पोलिसांचा जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला..



अकोला जिल्ह्यातील अकोट येथील गोवंशाची कत्तल करण्यासाठी मुक्या प्राण्यांची वाहतूक करण्याच्या प्रकरणातील बोलेरो गाडीचा चालक आरोपी मोहम्मद अजिज मोहम्मद रफीक याने पोलीसांच्या अंगावर गाडी टाकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील अटकपूर्व जमानत अर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

सोमवार दिनांक २८.०४.२०२५ रोजी अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला दाखलचे अंप. क्र. ११६/२०२५, कलम १०९,२८१,१३२, २२१,३(५) भान्यासं. सहकलम ५(अ), (बी), ९ प्राण्यांचा छळ संरक्षण अधिनियम सह. ११(१), (सी) (डी) (जी) यामधील अर्जदार,आरोपी मोहम्मद अजिज मोहम्मद रफीक, वय २७ वर्ष, राहणार फातिमा हॉस्पीटल जवळ अकोटफैल अकोला ता. जि.अकोला याने १२ गोवंश कत्तली करिता इतर आरोपींसोबत संगणमत करून त्यांची अवैध वाहतूक करीत असताना इतर आरोपींच्या सहकार्याने या अर्जदार, आरोपीने बोलेरो गाडी स्वतः हा चालवून पोलीसांच्या अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याच्या उ‌द्देशाने प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात दाखल केलेला अटकपूर्व जमानत अर्ज सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे. तसेच या प्रकरणात अर्जदार, आरोपीने पोलीस गाडीचा पाठलाग करित असतांना उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गायगांव जवळ बोलेरो पिकअप गाडी कच्च्या रस्त्याने टाकली व पळून जाण्याच्या उ‌द्देशाने धावत्या गाडीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला असता, गाडीचे मागील चाक त्याच्या उजव्या पायावरून गेल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली असल्याने या जखमी आरोपीची प्रकृती चांगली झाल्यानंतर त्यास अटक करण्याची तजवीज ठेवली आहे.


या प्रकरणात गोवंश कत्तल नियमित व बिनधास्तपणे करणारे तीन आरोपी गुन्हा दाखल झाल्या पासून फरार आहेत. या गुन्हयाचा मास्टर माईंड अतिक कुरेशी रा. खोलापूर ता.भातकुली जि.अमरावती याचा देखील या प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वीचं नामंजूर करण्यात आला आहे.

सदरहू प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जामीन अर्जाला विरोध करतांना न्यायालयात लेखी उत्तर व युक्तीवाद सादर केला की, या प्रकरणात फिर्यादी पोलीस शिपाई विपूल सोळंके अकोट शहर पो.स्टे.यांनी दि. ०५.०४.२०२५ रोजी अकोट पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यावरून व पोलीसांना गुप्त माहिती मिळाल्यामुळे श्रध्दासागर दर्यापूर रोड आकोट येथे बेरिकेट लावून नाकाबंदी केली. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, पहाटे ५.३० वा. चे दरम्यान पांढण्या रंगाची पिकअप बोलेरो गाडी एमएम २० जीसी १७७० यामध्ये अंदाजे १० ते १२ गोवंश ज्यांचे पाय बांधून कत्तलीसाठी पेवून जात आहेत. सकाळी ६.०० वा. दर्यापूर कडून वरील गाडी येतांना दिसली व गाडी जवळ येतांच वाहन चालक यास पंचासमक्ष पोलीसांनी हाताने इशारा करून गाडी थांबविण्यास इशारा केला असता, वाहन चालक याने वरील वाहन निष्काळजीपणे व अती वेगाने चालवून शासकीय कामात अडथळा आणून पोलीसांना इजा व्हावी अशा उद्देशाने पोलीसांच्या अंगावर वाहन आणले. परंतु, पोलीसांनी प्रसंगावधान राखून रस्त्याच्या बाजूला उड्या घेतल्या व वाहन अकोट शहराकडे भरधाव वेगाने वाहत गेले. पोलीसांनी वरील प्रमाणे वाहनाचा नंबर गुप्त बातमीदारानेचं सांगितलेला असल्याची खात्री पटली व वाहन पाठीमागून पाहीले असता त्यामध्ये गोवंश जनावरे असल्याचे दिसून आले.

अकोट शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे यांनी पो. स्टाफला वाहनाचा पाठलाग करण्याचे आदेश दिले व मदतीसाठी आणखी स्टाफ पाठवित असल्याचे सांगितले. त्या प्रमाणे पंचासह स्टाफ वरील गाडीचा पाठलाग करण्यास जात असतांना गोवंश असलेल्या गाडीच्या मदतीकरिता त्यांच्या सोबत सोबत मागे चालणारी एक पांढऱ्या रंगाची होंडा अमेझ गाडी क्र.एम एच क.४३ बीजी १४१० ही पोलीसांना गोवंश असलेल्या गाडीचा पाठलाग करण्यास अडथळा निर्माण करित होती. ओव्हरटेक करित असतांना अमरावती कडे जाणारी एसटी बस समोरून आल्याने व रोड अरूंद असल्याने व एसटी बस आडवी आल्याने आरोपींनी त्यांची गाडी मागे घेतली व त्यांच्या गाडीतील साथीदार गाडीतून उतरून उज्वल नगरच्याकडे पळून गेला. गोवंश असलेली बोलेरो अकोला रोडने निघाली असता, देवरी फाट्यावरून शेगांव रोडने ही गाडी सुसाट निघाली. पाठलाग करणाऱ्या पोलीसांनी पो. स्टे. उरळ यांच्याशी संपर्क करून नाकाबंदी केली. गायगांव गावाच्या थोडे अलीकडेच उरळ पोलीसांची नाकाबंदी असल्याचे दिसल्याने गोवंश असलेली गाडी ही कच्च्या शेताच्या रस्त्याने टाकली व पळून जाण्याच्या उ‌द्देशाने धावत्या गाडीतून उडी मारली असता त्याचा पाय गाडीमध्ये अडकल्याने तो जागीच पडला व जखमी झाला. जखमी आरोपीला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नावं मोहम्मद अजिज मो. रफीक वय २७ वर्ष रा.फातेमा हॉस्पीटल जवळ अकोटफैल असे सांगितले.त्यास अकोट येथील पळून गेलेल्या आरोपींचे नाव गांव विचारले असता, त्याचे नांव शेख फारूख कुरेशी रा. मस्तानचौक अकोला असे सांगितले. तसेच गोवंश कोणाचे व कोठून आणले याबाबत विचारले असता सदर गोवंश हा अर्जदार, आरोपी अतिक कुरेशी रा.खोलापूर ता. भातकुली जि.अमरावती याचा असल्याचे आरोपींनी सांगितले व बोलेरो गाडीचा मालक अ. कलीम अ. सलीम रा. शिवणी असल्याचे सांगितले. तसेच होंडा अमेझ गाडी ही अ. कलीम अ. सलीम हाच चालवित होता. बोलेरो पिकअप गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये एकूण १२ गोवंश जनावरे ज्याचे पाय दोराने बांधून सर्व गोवंशांना इजा पोहोचेल एकमेकांच्या मानेला दोराने जखडून दिसून आले.पंचासमक्ष बोलेरो गाडी व गोवंश जप्त करण्यात आले. या गुन्हयामध्ये भरधाव वेगाने निष्काळजीपणे वाहतूक करित असतांना जखमा झाल्यामुळे एका गोवंशाचा मृत्यू झाला असा अभिप्राय पशु वैद्यकीय अधिकारी अकोट यांनी या गोवंशाच्या शवविच्छेदनामध्ये दिला आहे. हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून या गुन्हयाचा मास्टरमाईंड अतिक अहेमद कुरेशी हा फरार झाला असून, त्याच्यावर यापूर्वीसुध्दा अमरावती जिल्हातील पोलीस स्टेशन मोर्शी येथे अप. नं. १८३/२०२५ वरील प्रमाणे प्राण्यांचा छळ करण्यासंबंधीचे गुन्हा दाखल आहेत. तसेच हा अर्जदार,आरोपी मो.अजिज मो. रफीक याच्या विरूध्द देखील गोवंश चोरीचे गुन्हे अकोला जिल्हयातील मुर्तिजापूर व बार्शिटाकळी पो.स्टे.ला दाखल आहेत.सदरहू आरोपी गोवंशाची चोरी करण्याच्या सवईचा आहे. या आरोपीकडून फरार आरोपीचा ठावठीकाणा तसेच इतर साथीदार निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपी हा गोवंश जनावरे कत्तलीकरिता विकी करित असून, गोवंशाची विकी नियमित सुरू ठेवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंदी कायदा असतांनादेखील हे आरोपी महाराष्ट्रामध्ये दिसली गाय की काप अशा मनोवृत्तीचे आहेत.

यांना कायदेशिर चपराक बसल्याशिवाय या गुन्हयाला आळा बसू शकत नाही. सदर गुन्हयाचा सखोल व बारकाईने तपास सुरू असून, पोलीस निरीक्षक माळवे पो.स्टे.अकोट शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग्य रितीने सर्व पुरावे गोळा करण्याकरिता आरोपींची पोलीस कस्टडीमध्ये विचारपूस होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता आरोपींचा अटकपूर्व जमानत अर्ज नामंजूर करावा असा युक्तीवाद सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपी मोहम्मद अजिज याचा अटकपूर्व जमानत अर्ज नामंजूर फेटाळला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. का? एनकाउनंटर करण्यासाठी जवळ बंदुक का ठेवत नाही पोलिस प्रशासन पोलीस लोकांना सुद्धा मुलबाळ आहेत, त्यांच्ये कुटुंब आहे, शुट😟😠

    उत्तर द्याहटवा