धामणगावात केवळ "खाकी"च्याच नव्हे तर लोकांच्याही "संवेदना बोथट" झाल्यात..?



   सरपटणारी "धामण" ही चावली तरी कुणाचा जीव जात नाही असे म्हटल्या जाते परंतु हे चुकीचे आहे असे गेल्या दोन तीन दिवसांत घडलेल्या घटनांवरून "धामण" कुणालाच सोडत नाही हे "तीन जीव" गेल्यावर सिद्ध झाले आहे.मग ती "बिनविषारी धामण" असो की तिच्याच नावावर असलेल्या धामणगावातुन धावणारी रेल्वे नावाची "नागीण" असो. 

    शांत आणि सज्जन लोकांच्या वस्तीचे ठिकाण म्हणून अमरावती जिल्ह्यातील सेंट्रल रेल्वे लाईनवरील शेवटचे गाव असलेले "धामणगाव" भारतात प्रसिद्ध आहे. ह्याच धामणगावातून आता काळानुरूप "सरपटणारी" नव्हे तर "सुसाट वेगाने" धावणारी धामण अर्थात रेल्वे गाड्या त्याही एक दोन नाही तर कितीतरी एकामागून एक अशा धावतच असतात.गेल्या कित्येक वर्षांत ह्या धामनाणी कुणाचा जीव घेतल्याचे ऐकिवात नव्हते.मात्र गेल्या तीन दिवसांत एकापाठोपाठ तीन जीव घेतल्याने नेमके कुठे आणि काय चुकले वा काय चुकत आहे ह्याचा कुणालाच काहीच अंदाज येत नाहीये.


     यवतमाळ येथील एका प्राध्यापकाने आपला जीव देण्या साठी ह्याच धामणगावच्या "धावणाऱ्या धामण"ची निवड केली तर यवतमाळ येथील निखिल दिलीप सराफ नामक एका व्यावसायिकाचा देखील जीव ह्याच रेल्वे अर्थात धामनणे घेतला आहे.तर काल भंडारा जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या व्यक्तीचा देखील केवळ पाणी पिण्यासाठी उतरला म्हणून जीव घेतला आहे.तीन दिवसांत "तीन बळी" घेतल्याने धामणगाव स्टेशनवर नेमके काय होत आहे हे कुणालाच कळत नाहीये.


   काल रेल्वे स्टेशनवर पिण्याचे पाणी घेण्यासाठी उतरून परत रेल्वेत चढत असताना भंडारा जिल्ह्यातील भूपेंद्र मधुकर शहारे ह्या ३८ वर्षीय व्यक्तीचा तोल जावून तो चाकाखाली आल्याने त्याचे दोन्ही पाय कटले.त्याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी त्याच्यावर त्वरित उपचार व्हावेत यासाठी रुग्णवाहिका बोलावली मात्र रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्घटना रेल्वेच्या हद्दीत घडली असल्याने या घटनेची माहिती बडनेरा रेल्वे पोलिसांना देण्यात आली.

     मात्र दुर्दैवाची आणि अत्यंत चीड आणणारी घटना ह्या गावात घडली ती म्हणजे ह्या व्यक्तीचा मृतदेह रखरखत्या उन्हात रेल्वे स्टेशनवर बडनेरा रेल्वे पोलिसांच्या प्रतीक्षेतः जवळपास पाच ते सहा तास तसाच बेवारस पडून होता.मृतकाचे नातेवाईक जेव्हा भंडाऱ्याहून याठिकाणी पोहोचले तेव्हा मृतकाचा मृतदेह रेल्वे प्लॅटफॉर्मवरच पडून असल्याने त्यांच्या "संयमाचा बांध" फुटला.त्यांना मृतदेह हॉस्पिटलला नेला असे सांगण्यात आले होते. किमान मृतदेह रेल्वे प्रशासनाने शव विच्छेदनगृहात तरी पाठवायला पाहिजे होता. मृतदेहाची होत असलेली "विटंबना" पाहून नातेवाईक मंडळी रेल्वे पोलिसांवर संतप्त झाली होती.

    धामणगाव रेल्वे स्टेशन हे बडनेरा रेल्वे (जीआरपी) पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने कोणतीही घटना घडली की, बडनेरा रेल्वे पोलिस येईपर्यंत कुणालाच काहीच करता येत नाही.त्यामुळे बडनेरा रेल्वे पोलिस पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा करेपर्यंत वाट पाहण्या शिवाय इलाज नसतो.अनेकदा असे प्रकार घडत असतात.

    बडनेरा ते धामणगाव हे जास्तीत जास्त एका तासाचे अंतर आहे,मात्र रेल्वे पोलिसांना ज्याठिकाणी पोहोचायला तब्बल "सहा तास" लागलेत.यासाठी त्यांनी फारच हास्यास्पद कारण दिले की बडनेरा पोलिस ठाण्यात एकच शासकीय वाहन आहे,आणि ते वाहन घेऊन पोलिस कर्मचारी दोन दिवसांपूर्वी धामणगावात रेल्वे लाईनवरील यवतमाळच्या प्राध्यापकाच्या  आत्महत्या प्रकरणाच्या तपासात यवतमाळला गेले होते. त्यामुळे पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना धामणगावला रेल्वेने जावे लागले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना उशीर झाला,अशी सारवासारव बडनेरा जीआरपीचे ठाणेदार उमेश मुंडे यांनी केली आहे.

    बडनेरा येथून धामणगावला जायला बऱ्याच रेल्वेगाड्या होत्या इतकेच नव्हे तर बस,ऑटो किंवा दुचाकी वाहनाने देखील जाता आले असते.तरी सुद्धा आत्यंतिक गरज असताना सुद्धा ताबडतोब घटना स्थळी न पोहोचून बडनेरा रेल्वे पोलिसांनी "अमानवियते"चा चांगलाच परिचय दिला.खाकी कधीच इतकी "असंवेदनशील" नसते परंतु धामणगावच्या बाबतीत ही "असंवेदनशीलता" कोठून आली हे मात्र समजायला काहीच मार्ग नाही.

    धामणगाव रेल्वे स्टेशनवर तीन दिवसांत तीन जीव गेलेत, यवतमाळच्या प्राध्यापकाने जीव देण्यासाठी धामणगावचीच निवड केली. यवतमाळच्या व्यावसायिकाचा सुद्धा याच स्टेशनवर जीव गेला तर काल भंडाऱ्यातील व्यक्तीने देखील ह्याचठिकाणी आपले प्राण सोडलेत.रोजच्या रोज घडणाऱ्या ह्या घटनांमुळे वैतागून काल भंडाऱ्यातील व्यक्तीच्या मृतदेहाला रखरखत्या उन्हात ठेवून बडनेरा रेल्वे पोलिसांनी आपल्या "मनातील खदखद" म्हणा वा राग तर व्यक्त केला नाही ना.? अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे.

    एकवेळ आपण खाकीची संवेदनशीलता संपली असे म्हणू मात्र ह्याच धामणगावातील लोकांच्या "संवेदनशीलतेचे" काय.? प्राणि मात्रांवर प्रेम करणाऱ्या,मुक्या जनावरांना "जीव लावणाऱ्या" ह्या लोकांच्या जिवंत सोडा पण मेलेल्या लोकांविषयीच्या भावना देखील संपून त्यांच्यात असलेली "संवेदनशीलता बोथट" झालीय की काय.? ह्या मृतकाचा मृतदेह दिवसभर रखरखत्या उन्हात बेवारसपणे पडलेला असताना त्यांच्या "कोमल मना"ला काहीच जाणवले नसेल काय.? इतके "संवेदनाहीन" झालेत हे लोकं.? ही मात्र आश्चर्याची बाब आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या