आमदाराने ग्रामसेवकाची कानपट्टी शेकली; ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन...



   अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हसनापूर गट ग्रामपंचायत अंतर्गत शिरजगाव येथील एका महिला लाभार्थ्यांच्या घरकुल संबंधित समस्येवरून उद्भवलेल्या वादात दर्यापूरचे शिवसेना आमदार गजानन लवटे यांनी ग्रामसेवकाच्या कानपट्टीत लगावल्याची खळबळ जनक घटना सोमवारी दिनांक ३ फेब्रुवारीला घडली आहे. 


    गट ग्रामपंचायत हसनापूर अंतर्गत शिरजगाव येथील रहिवासी एक महिला सोमवारी दुपारी घरकुलाशी संबंधित समस्या घेऊन आमदार गजानन लवटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात गेली होती. ह्या महिलेची समस्या ऐकून घेतल्यावर आमदार लवटे यांनी हसनापूरचे ग्रामसेवक सुनील मोहोड यांना कार्यालयात बोलावून घेत.संबंधित लाभार्थ्यांचे घरकुलाचे अनुदान मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे, असे ग्रामसेवक मोहोड यांना सांगितले असता त्या लाभार्थ्यांचे अनुदान काढण्यासाठी त्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. ते माझे काम नसून लाभार्थी व बँकेचे आहे,असे ग्रामसेवक मोहोड यांनी लवटे यांना सांगितले. त्यावरून त्यांच्यात त्यावेळी शाब्दिक वाद झाला. या वादात आमदार लवटे यांनी चक्क ग्रामसेवक मोहोड यांच्या कानपट्टीत लगावली. या घटनेने अंजनगाव तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

    सुनील मोहोड,ग्राम सेवक यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ह्या दुर्दैवी घटनेची माहिती  देताना सांगितले की, माझ्या ग्रामपंचायतीचे काम पूर्ण झालेले आहे. लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसल्याने त्यांचे पैसे हे खात्यात पडून आहेत. बँक खाते मोबाईल क्रमांका सोबत जोडले की, त्यांना कोणतीही अडचण राहणार नाही, असे मी आमदारांना सांगितले. त्यावेळी त्यांनी माझे काहीही ऐकून न घेता मला मारहाण केली.


     तर आमदार गजानन लवटे यांनी सांगितले की संबंधित लाभार्थी महिलेच्या घरकुलाचे अनुदान कसे मिळेल, यासाठी चर्चा करण्या साठी ग्रामसेवकास बोलावले असता,जो पर्यंत ह्या  महिलेच्या सासऱ्याचे निधन होत नाही,तो पर्यंत पर्यंत अनुदान निघणार नाही,असे ग्रामसेवक मोहोड यांनी म्हटल्याने शाब्दिक वाद झाला. परंतु,त्यांना कोणत्याही स्वरूपाची मारहाण केली नाही.


     सदरहू घटनेच्या निषेधार्थ अंजनगाव तालुक्यातील ग्राम सेवकांनी एक दिवसाचे काम बंद आंदोलन सुरू केले असून त्यांनी आपल्या निवेदन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या