ भगत ह्यांना निवेदन दिले.ह्याच संदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांनी माहिती घेतली असता शेजारील अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना १५ व्या वित्त आयोगातील राखीव निधीतून मानधन वाटप करण्यात आल्याचे कळले असून,अकोल्यात पण तसे करण्यास प्रशासनास मनसे भाग पाडणार असल्याचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे व सौरभ भगत ह्यांनी कर्मचाऱ्यांना सांगून आश्वस्त केले आहे.



0 टिप्पण्या