अकोट शहराची शान ठरलेल्या अकोला नाक्यावरील रेल्वे पुलाने नुकत्याच सुरू झालेल्या वर्षांतील पहिला बळी घेतल्याने शहरातील वातावरण संतप्त झाले आहे.
रविवारी रात्री ९ ते १० वाजताच्या दरम्यान भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका अल्पवयीन मुलीचा जागीच गेला असून दुचाकी वाहनाचा पुरता "चेंदामेंदा" झाला आहे.
गेल्या वर्षभरापूर्वी हा पूल नागरिकांसाठी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, तेव्हापासून ह्या पुलावर पथदिवे लावण्यात आलेले नसून शहराच्या बाहेर असलेल्या विविध कॉलनीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना या पुलावरून पायी अथवा दुचाकी वाहनाने जात येत असताना अक्षरशः "जीव मुठी"त धरून चालावे लागत आहे.
अकोट नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांना वारंवार विनंती करूनही या पुलावर पथदिव्यांची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.यावरूनच या शहरात राहणाऱ्या जनतेच्या सेवेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना येथील जनतेच्या जीवाशी काहीच देणे घेणे नसल्याचे अगदी स्पष्ट होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विविध सामाजिक संघटना,राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी सोशल मीडिया व वृत्तपत्रांच्या माध्यमातून पुलावर पथदिवे लावण्याची मागणी रेटून धरली असतानाही ते का लावण्यात आले नाहीत हा मात्र संशोधनाचा विषय आहे.
शहरात नोकरी निमित्ताने आलेले बहुतांश अधिकारी व कर्मचारी अकोला रस्त्यांवरील कॉलनीमध्ये वास्तव्य करून आहेत.त्यांचीही मुले बाळे,परिवार या पुलावरून दिवसांतून किमान दोनदा तरी जात येत असतात.तरीसुद्धा त्यांनीही ह्या बाबतीत आपल्या सहकारी अधिकाऱ्याला काही सूचना देवून पथदिवे व स्पीड ब्रेकर लावण्यास सांगितले नाही यावरून या अधिकाऱ्यांची मानसिकता काय असावी हे लक्षात येते.
शहरातील काही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बऱ्याचदा शहर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना याबाबतीत सांगून पुलावर अपघात होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यावर अकोटच्या ठाणेदारांनी नगर पालिकेला पत्रव्यवहार करून नागरिकांच्या जीविताची काळजी घेण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याविषयी वेळोवेळी सांगितले असल्याचे समजते.तरीही ह्या आठवड्यातून दोनदा नगर पालिकेत येणाऱ्या अकोला सारख्या शहरात वास्तव्य करणाऱ्या मुख्याधिकारी ह्यांनी काहीही केले नाही ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.( त्यांच्याबाबतीत गाव जले,........ बाहर.ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते.)
गेल्या दोन वर्षांपासून डॉ.नरेंद्र बेंबरे हे अकोट नगर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २४ तास ह्याच शहरांत वास्तव्यास असावे असा नियम आहे.परंतु तो पायदळी तुडवीत आपल्या मर्जीने नगर पालिका प्रशासन चालविणाऱ्या ह्या अधिकाऱ्याला स्थानिक विकास महर्षी असलेल्या लोकप्रतिनिधींनी वेसण घालण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही.
अकोट शहरातील अनेक व्हॉट्स अप गृपवर हा अपघात घडून अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.तर एका व्यक्तीने शहरातील न्याय संस्था व पत्रकारांवर देखील चांगलेच "तोंडसुख" घेतले आहे. त्याला एकच सांगावेसे वाटते की न्याय व्यवस्थेकडे न्याय मागावा लागतो,तो तसाच मिळत नाही तर ह्या शहरात असलेल्या अनेक पत्रकारांनी वेळोवेळी पथदिवे लावण्यासाठी बातम्या प्रकाशित करून त्याचा पाठपुरावा देखील केलेला आहे.तरी देखील ह्या ठिकाणी पथदिवे लागले नाहीत ह्यात त्या पत्रकारांचा काय दोष..? त्यांच्यापैकी एखादा जरी करोडपती असता तर त्याने स्वतःच्या खिशातून खर्च करून हे पथदिवे लावले असते.सगळा पुल दिव्यांनी "रोशन" केला असता.कुणाची वाट नसती पाहिली.पण ते सगळे तुमच्याच सारखे मध्यमवर्गीय आहेत ना.!
गेल्या दहा वर्षांत न झालेल्या शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही ज्या लोक प्रतिनिधीला पुन्हा तिसऱ्यांदा "धपाधप" बटन दाबून अतिप्रचंड मतांनी निवडून दिले, त्यांना तुम्ही कितीदा हे पथदिवे लावण्यासाठी सांगितले व त्यांनी काय पाठपुरावा केला हे तुम्ही विचारले काय.?
शहरातील पत्रकार आपले काम व्यवस्थित व प्रामाणिकपणे करीतच आहेत,तुम्ही फक्त तुम्हाला जे करायला पाहिजे ते काम योग्यरीतीने करा. विनाकारण त्यांना कुणीही "डिवचन्याचे वा चिमटे" घेण्याचे काम करू नये.
पथदिवे नसल्याने व ह्या पुलावर जागोजागी आपले "चंद्रमुखी" चेहरे दाखविणारे मोठमोठे बॅनर लावण्यात आल्याने हा दुर्दैवी अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.नगर पालिका प्रशासनाने आता तरी "थोडी लाज" वाटत असेल तर पथदिवे लावण्याची व्यवस्था करून सर्वसामान्य जनतेच्या जिविताशी खेळण्याचे उद्योग बंद करावेत.कोणत्याही शहरातील जनता शांत आहे तोवर सगळे ठीक आहे.मात्र ती जर का आपल्या "औकाती"वर आली तर तिथे कुणाचेही काहीच चालत नाही.
शहरांत येण्यापूर्वी "माणुसकी" अकोला नाक्यावर ठेवून शहरात येणाऱ्या अधिकाऱ्यांना एकच सांगणे आहे की, आज शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते नगर पालिकेत असलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांना ह्याच प्रश्नांवर भेटण्यासाठी येण्याची शक्यता आहे.त्यांच्याशी शांतपणे आणि माणुसकीनेच बोला आणि जे काही करायचे असेल ते हे लोकं तुम्हाला भेटायला येण्याच्या आधी करा.म्हणजे तुम्हाला "उडवा उडवी"ची उत्तरे द्यावी लागणार नाहीत. ह्या शहरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.नव्हे ते तुमच्याच हातात आहे.






0 टिप्पण्या