किरीट सोमय्या आज अकोला व अंजनगावला बांगला देशींची तक्रार करणार...



राज्यात थोडेथोडके नव्हे तर दोन लाख बांगलादेशींना जन्म दाखल्याचे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. २०२४ मध्ये दोन लाख बांगलादेशी (रोहिंग्या) स्थलांतरितांना असे जन्मदाखले देण्यात आले,असल्याचेही त्यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे.


त्यांनी अकोला जिल्ह्यातील तहसीलदार यांनी देखील असे दाखले दिल्याचा आरोप केला असून त्यासाठी ते अकोल्यात येवून कागदपत्रांची पडताळणी देखील करून गेलेले आहेत.तर अकोला जिल्ह्यात सर्वाधिक १५,००० जन्म नोंदीचे आदेश देण्यात आले असून सर्वात जास्त आदेश अकोला शहरात देण्यात आले आहेत.त्यांची संख्या जवळपास ४५०० च्या घरात आहे.ही आकडेवारी सोमय्या यांनीच माध्यमांना दिली आहे.


किरीट सोमय्या यांनी जिल्ह्यानुसार जन्म प्रमाणपत्र वाटल्याची आकडे वारी दिली असून ते म्हणाले,की यवतमाळला १३,५००, अमरावती आणि अकोलामध्ये १५,००० लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे. तर अकोला शहरात ४५०० लोकांना प्रमाणपत्र मिळाले आहे. अमरावती मधील अंजनगाव सुर्जीमध्ये २२ हजार मुस्लिमांची संख्या असून त्यात १,४८० बांगलादेशी मुस्लीम यांना दाखले देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात असे दाखले देण्यात आल्यामुळे राज्य शासनाकडून त्यासाठी एका एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.तहसील कार्यालयातून तहसीलदार यांनी बांगला देशी नागरिकांना चुकीच्या पद्धतीने जन्म दाखले देण्यात आल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नुकतेच करून संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडवून दिली होती.


भाजपाचे किरीट सोमय्या आज गुरुवार दि.६/२/२०२५ ला अकोल्यातील रामदास पेठ व अंजनगाव सर्जी पोलीस ठाण्यात ह्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी येत आहेत.आता ही तक्रार ते नेमकी कुणा कुणाच्या विरोधात दाखल करतात हे "गुलदस्त्या"त असले तरी असे प्रमाणपत्र घेणारे लाभार्थी व त्यांना ते देणारे सक्षम स्वाक्षरी करणारे अधिकारी यांच्याच विरुद्ध ही तक्रार असू शकते.हे कुणाला समजावून सांगण्याची आवश्यकता नाही.ह्यामध्ये अंजनगाव व अकोल्यातील तहसीलदार यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.


किरीट सोमय्या हे आज सकाळी हावडा मेलने मूर्तिजापूर येथे येत असून तेथून दर्यापूर मार्गे अंजनगाव पोलिस स्टेशनला ९:३० वाजता तक्रार देवून अकोट मार्गे चारचाकी वाहनाने अकोल्याला रामदासपेठ पोलिस स्टेशनला १२:३० वाजता तक्रार देवून मुंबईला रवाना होणार आहेत.किरीट सोमय्या ह्यांना केंद्र शासनाने झेड सुरक्षा दिलेली असल्याने ते ह्या फौज फाट्या सोबतच पोलिस ठाण्यात जाणार आहेत.सीआयएसएफ जवानांचा तगडा पोलिस बंदोबस्त त्यांच्या सुरक्षेसाठी राहणार आहे.


त्यांनी दिलेली तक्रार ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीत न ठेवता त्यावर लगेच संबंधित लोकांवर गुन्हे दाखल होवून एफआयआरची प्रत घेवूनच ते येथून निघणार आहेत हेही तितकेच खरे.यातील लाभार्थी व स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यावर पोलिस तपासात आणखी कोण कोण आरोपी होवू शकतात हे पाहणे पुढे पोलिसांचे काम राहणार आहे.त्यामुळे उद्या कुणा कुणाला अटक होते हे पाहण्याची सर्वसामान्य लोकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या