जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच असलेल्या पुरवठा विभागाच्या कार्यालयात येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला ११ हजाराची लाच स्विकारताना काल शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत अडकलेल्या लाचखोर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे प्रदीप प्रीतम केदार (वय ५० वर्ष) असे नाव असून या लाचखोर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार,यातील तक्रारदार हे पुरवठा निरीक्षक संगमेश्वर म्हणून या पदावर कार्यरत आहेत.तक्रारदार यांच्या अखत्यारित असणारे संगमेश्वर येथील धान्य गोदामास जिल्हाधिकारी रत्नागिरी,तहसीलदार संगमेश्वर यांनी दिनांक २२/०३/२०२५ रोजी अचानकपणे भेट दिली होती. त्यावेळी तक्रारदार हे गैरहजर होते तसेच त्यानंतर लोकसेवक जिल्हा पुरवठा अधिकारी केदार यांनी तक्रारदार यांचे अखत्यारीतील गोदामाची तपासणी करून धान्य साठ्यामध्ये तफावत असल्याचे सांगून तसेच गैरहजर असल्याचे सांगून त्याबाबत वरिष्ठ कार्यालयास नकारात्मक अहवाल न पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पंधरा हजार रुपयांचे लाचेची मागणी केली.त्यानुसार लोकसेवक केदार यांनी दिनांक २८/०३/२०२५ रोजी तडजोडीअंती ११,००० रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले व जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे तक्रारदार यांच्याकडून जिल्हा पुरवठा अधिकारी यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित२०१८) चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


0 टिप्पण्या