अकोला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात अधिकाऱ्यांची मनमानी तर जनतेच्या पैशांची लूट...



   अकोला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असून त्यामुळे जनतेच्या पैशांची प्रचंड प्रमाणांत लूट होत असल्याचा आरोप प्रहार जन शक्ती पक्षाचे उप जिल्हा प्रमुख अरविंद पाटील यांनी केला असून त्यांनी त्याची रीतसर तक्रार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांना केली आहे.



    ह्याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत अकोट उपविभागात सुरू असलेल्या एका कामाची तक्रार दिली असून त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, मौजे आडसुळ,ता.तेल्हारा येथे आडसुळ फाटा ते बंडु वानखडे यांचे घरापर्यंत व बंडु वानखडे यांचे घरापासून ते हनुमान मंदिरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम चालु आहे. सदर रस्त्याच्या कामात कंत्राटदार मनमानी करीत असुन अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार काम करीत नसुन रस्ता बांधकामामध्ये हेतुपुरस्सरपणे व जाणिवपूर्वक, आर्थिक लालसेपोटी आपल्या अधिनस्त शाखा अभियंता पवार व पुनसे हे कंत्राटदारांच्या कामाकडे डोळेझाक करीत आर्थिक लाभापोटी दुर्लक्ष करीत आहेत.

   मौजे आडसुळ येथे उपरोक्त लोकेशनवर सुरू असलेले बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालु असून सदरच्या रस्ता बांधकामावर संबंधीत शाखा अभियंता स्वतः उपस्थित न राहता किंवा वेळोवेळी सदर कामाची तपासणी न करता आर्थिक हितसंबंध जोपासत असून संबंधित कंत्राटदारास खुली सुट देण्यात आलेली आहे.तसेच रस्ता बांधकामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्या जात आहे. उपरोक्त बाब ही अभियंता यांच्या निदर्शनास आलेली आहे.तरीही ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पाटील यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.


   वरील रस्त्याचे बांधकामाची किंमत ही एक  कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे रस्ता तपासणी ही उपअभियंता यांनी करणे गरजेचे असतांनाही त्यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सदर निकृष्ठ दर्जाच्या कामाची जबाबदारी ही उपअभियंता प्रकाश इंगळे यांचेवर सुध्दा निश्चित होते. त्याअर्थी उपअभियंता इंगळे हे सुध्दा रस्ता बांधकामाच्या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचे सिध्द होते. उपअभियंता यांनी वेळोवेळी कामावर भेटी देऊन तपासणी केली असती तर रस्ता निकृष्ठ झालाच नसता म्हणुन मौजे आडसुळ येथील नमुद रस्त्याच्या कामाच्या भ्रष्टाचारास उपअभियंता प्रकाश इंगळे,कनिष्ठ अभियंता कपिल पवार व शाखा अभियंता पुनसे यांचेविरूध्द महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) नियम १९७९ चे नियम ३ (एक) (दोन) (तीन) (आठ) चा भंग केला म्हणून त्यांचेविरूध्द कलम ३११ (२) नुसार व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ अन्वये जबर शिक्षेची कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी.


    मौजे आडसुळ येथील रस्ता बांधकामाची चौकशी ही त्रयस्थ यंत्रणेकडुन करून सदर कामाचे सोशल ऑडिट करावे. तसेच निकृष्ट रस्ता बांधकामाची चौकशी होईपर्यंत सदरहू कामाची देयके अदा करण्यात येऊ नये व दोषींवर कडक कार्यवाही करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. अन्यथा आपल्या कार्यालया समोर तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी ह्या तक्रारीतून दिला आहे.
ह्या तक्रारीच्या प्रति,
१) विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती.२)जिल्हाधिकारी, अकोला.३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अकोला 
४) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.), जि.प. अकोला यांना देण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या