बदली,बढती,सेवानिवृत्ती आणि वाढदिवसाला फेटे बांधून हारतुरे, सत्कार स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही...




   पोलिस विभागातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर त्यांना मोठ्या उत्साहात समारंभ पूर्वक निरोप दिला जातो. फेटे बांधणे,हार,बुके देणे,फुलांची रास करून पाकळ्यांचा वर्षाव,अशा नानाविध प्रकारे निरोप दिला जातो.पोलीस ठाण्याचे आवारात काही चिल्लर लोकांना बोलावून अनेक पोलीस अधिकारी कायद्याला खुंटीवर टांगून जाहीररीत्या वाढदिवस साजरा करू ते फोटो व व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल करतात. मात्र असले प्रकार सर्व सामान्यांमध्ये चेष्टेचा,उपहासाचा विषय बनत आहेत.यापुढे पोलिस विभागात असे समारंभ आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा देत राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी तसे आदेशच जारी केले आहेत. बदली झाल्यावर गाडीतून मिरवणूक कशाला पाहिजे ? असे म्हणत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी अशा बदली समारंभावर चाप लावला आहे.

   बुधवारी त्यांनी याबाबत स्पष्ट आदेशच जारी केले आहेत. राज्य पोलिस विभागात विविध दर्जाच्या पोलिस अधिकारी,अंमलदारांच्या शासन नियमानुसार बदल्या होतात.ठरावीक काळानंतर या बदल्या निश्चित असतात.
अधिकारी स्तरावर एका घटकातून दुसऱ्या घटकामध्ये बदली होते. अशावेळी त्यांच्या सन्मानार्थ संबंधित ठाणे,विभाग किंवा मुख्यालयात निरोप समारंभ आयोजित केले जातात.अधिकाऱ्यांना वाहनात बसवून कर्मचाऱ्यांनी दोराने ओढणे,वर्दीवर फेटा परिधान करणे,हे पोलिस दलाच्या कार्यप्रणालीला अनुसरून नसल्याचे स्पष्ट मत डिजीपी रश्मी शुक्ला यांनी या पत्रात मांडले आहे.

     राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे वाढदिवस त्या पोलीस स्टेशन परिसरातील गावगुंड वा प्रदिद्धीसाठी आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेली मैत्रीच्या नावावर सर्वसामान्य लोकांची लुबाडणूक करण्यासाठी या फोटो वा व्हिडिओला वेगवेगळ्या ग्रुपवर व्हायरल करून आपला धाक निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि पोलीस अधिकारीही त्यांना यासाठी एकप्रकारे उत्तेजन देत असतात.अशा प्रकारातून जनतेची फसवणूक तर होतेच मात्र पोलीस विभागाची देखील चांगलीच नाचक्की होते.म्हणून यापुढे असे कोणतेही प्रकार यापुढे होऊ नयेत यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांना काही निर्देश देण्यात आले आहेत. कुठेही असे प्रकार सुज्ञ नागरिकांच्या निदर्शनास आल्यास त्यांनी ते जिल्हा पोलिस प्रमुख किंवा पोलीस विभागाच्या वेबसाईटवर टाकून पोलीस विभागाला सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन देखील याच पत्रात करण्यात आले आहे.

  यापुढे बदली होताना कुठलेही ठाणे,शाखा, विभाग किंवा मुख्यालयात अशा प्रकारचे समारंभ,वाढदिवस साजरे होणार नाहीत आणि अशा प्रकारे पोलीस विभागाची नाचक्की होणारे कोणतेही आयोजन केल्या जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी याबाबत संबंधितांना तशा सूचना करून या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आदेशात देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या