अखेर आयपीएस "शिवदीप लांडे" राजकारणात उतरलेच, बिहारमध्ये "हिंद सेना" पक्षाची स्थापना...




    नुकत्याच तीन राज्यात पार पडलेल्या  निवडणुकीनंतर आता देशाचे लक्ष बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकी कडे लागले असून बिहारमधील सत्ताधारी जेडीयू भाजप यांच्यासह आरजेडी आणि काँग्रेसने  देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. काँग्रेसकडून 'पलायन रोको' यात्रेच्या माध्यमातून राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे तर दुसरीकडे आता बिहारच्या राजकारणात महाराष्ट्र पुत्र "सुपर कॉप" म्हणून प्रसिद्ध असलेले माजी आयपीएस शिवदीप लांडे यांची देखील "एंट्री" झाली आहे. महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील पारस या गावात जन्मलेले शिवदीप लांडे यांनी राजकारणात प्रवेश करीत,स्वतःचाच नवीन राजकीय पक्ष "हिंद सेना" स्थापन करण्याची घोषणा केली आहे. शिवदीप लांडे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे जावई आहेत.


    पाटण्यातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना शिवदीप लांडे यांनी त्यांचा पक्ष राष्ट्रवाद, सेवा आणि समर्पणाच्या तत्त्वांवर काम करेल आणि बिहारमधील लोकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले. १८ वर्षे बिहारमधील जनतेची  गणवेशात सेवा केल्यानंतर, "मला आता एका नवीन भूमिकेत लोकांसमोर यायचे आहे. "हिंद सेना पक्ष बिहारला परिवर्तनाच्या आणि विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी काम करेल". पक्षाचे निवडणूक चिन्ह खाकी रंगाच्या पार्श्वभूमीवर त्रिपुंड असेल अशी माहिती त्यांनी दिली.


   ऑक्टोबर,नोव्हेंबरमध्ये बिहार राज्यात  विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता असल्याने सुपर कॉप,माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या नवीन पक्षाची संपूर्ण देशात चर्चा होत आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून शिवदीप लांडे बिहारच्या अनेक जिल्ह्यात  "रन फॉर सेल्फ"  या बॅनरखाली काम करीत आहेत. आयपीएसचा राजीनामा दिल्यानंतर "बिहारची परिस्थिती" बदलण्याच्या उद्देशाने काम करणार आणि "मी खाकी गणवेश सोडला आहे पण आतून खाकीच आहे. आता आपल्याला फक्त बिहार बदलण्या साठी काम करायचे आहे". असे शिवदीप लांडे म्हणाले.


   शिवदीप लांडे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतीय पोलिस सेवेतून ऐच्छिक सेवानिवृत्ती घेत "राजीनामा" दिला होता. त्यानंतर ते लवकरच राजकारणात "एंट्री" करणार असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात जोरात सुरु होती. लांडे बिहारमध्ये 'सिंघम' आणि 'सुपरकॉप' अशा नावांनी ओळखले जातात. पाटणा, पूर्णिया, अररिया आणि मुंगेर सारख्या जिल्ह्यांमध्ये पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई केली होती. 


   महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात जन्मलेले शिवदीप लांडे,इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर नागरी सेवेत दाखल झाले. बिहारमध्ये त्यांची पहिली "पोस्टिंग" नक्षलग्रस्त मुंगेर जिल्ह्यात होती. दक्षिणेतील फिल्मी स्टार हे जसे तेथील जनतेसाठी पूजनीय आहेत तसेच शिवदीप लांडे हे बिहार मधील जनतेच्या गळ्यातील ताईत आहेत.लांडे यांच्या रूपाने बिहारमध्ये राजकीय सत्ता परिवर्तन होऊन तेथील राजकारणाची दिशा नक्कीच बदलेल अशी आशा करण्यास काहीच हरकत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या