अकोल्यातील जुने,जाणते व ज्येष्ठ असलेले पत्रकार विठ्ठलराव महल्ले यांच्यावर काल रात्री ते घरी जात असताना एस.टी.वर्क्स शॉपच्या बाजूच्या रस्त्यावर तीन ते चार युवकांनी अचानकपणे "पूर्वनियोजित" असल्याप्रमाणे "प्राणघातक हल्ला" केल्याने एकच खळबळ उडाली आहे.सुदैवाने ह्या हल्ल्यातून ते बचावले असून त्यांना किरकोळ जखमा वगळता,मुका मार लागलेला आहे.काल रात्रीच त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून सध्या त्यांची तब्येत व्यवस्थित असली तरी ते व त्यांचे कुटुंबीय एका अनामिक दडपणाखाली आहेत.
काल रात्री ते आपले काम आटोपून ११ वाजताच्या सुमारास घरी जाण्या साठी निघाले असता खदान पोलिस स्टेशनच्या परिसरातील एस.टी.वर्क्स शॉपच्या मागे बाजूला असलेल्या रस्त्याने जात असताना अचानक रित्या तीन ते चार युवक त्यांच्या वाहनासमोर येऊन उभे राहिले. त्यामुळे विठ्ठल महल्ले यांना आपली दुचाकी थांबविणे भाग पडले.त्यांनी त्या युवकाना रस्ता अडविण्याचे कारण विचारले असता कोणतेही उत्तर न देता उलट त्यांनाच तू कोण आहेस.? काय करतोस.?असे फालतू प्रश्न विचारून ते हमरीतुमरीवर येत असल्याचे पाहून महल्ले यांनी खदान पोलिस स्टेशनच्या जबाबदार अधिकाऱ्याला मोबाईलवर घडलेला प्रकार सांगून कुणाला तरी घटनास्थळी पाठविण्याची विनंती केली,त्याच दरम्यान ह्या युवकांपैकी दोघांनी त्यांच्या डोक्यावर असलेले हेल्मेट काढून घेतले आणि त्यांना म्हणाले की "तू कुणालाही बोलावले तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही.पोलिस आमचे काय करणार आहे.? असे बोलून त्यांना एकेरी भाषेत अर्वाच्य शिवीगाळ करीतच मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यांच्याच हेल्मेटने त्या युवकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली असतानाच महल्ले यांनी सुद्धा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या युवकांपुढे त्यांचा प्रतिकार कमजोर ठरला.त्यांना ज्या हेल्मेटने मारहाण करण्यात आली त्या हेल्मेटचे अक्षरशः तुकडे तुकडे झालेले आहेत.इतकी अमानुषपणे त्यांना मारहाण करण्यात आली आहे.त्याच रस्त्याने मागून काही वाहने आल्याने त्यांचा जीव वाचला.अन्यथा पुढे काय घडले असते ह्याची कल्पना सुद्धा केल्या जाऊ शकत नाही.
पोलिसांना फोनवर माहिती देऊनही खदान पोलिस स्टेशनचा एकही कर्मचारी वा गस्ती वाहन त्याठिकाणी अर्धा पाऊण तासात ही आले नाही ही मात्र अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.ह्या युवकांच्या मारहाणी तून कशीतरी सुटका करून घेत महल्ले यांनी आपले घर गाठले.मात्र तेथून निघण्याआधी त्यांनी ह्या हल्लेखोरांपैकी एकाचे फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये काढन्यात ते यशस्वी झाले आहेत.
विठ्ठल महल्ले यांनी घरी गेल्यावर पुन्हा खदान पोलिस स्टेशनला झाल्या प्रकाराची माहिती दिली असता कुणीतरी एक पोलिस उपनिरीक्षक त्यांच्या घरी विचारपूस करण्यासाठी आले आणि त्यांना प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली.महल्ले यांना पाठीवर, पोटावर आणि डोक्यावर मारण्यात आले असून छाती व पोटावर त्यांना मुकामार लागला आहे. रात्रीचे तीन वाजल्याने पुढील तपासणी करता आली नाही.तसेच रात्र झाल्यामुळे त्यांची तक्रार देखील नोंदवायची राहिली असून ती आज नोंदविण्यात येणार आहे.
विठ्ठलराव महल्ले हे अत्यंत मनमिळावू व ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे अख्ख्या आयुष्यात कुणाशीच "वैर" नाही.गेल्या काही दिवसांपासून ते "अजिंक्य भारत" ह्या दैनिकात काम करीत असून त्यांच्या लिखाणाने त्यांनी चांगल्या चांगल्यांना "घाम फोडला" आहे.अशाच पैकी दुःखावल्या गेलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलल्या जात आहे.
अकोल्यातील काही पत्रकार मंडळी त्यांच्यासोबत खदान पोलिस स्टेशनला ह्या घटनेची फिर्याद देण्यासाठी जाणार असून त्यात "पत्रकार संरक्षण कायद्या"नुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे.हा कायदा लागू झाला तेव्हापासून बऱ्याच पत्रकारांवर अशाप्रकारचे "पूर्वनियोजित हल्ले" करण्यात आले आहेत परंतु आजपर्यंतही एकाही प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही ही "वास्तविकता" आहे.महल्ले यांनी मारहाणीची घटना घडण्यापूर्वीच पोलिसांना फोनवर माहिती दिली होती परंतु तरीसुद्धा त्यांना वाचविण्या साठी कुणीच न आल्यामुळे त्या संबंधितावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी केल्या जाणार आहे.
गेल्या वर्षभरापासून अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी पार विस्कटली असून ती जागेवर आणण्यासाठी कोणतीही पावले पोलिसांकडून उचलल्या गेली नाहीत ही मात्र अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.ह्याबद्दल अकोल्यातील पत्रकार वेळोवेळी आवाज उचलत असल्याने आत्ता तर त्यांचाच "आवाज बंद" करण्याचे अशारीतीने प्रयत्न करण्यात येत असल्याने पत्रकारांनी "कुणाच्या भरवशा"वर आपली "प्रामाणिक व सत्य पत्रकारिता" करावी हा एक फार मोठा प्रश्न आहे.








0 टिप्पण्या