पूजा खेडकर यांचे पुणे जिल्हाधिकारी यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप...



प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने कालच रद्द केली असून त्यांना यापुढे यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेसाठी बसण्याची  परवानगी मिळू शकणार नाही. त्यांच्यावर आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई सुरू आहे. न्यायालयात आपली बाजू मांडत असताना पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. याआधी त्यांनी वाशिम येथे बदली झाली होती,त्याचवेळी सुहास दिवसे यांच्या विरोधात पूजा खेडकर यांनी लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. "ती लैंगिक छळाची तक्रार केल्यामुळेच माझ्याविरोधात इतकी कठोर कारवाई होत आहे", असा आरोपच पूजा  खेडकर यांनी केला आहे. मात्र दुसऱ्या बाजुला पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसें यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगितले आहे.

   सुहास दिवसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पूजा खेडकर यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयत ३ जून ते १४ जून या कालावधी साठीच आल्या होत्या. या कालावधीत मी केवळ तीनच वेळा माझ्या कार्यालयात त्यांना भेटलो, तेव्हा त्याठिकाणी इतर अधिकारी आणि वकील मंडळी सुद्धा समोर बसलेले होते.त्याच दरम्यान पूजा खेडकर यांची बदली १४ जून नंतर विभागीय आयुक्त कार्यालयात झाली.


   सुहास दिवसे पुढे म्हणाले, पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात असताना त्यांनी छळाची कोणतीही तक्रार केली नाही. मी राज्य सरकारकडे त्यांची तक्रार केल्यानंतर त्याच्या उत्तरादाखल त्यांनीही सरकारला पत्र लिहिले होते, त्या पत्रातही त्यांनी छळाचा कोणताही उल्लेख केलेला नाही. पण जेव्हा त्यांची वाशिमला बदली झाली, तेव्हाच लैंगिक छळ झाला असल्याबाबत त्यांनी तिथून  तक्रार दाखल केली.

   पूजा खेडकर ह्या प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात काम करत असताना यांनी नियमबाह्य वर्तन केल्याचे दिवसे यांनी सांगितले. खासगी वाहनावर अंबर दिवा लावणे, शिपाई आणि कर्मचारी वर्ग मागणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दालन हडपणे यासारख्या बाबी घडल्यामुळे प्राप्त तक्रारीनुसार जिल्हाधिकारी दिवसे यांनी राज्य सरकारला पत्र लिहून पूजा खेडकर यांची तक्रार केली होती. दिवसे यांच्या तक्रारी नतंर पूजा खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली होती. वाशिमला गेल्या गेल्याच पूजा खेडकर यांनी दिवसे यांच्यावर लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती.

    यूपीएससीने गुन्हा दाखल केल्यानंतर पूजा खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार  आहे. बुधवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात पूजा खेडकर यांचे वकील माधवन यांनी त्यांची बाजू मांडली.

    न्यायालयात पूजा खेडकर यांची बाजू मांडत असताना वकील माधवन यांनी पुणे जिल्हाधिकारी दिवसे यांच्यावर फारच  गंभीर आरोप केले. ते म्हणाले, सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांना रूममध्ये बोलावले होते, मात्र पूजा खेडकर यांनी त्यास नकार दिल्याचे सांगितले आहे. त्यानंतर पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सरकारी यंत्रणांनी त्यांच्या विरोधात इतकी तत्परता का दाखवली ? माझ्या अशिलाला स्वतःच्या बचावाची संधी मिळाली पाहीजे, असा युक्तिवाद पूजा खेडकर यांच्या वकिलांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या