अंजनगाव नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांचे केलेले पाप झाकण्याचे प्रयत्न...



   अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या नगर पालिका प्रशासनाच्या कचरा व्यवस्थापनाची एकूणच  गंभीर समस्या निर्माण झाली आहे.पत्रकार श्रीकांत नाथे यांनी शहराच्या विकासात्मक आणि आरोग्यदायी कामकाज विषयक मुद्यांवर उपोषण केल्यावर नगर परिषद प्रशासन खळबळून जागे झाले आहे. 

   मात्र,गेल्या काही काळात जाणीव पूर्वक करण्यात आलेल्या आपल्या चुका लपवण्याचा प्रयत्न नगर पालिका प्रशासन कचरा ठेकेदाराच्या संगनमताने करीत असून कचरा डेपोवरील प्रचंड प्रमाणात साठविण्यात आलेला कचरा दुसऱ्या ठिकाणी नेवून टाकत आहे.नगर पालिकेच्या आरोग्य विभागाची ही कृती पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असून कचऱ्यावरील शास्त्रोक्त पद्धतीने  विलीगिकरण करून त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती न करता परस्पर विल्हेवाट लावण्यात येत आहे.संबंधित ठेकेदाराला शहरातील कचरा गोळा करून त्याची व्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यवधी रुपये बिलापोटी दिल्या जात असताना ही अधिकाऱ्यांच्या संगनमताने शासन निधी लाटल्या जातोय अशी चर्चा संपूर्ण शहरात आहे.



    अंजनगाव शहराच्या बाहेर अकोट रस्त्यावर नगर पालिकेचे डम्पिंग ग्राउंड असून त्याठिकाणी शहरातील कचरा साठवून ठेवण्यात येत असतो.आजरोजी ह्या ग्राउंड ची कचरा साठविण्याची क्षमता संपली असून दुसरीकडे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे कामच सुरू करण्यात आलेले नाही.त्यामुळे हाच कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्या साठी ह्याच ग्राउंडच्या पुढे काही अंतरावर रस्त्याच्या बाजूला मोठे खड्डे करून त्यात हा कचरा टाकून वरून पुन्हा काढण्यात आलेली माती,दगड टाकण्यात येत आहेत.

    ही शासनाची तथा करोडो रुपये कर रूपाने भरून नगर पालिकेला सहकार्य करणाऱ्या लाखो नागरिकांची शुद्ध फसवणूक असून ही फसवणूक करणारे कचरा ठेकेदार,आणि नगर पालिकेतील अधिकारी,कर्मचारी यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. हे तर काहीच नाही, बीड, परळीत जाऊन पहा भ्रष्टाचार कशाला म्हणतात ते, मुंडे, कराड, आंधळे, सर्व बरच बर आहे या सरकार काळात 😒😖😟😮‍💨😢😠😩😫😔😣😏😤

    उत्तर द्याहटवा