लाखांच्या घरात पगार मिळत असतानाही "चिरीमिरी" घेण्यात आज रोजी तरी कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्याला कसलीच "लाज वाटत नाही" अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.पोलिस खात्यात तर ही "खाबुगिरी," "बेशरम"च्या झाडासारखी वाढली आहे.ज्याला त्याला थोड्याच दिवसांत "अदानी,अंबानी" यांना देखील मागे टाकता येईल इतकी संपत्ती कमवायची "लालसा" निर्माण झालेली आहे.
कोणत्याही विभागात नोकरीवर लागण्याआधी अत्यंत गरिबीत दिवस काढलेले,ह्याच "खाबुगिरी व लाचखोरी"ला "वैतागून मेटाकुटी"स आलेले तरुण जेव्हा मेहनतीच्या जोरावर आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून शासकीय सेवेत सामील होतात तेव्हा त्यांच्या मनात ह्या भ्रष्टाचाराबद्दल "भयानक चीड" निर्माण व्हायला पाहिजे.मात्र असे काहीच होतांना दिसत नाही तर ह्याच "लालसेला बळी" पडून स्वतःच त्या "भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत" नखशिखांत डुंबण्यात धन्यता मानून जमेल तसे सर्वसामान्य जनतेला लुबाडून आपले "घर भरण्यात" सदैव पुढेच राहतात,हीच या देशाची व राज्याची शोकांतिका आहे.
ह्या "भ्रष्टाचार व लाचखोरी"च्या विरोधात जोपर्यंत हे असे गरिबीतून शासकीय सेवेत आलेले अधिकारी व कर्मचारी पेटून उठत नाहीत,तोपर्यंत राज्यातील एसीबीने कितीही आणि कशाही कारवाया केल्या तरी "भ्रष्टाचाराचा सफाया" होणे शक्यच नाही. सोबतच सर्वसामान्य जनतेने देखील आपल्या पुढील पिढीचा विचार करून जीवन जगण्यासाठी "प्रामाणिक मार्गाने" पैसा कमवून मिळतो तेव्हढ्यातच समाधान मानल्यास ह्या "लाचखोरीचे उच्चाटन" सहज शक्य आहे.
विदर्भातील यवतमाळ शहरात अशाच एका गरिबीशी संघर्ष करीत शिक्षण घेवून पुढे येण्यासाठी धडपड करून पोलिस खात्यात भरती झालेल्या,आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच "भ्रष्टाचाराशी दोन हात" करून त्याच लाचखोरीचे निर्मूलन करण्याची संधी मिळालेल्या एका युवकाने देखील पुढील पिढीच्या तर सोडाच स्वतःच्या देखील आयुष्याचा देखील विचार न करता त्याच "गटारात डुंबण्या"तच धन्यता मानली,आणि समाजातील चोर,दरोडेखोर ह्यांना ज्याने गेल्या काही वर्षात आपल्या हाताने गजाआड केलेले आहे, त्याच पोलिस स्टेशनच्या "लॉक अप" मध्ये जाण्याची वेळ नशिबाने आज त्याच्यावर आणलेली आहे.
दर्शन पुंडलीक दिकोंडवार,वय -३८ वर्ष, पद-पोलीस उपनिरिक्षक, नेमणुक पो.स्टे. नांदगांव खंडेश्वर, ह्याने पोलिस स्टेशनच्या आवारातच लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती.मात्र वेळेवर संशय आल्याने ती रक्कम ठरलेल्या वेळी न स्वीकारता "टाळाटाळ केल्या"ने सदरहू दोघांवरही अखेर लाचेची मागणी केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आल्याने अमरावती पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांनी दि.१२/०३/२०२५ रोजी दिलेल्या तक्रारीवरुन दि.१३/०३/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान तक्रारदार यांना लोकसेवक दर्शन पुंडलीक दिकोंडवार, वय -३८ वर्ष, पद-पोलीस उपनिरिक्षक, नेमणुक पो.स्टे. नांदगांव खंडेश्वर, अमरावती ग्रामिण रा.शिरे लेआउट,चौधरी हॉस्पीटल रोड,अवधुतवाडी,यवतमाळ जि. यवतमाळ यांनी तक्रारदार यांचे वडीलांच्या नावे असलेली ट्रक्टरची ट्रॉली सोडुन देण्याकरीता ५००० रूपये लाचेची मागणी केली. तसेच सदर ५,००० रुपये लाच रक्कम सुकेश सारडा याचेजवळ देण्यासाठी सांगितले. त्यावेळी सुकेश सारडा याने तक्रारदार यांना सांगितले की, मी तुला फोन केल्यावर येवुन जा.असे बोलुन सदरचे पैसे लाच रक्कम असल्याचे माहीत असताना सुध्दा लाचेची रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शवली व दर्शन दिकोंडवार यांस गुन्हा करणेकामी मदत केली.मात्र दि.१३/०३/२०२५ रोजी दुपारी ३/३५ ते ४/४८ वाजेपर्यंतच्या दरम्यान आयोजीत सापळा कार्यवाही बाबत दिकोंडवार यांस तकारदार यांचेवर संशय आल्यामुळे त्यांने तकारदार यांचेकडुन लाच रक्कम ५००० रुपये घेतले नाहीत. त्यामुळे काल दि १८/०३/२०२५ रोजी दर्शन पुंडलीक दिकोंडवार व सुकेश अनिल सारडा या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे विरूध्द लाचेची मागणी केल्यावरून पोस्टे. नांदगाव खंडेश्वर,अमरावती ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



0 टिप्पण्या