अकोला जिल्ह्यात अकोट शहर,हिवरखेड व दहीहांडा पोलिस स्टेशनला असताना अत्यंत "टररेलिने" वागून आपल्या "एककल्ली" स्वभावाने परिसरातील नागरिकांना वेठीस धरीत "हुकूमशाही" पद्धतीने आपल्या ठाण्याचा कारभार पाहणाऱ्या एपीआय प्रेमानंद कात्रे याची अखेर आज "पायली भरली" असून अकोल्यात वाचल्यावर अखेर तो नागपूर एसीबीच्या "तावडीत सापडला"च आहे.
प्रेमानंद कात्रे याची अमरावती विभागातून नागपूर विभागात बदली झाल्यावर त्याला नागपूर शहरात देण्यात आले होते.आजरोजी त्याला शहरातील कोराडी पोलिस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली होती.त्याही ठिकाणी त्याने आपली खाबुगिरी सुरूच ठेवली होती.मात्र याठिकाणी त्याला "शेरास सव्वाशेर" म्हणतात त्याप्रमाणे एक "सव्वाशेर" भेटलाच आणि त्याने त्याचा "गेम" सुद्धा करून दाखविला आहे.
नागपूर शहरातील रहिवाशी असलेल्या ४२ वर्षीय तक्रारदाराने नागपूर एसीबीच्या कार्यालयात जावून दिलेल्या तक्रारीनुसार यातील तक्रारदार यांचे विरुद्ध संयुक्त मालकीचे मौजा कवठा ता.कामठी येथील शेतीचे विक्रीपत्र व फसवणूक केल्याचे तक्रार अर्ज पोलीस ठाणे कोराडी येथे करण्यात आला असून,नमूद प्रकरणात तक्रारदार यांचेवर कोणतीही कारवाई न करता सेटलमेंट करून देण्यासाठी प्रेमानंद कात्रे यांने तक्रारदार यांना २,००,००० रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार यांनी दिनांक ४/०२/२०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूर येथे तक्रार दिली होती. त्याअनुषंगाने दि.५/२/२०२५ रोजी पडताळणी केली असता आरोपी प्रेमानंद कात्रे यांने पंचांसमक्ष २ लाख रुपयांची स्वतः लाचेची मागणी करून २ लाख रुपये पोलिस ठाणे कोराडी येथे पंचांसमक्ष स्वीकारले असता त्यांस रंगेहात पकडण्यात आले असून त्याला लाच म्हणून स्वीकारलेल्या रक्कमसह ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपी प्रेमानंद कात्रे याच्या अंगझडतीत त्याच्याकडे फक्त ३०० रुपये मिळून आले आहेत तर त्याच्या घराची घरझडती घेणे सुरू आहे. आरोपीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवली आहे.
आरोपी प्रेमानंद दादाराव कात्रे,वय ४३ वर्ष, पद-सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस ठाणे कोराडी, नागपूर शहर (वर्ग -२ राजपत्रित)
याच्या विरुद्ध तो कार्यरत असलेल्या कोराडी पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरहू कारवाई रोशन यादव,पोलीस उपअधीक्षक, लाप्रवी नागपूर यांच्या मार्गदर्शनात सापळा व तपासी अधिकारी प्रिती शेंडे,पोलीस निरीक्षक,लाप्रवि,नागपूर यांच्या सापळा कारवाई पथकातील
पो.नि.निलेश उरकुडे,पोहवा.भागवत वानखेडे, पोहावा.भरत ठाकूर,पो.शि. हेमराज गाजरे, मपोशी.दिपाली भगत,चापोशी.विजय सोळंके यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.




0 टिप्पण्या