अकोल्याच्या सहकार गटात "उभी फूट"..? जिल्हा बँकेचे संचालक हिदायत पटेल यांचा ना "राजीनामा"...



    अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक,जिल्ह्यातील सहकार चळवळीचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी अगदी अचानक व अनपेक्षितपणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाचा गेल्या आठवड्यात "राजीनामा" दिल्याने एकच खळबळ उडाली असून ही सहकार गटात "उभी फूट" पडली असल्याचे बोलल्या जात आहे.

     हिदायत पटेल यांनी ४/५ दिवसांपूर्वी वैयक्तिक कारण देत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला आहे.त्यांनी दिलेल्या ह्या राजीनाम्या विषयी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली असून त्याची कल्पना सहकार क्षेत्रातील बऱ्याच दिग्गजांना सुद्धा नसल्याचे दिसून येत आहे. सहकार क्षेत्रातील अनेक लहान मोठ्यांना ह्या बाबत विचारणा केली असता त्यांनी काहीच माहीत नसल्याचे सांगितले तर काहींनी राजीनामा ह्या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास चक्क नकार दिला आहे.

     जिल्हा बँकेचे एम.डी. वैद्य यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी काहीच "प्रतिसाद" दिला नाही तर अकोट बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचडे यांनी सुद्धा केलेला "कॉल रिसिव्ह" करण्याचे औदार्य दाखविले नाही.तर सहकार चळवळीतील अनेकांना हिदायत पटेल यांनी जिल्हा बँकेच्या  आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याचेच माहीत नाही.


     हिदायत पटेल हे १९८४ पासून जिल्हा बँकेचे संचालक असून त्यांनी सहकार गटाच्या एकजूट व प्रगती साठी जीवापाड प्रयत्न केलेले आहेत. कोणत्याही पदाची आशा न करता, पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून प्रत्येक वेळी  दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलली आहे.

   अकोटचा खरेदी विक्री संघ, सहकारी जिनिंग असो वा कृषी उत्पन्न बाजार समिती.ह्या संस्थामध्ये सहकार गटाच्या विजयात त्यांचा फार मोठा नव्हे तर सिंहाचा वाटा राहिलेला आहे.अकोटच्या ह्या सहकारी चळवळीचे ते "अध्वर्यू" असल्यानेच तालुक्यातील जवळपास सर्वच सहकारी संस्थांमध्ये सहकार गटाचे वर्चस्व व अस्तित्व आहे हे कुणीही मान्य करेल.

    गेल्या दहा ते पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा काहीशा नाराजीनेच दिला होता मात्र त्यावेळी त्यांची "मनधरणी" करून आणि असलेली नाराजी दूर करून त्यांना त्यापासून परावृत्त करण्यात आले होते.मात्र तो काळ थोडासा नव्हे तर बराच वेगळा होता,हे आज वेगळे सांगण्याची गरज नाही.


    मात्र ह्यावेळी त्यांनी जरी आपण आपल्या काही "वैयक्तिक कारणां " मुळे संचालक पदाचा राजीनामा दिला हे सांगत असले तरी त्यामागे काहीशी नाही तर फार मोठी "नाराजी" असल्याचे समजते.याच नाराजीतून ते राजीनामा दिल्यावर अज्ञातवासात गेले असून कुणाशीही त्यांचा संपर्क होवू शकला नाही. इतकेच काय तर कुणी त्यांच्या मनधरणीचे देखील प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. मात्र आज त्यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी महत्प्रयासाने संपर्क केला असता  त्यांनी आपला तोच सुर कायम ठेवला असून वैयक्तिक कारणास्तव हा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

     गेल्या काही दिवसांत सहकार गटात जातीपातीचे व पक्षीय राजकारण घुसले असून गेल्या लोकसभा निवडणुकांपासून ह्या पक्ष निरपेक्ष सहकार गटात चांगलीच "धुसफूस" सुरू असल्याचे अगदी सहजच लक्षात येत आहे.शरद पवारांची साथ घेत भक्कमपणे जिल्ह्यात पाय रोवून उभ्या असलेल्या सहकार गटात गेल्या लोकसभेतील काँग्रेसचे डॉ.अभय पाटील यांच्या पराभवाने हा सहकार गट "अभंग" राहिलाच नव्हता तर तो नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका नंतर बराचसा "भंगल्या"चे दिसून आले आहे.

    महाविकास आघाडीचा झालेला अत्यंत लाजिरवाणा पराभव आणि राज्याच्या राजकारणात अजित पवार गटाची वाढलेली ताकद ह्यामुळे अकोल्यातील सहकार गटात देखील "उभी फूट" पडली आहे.मात्र मिळालेले पद व असलेली सत्ता सोडून द्यायची हिम्मत नसल्याने बरेच लोकं आहेत त्याठिकाणीच मन मारून "चिटकुन" आहेत.आज सहकार गटात जे काही आणि ज्या पद्धतीने सुरू आहे अशाठीकानी हिदायत पटेल यांच्यासारखा प्रामाणिक व्यक्ती राहूच शकत नव्हता.आपले विचार ज्याठिकाणी जुळत नाहीत अशाठीकणी "मन मारून" राहिल्या पेक्षा पदाचा राजीनामा देणे कधीही चांगले,अशाच भावनेतून त्यांनी हा राजीनामा काहीशा नव्हे तर फार मोठ्या नाराजीने दिला असावा,असा कयास काही मंडळी बांधत आहेत.

    अकोट तालुक्यातील मोहाळा या लहानशा गावातील हिदायत पटेल यांनी राजकारणात अल्प वयातच उत्तुंग भरारी घेत सहकार क्षेत्रातील राजकारणात ते चांगलेच स्थिरावले होते.अण्णासाहेब कोरपे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून जिल्ह्यात सहकार चळवळ रुजविण्यात त्यांचा फार मोठा सहभाग आहे.कोणत्याही पदाची आशा न करता मिळेल ती जबाबदारी आणि असलेले कर्तव्य पूर्ण करीत "नव्या लोकां"ना सहकार चळवळीत सहभागी करून, त्यांना पदावर बसविण्याची सुरुवात त्यांनीच केलेली आहे,हे विसरून चालणार नाही.राजकारणात "घराणेशाही" आली ते ठीक आहे पण "सहकार क्षेत्रात घराणेशाही"ला त्यांचा आधीपासूनच विरोध होता.कदाचित त्याचमुळे आलेल्या "नैराश्यातून व नाराजी"ने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

     हिदायत पटेल यांनी राजीनामा दिल्यावर त्यांची मनधरणी करण्याचे कोणतेही प्रयत्न न करता त्यांचा राजीनामा मंजूर करून तो पुढील  कार्यवाहिस्तव जेडीआर कार्यालया कडे पाठविण्यात आल्याची सूत्रांची माहिती असून येत्या काही दिवसांत त्यांच्या रिक्त झालेल्या जागी "कुणाला" तरी बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे कळते.

    एकंदरीतच जिल्ह्यातील अभेद्य असलेल्या सहकार गटात ही "उभी फूट" पडल्याचे संकेत असून त्यांच्यात "फाटाफूट" केव्हा होते हे पाहणे औत्सुक्याचे असले तरी ते "दुर्दैवी" असेल हे मात्र निश्चित.कारण त्यामुळे कुणाचे व्यक्तिशः नाही झाले तरी सहकार चळवळीचे मात्र फार मोठे नुकसान होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या