अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक,सहकार गटाचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांनी अनपेक्षित पणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाचा गेल्या काही दिवसांत "राजीनामा" दिला होता.या अचानक घडलेल्या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.तर त्यांच्या राजीनाम्याने सहकार गटात "उभी फूट" पडली असल्याची शंका व्यक्त केल्या जात असतानाच,राजीनामा परत घेण्याचे सगळे मार्ग बंद करीत,घाई घाईने त्यांचा राजीनामा मंजूर करून रिक्त झालेल्या पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर झाल्याने ह्या फुटीवर "शिक्कामोर्तब" झाल्याचे बोलल्या जात आहे.
हिदायत पटेल यांनी गेल्या आठवड्यात वैयक्तिक कारण देत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला होता.त्यांनी दिलेल्या राजीनाम्याची अत्यंत गुप्तता पाळण्यात येवून त्याला संचालक मंडळाची मंजुरात घेवून पुढील कार्यवाहीस्तव जेडीआर कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता.ह्या कार्यालयाने रिक्त झालेल्या पदाची निवडणूक घेण्यासाठी अकोल्यातील डीडीआर डॉ.प्रवीण लोखंडे यांना निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त केले असून त्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर केला आहे.
कालच अकोल्यातील एका वर्तमानपत्रात ह्याबाबत जाहीर सूचना प्रकाशित झाली असून त्यात ह्या पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे.१० फेब्रुवारी रोजी एकाच दिवसांत ह्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे त्यावरून स्पष्ट होत आहे.
हिदायत पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागी "कुणाला" उमेदवारी देवून संचालक पदी बसविणार हे अद्याप तरी "गुलदस्त्या"त आहे. त्या उमेदवारी बाबत अत्यंत गुप्तता पाळली जात असून त्याची कल्पना सहकार क्षेत्रातील बऱ्याच दिग्गजांना सुद्धा नसल्याचे दिसून येत आहे. सहकार क्षेत्रातील अनेक लहान मोठ्यांना ह्या बाबत विचारणा केली असता त्यांनी काहीच माहीत नसल्याचे सांगितले तर काहींनी राजीनामा व रिक्त पदाची निवडणूक ह्या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास चक्क नकार दिला आहे.ह्या सर्व बाबींवरून एकच निष्कर्ष निघतो,तो म्हणजे येत्या १० तारखेला निवडणूक होणारच नाही तर ती फक्त "निवड" होईल.एकच उमेदवारी अर्ज दाखल करून ही निवडणुकच "अविरोध" केल्या जाणार असल्याचे अगदी स्पष्ट चित्र आहे.





0 टिप्पण्या