आठवडी बाजाराची "गोदरी" करून,कलदार चौकात सजतोय कोटी रुपये खर्चून "छटाकभर" भाजीबाजार...




    अकोला जिल्ह्यातील अकोट नगर पालिकेला शंभर वर्षांच्यावर जुनी असल्याचा इतिहास आहे.तर याच नगर पालिकेच्या समोर दर रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराला देखील तेवढाच जुना इतिहास आहे.नगर पालिकेच्या आवारात असलेल्या जुन्या वास्तू पाडून नवीन चकचकीत इमारत जरी उभी करण्यात आली असली तरी आजही जुने जाणते लोकं तिचा उल्लेख "कमेटी" असाच करतात.आणि याच जुन्या कमेटीच्या समोर अंदाजे ५०/६० एकरांच्या जवळपास विस्तीर्ण असा रिकामा परिसर होता.ज्यामध्ये त्याकाळी अकोट शहरातील विखुरलेल्या विविध भागातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आठवडी बाजार भरविल्या जात असायचा.ज्यामध्ये नागरिक आठवडाभर पुरेल इतका धान्य,भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा खरेदी करून साठा करून ठेवायचे.

     त्याकाळात लोकांचे खरेदी विक्रीचे व्यवहार हे पैशांच्या रुपात नसत तर ते बलुतेदारीच्या पद्धतीने व्हायचे. त्यामुळे या बाजारात बारा बलुतेदारांची बसण्याची स्थाने निश्चित करून देण्यात आलेली होती.व त्याच पद्धतीने या बाजारातील व्यवहार व्हायचे.या बाजारावर त्याकाळी कमेटी अर्थात नगर पालिकेचे पूर्णतः नियंत्रण असायचे.नगर पालिकेसमोर एक मोठा गुरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी धर्माळ होता,तर त्या वेळी बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारातच एक इमारत होती,नंतर त्याठिकाणी वाचनालय सुरू करण्यात आले होते. पुढे तीही जागा पचविण्यासाठी काही लोकांनी ते वाचनालय पाडले,मात्र त्यावेळचे आमदार स्व.जगन्नाथ ढोणे यांनी याला विरोध करून हा प्रयत्न हाणून पाडला होता. त्याचठिकानी एक विहीर होती(आजही आहे,मात्र पाण्याचा उपसा नसल्याने पाणी वापरण्यायोग्य नाही) या आणि नगर पालिकेच्या आवारात असलेल्या विहिरीवरून बाजारात माल विक्रीसाठी घेऊन आलेले व्यापारी व गिऱ्हाईक म्हणून आलेल्या शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पिण्या व वापरण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिल्या जात होते.असा एकंदरीत या अकोटच्या आठवडी बाजाराचा इतिहास आहे.


    नंतरच्या काळात झपाट्याने अकोट शहराचे शहरीकरण वाढायला लागले तशी या बाजाराची देखील नागरिकांना जास्तच गरज पडायला लागली.मात्र काळाच्या ओघात कमेटीची नगर पालिका अस्तित्वात आल्यावर या बाजाराकडे दुर्लक्ष व्हायला लागले.गेल्या २५/३० वर्षांत चक्क आठवडी बाजारावर अतिक्रमण करून त्याठिकाणी एका बाजूला किराणा मार्केट उभे करण्यात आले तर दुसऱ्या बाजूला पोष्ट ऑफिसकरिता जागा देण्यात आली.तिसऱ्या बाजूला खरेदी विक्रीचे कार्यालयाच्या बाजूला असल्या खुल्या जागेवर त्यांनी मोठे मार्केट उभे केले आणि उर्वरित जागेवर नगर पालिकेने आपले शॉपिंग मार्केट उभे केले.मच्छी मार्केट,मटण मार्केट हे कायमस्वरूपी बांधून देण्यात आले आहे.


     अशारितीने पूर्ण आठवडी बाजार गिळंकृत केल्यावरही उरलेल्या जागेवर भंगार बाजाराचे अतिक्रमण कायम करण्यात आल्याने अकोटच्या ऐतिहासिक आठवडी बाजाराला कोंडवाड्याचे स्वरूप प्राप्त झाले तरी देखील दर आठवड्याला आजही ह्याचठिकानी आठवडी बाजार भरतो हे विशेष.३० वर्षे आधी "आययुडीपी" योजने अंतर्गत बांधण्यात आलेले आणि "विदर्भ वैधानिक मंडळा"ने नगर पालिकेला बांधून दिलेले शॉपिंग मार्केट ढासळायला लागले असून ते केव्हाही जमीनदोस्त होऊन १०/२० लोकांचे जीव आरामात घेऊ शकते, मात्र त्याची काळजी ना ते गाळे ताब्यात असलेल्या दुकानदारांना आहे ना नगर पालिकेच्या बांधकाम विभागाला.याच बाजारातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या भागातील काही इमारती ह्या अत्यंत धोकादायक झालेल्या असून त्या कधीही आजूबाजूच्या दुकानातील ५/१० लोकांचे जीव घेऊ शकतात. याकडेही नगर पालिकेतील कुंभकर्णी झोपेत असलेल्या व या शहरातील नागरिक व त्यांच्या समस्यांशी काहीच देणे घेणे नसलेल्या व नव्यानेच उदयास आलेल्या "राज्य सेवा संवर्गा"तील कर्मचारी,अधिकारी यांना कोण जागे करणार ? 

      या आधीच्या लेखमालेत आम्ही अकोटच्या आठवडी बाजाराची अत्यंत वाईट अवस्था नगर पालिका प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला होता,मात्र त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांनी अजूनही तिकडे लक्ष दिलेच नाही ही संतापजनक बाब आहे.


    अकोटच्या या ऐतिहासिक आठवडी बाजाराची चक्क "गोदरी" करून हीच नगर पालिका व येथील अधिकारी या शहरातील हजारो नागरिकांच्या जखमांवरील खिपल्या काढून त्यावर "तिखटमीठ" चोळण्याचा प्रयत्न करीत आहेत.


   शहरातील तहसीलदार बंगल्याच्या मागे हिवरखेड व पोपटखेड रोडच्या टी पॉइंटवर असलेल्या "कलदार चौका"त नगर पालिकेच्या मालकीच्या असलेल्या "छटाकभर" जागेत या भागातील नागरिकांसाठी भाजीबाजार तयार करीत आहे.यासाठी मागील वर्षी जवळपास ७० लाख रुपयांचे टेंडर देखील काढण्यात आले असून या बाजाराचे काम पूर्णत्वास आले असून फक्त काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम बाकी आहे. एकदोन दिवसांत तेही होवून जाईल.

     याठिकाणी  बांधण्यात येत असलेला भाजीबाजार हा अकोट शहरातील "भ्रष्टाचारा"चा जागतिक अर्थात "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये नोंद घेण्यासारखा एक अनोखा प्रकार असून अकोट शहरात खरोखर लोकप्रतिनिधी,विविध पक्षाचे राजकारणी नेते, कार्यकर्ते, समाजसेवी,राज्य व देशपातळीवरील भ्रष्टाचार विरोधी संघटनांचे तथाकथित कार्यकर्ते याच शहरात राहतात की पोपटखेडला ? हाच फार मोठा प्रश्न पडलेला आहे.(वर उल्लेख केला गेलेल्या लोकांनी वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही,कारण या शहरात जर का कुणी अशा काही गोष्टींविरुद्ध आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तर त्याचे काय परिणाम होतात,हे संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला चांगल्या रीतीने माहीत आहे.म्हणूनच कुणीही नजरेने दिसत असूनही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यातच आपले हित पाहत आहे.) 

     या भाजीबाजाराचा विकास करून याठिकाणी या भागातील नागरिकांसाठी  छोटासा भाजीबाजार भरविण्याचे प्रयत्न गेल्या २० वर्षां पासून होत आहेत.त्यासाठी नगर पालिकेत सत्तेत असलेल्या तत्कालीन लोकांनी लाखो रुपये खर्च देखील केलेला आहे.आजही अकोट नगर पालिकेच्या बांधकाम व लेखा विभागात याच भाजीबाजार विकासासाठी करण्यात आलेल्या खर्चाचे हिशोब खातेपुस्तकांत उपलब्ध आहेत.गेल्या वीस वर्षांत अंदाजे ३० लाख रुपयांच्यावर खर्च याठिकाणी करण्यात आलेला आहे मात्र हा भाजीबाजार आजपर्यंतही एक दिवस तर सोडा एक तासही सुरू झालेला नाही.हे दुर्दैव आहे.

   भाजीबाजार सुरू करण्याची कल्पना ज्या कुणाच्याही सुपीक डोक्यात आली असेल त्या व्यक्तीने व अधिकाऱ्याने २००५ च्या दरम्यान याठिकाणी दगड,सिमेंटचे लाखो रुपये खर्च करून काही "ओटे" बांधले होते,त्यावेळी शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना नगर पालिकेने आवाहन करूनही कोणताच विक्रेता याठिकाणी भाजीपाला विक्री करण्यासाठी गेला नाही.आणि नगर पालिकेने सुद्धा याकडे दुर्लक्ष केले.जवळपास १०/१५ वर्षे हे बाजार ओटे तसेच दुर्लक्षित राहिले.

    नंतर मात्र २०२०/२०२१ च्या दरम्यान "कोरोना" काळात अकोट नगर पालिकेचे तत्कालीन अध्यक्ष माकोडे व त्यांचे सल्लागार यांच्या डोक्यातून याठिकाणी भाजीबाजार सुरू करण्याची कल्पना आली आणि त्यांनी याठिकाणी १५ वर्षांत वाढलेली मोठमोठी झाडे विना परवानगी ( तेव्हा परवानगी देणे त्यांच्याच हातात होते.) तोडून वाढलेले जंगल साफ करण्याचा निर्णय घेऊन "थोडाथोडका" खर्च करून हा भाजीबाजाराचा परिसर पुन्हा एकदा साफसफाई करून मोकळा केला आणि या परिसराला चौफेर काटेरी तारांचे कुंपण घेऊन हा परिसर सुरक्षित केला यासाठी किती खर्च केला त्याची आकडेवारी नगर पालिकेच्या बांधकाम व लेखा विभागात उपलब्ध आहे.





(त्यावेळी तोडण्यात आलेली मोठमोठी झाडे व त्याआधी त्याठिकाणी बाजार ओटे अस्तित्वात होते याचे फोटोच सोबत देत आहोत.)







   त्यानंतर गेल्या वर्षी ह्याचठिकानी पून्हा नव्याने भाजीबाजार बांधण्याची कल्पना कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून निघाली आणि त्याला मूर्त रूप देखील देण्यात आले.धडाधड इस्टिमेट बनवून ऑनलाइन,ऑफलाईन टेंडर काढून कंत्राटदाराला "वर्क ऑर्डर" देखील देण्यात आली.त्याही आधी त्याठिकाणी जवळपास ५ लाख रुपये खर्च करून ५० फूट उंचावर "हायमास्ट लाईट" सुद्धा लावण्यात आले.आणि हळूहळू कोणतीही घाई न करता संबंधित कंत्राटदाराने याठिकाणी आधीच तयार करण्यात आलेल्या बाजार ओट्यांवर खड्डे करून त्यावरच लोखंडी अँगलचा ढाचा तयार करून "जुन्याच ओट्यांना" रंगरंगोटी करून आणि परिसरात पेव्हर ब्लॉक बसवून आपली आणि आपल्या पाठिशी असलेल्या "xxडफादरची" दुकानदारी पक्की केली.






( याही कामाचे फोटो उपलब्ध असून याठिकाणी वाचकांना पाहण्यासाठी देत आहोत)









     इतका सगळा खर्च नगर पालिकेने याठिकाणी केला आहे,मात्र तरीसुद्धा याठिकाणी काही लोकांचे अतिक्रमण कायम असून त्यांना मात्र ह्या करण्यात आलेल्या विकासकामामुळे फार मोठ्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.मोठमोठी वाहने यांना सुरक्षितपणे कडीकुलपात ठेवण्यासाठी जणू काही नगर पालिकेने विशेष व्यवस्था या लोकांना उपलब्ध करून दिली असल्याचे दिसत आहे. ( सोबतच्या फोटोत हे सर्व स्पष्टपणे दिसून येत आहे.)
   
 
   यातील जवळपास ८० टक्केच्या वर कामाचे देयक ह्या कंत्राटदाराने वसूल केल्याची माहिती आहे. हा भाजीबाजार तयार करण्यासाठी आजपर्यंत सुमारे एक कोटी रुपयांच्यावर खर्च अकोट नगर पालिकेच्या तिजोरीतून करण्यात आला आहे,आणि ही वास्तविकता आहे,जी कुणीही नाकारू शकत नाही.सोबत दिलेले फोटो याबाबतीत सगळे काही ओरडून सांगत आहेत की ह्या कामात खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे.याबाबतीत गरज आहे ती प्रशासनाने दखल घेऊन योग्यप्रकारे चौकशी करून यात जे कुणी दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा देण्याची.मात्र आजघडीला कुणी स्वतःहून पुढाकार घेईल अशी परिस्थिती नाही.

  सगळ्यांच्या सतरंज्या कुठेतरी अडकलेल्या आहेत.अकोट नगर पालिकेत आजरोजी "अधिकारी राज" सुरू आहे,त्यातही प्रशासक व मुख्याधिकारी असलेले डॉ.नरेंद्र बेंबरे हे आपल्या "कॅबिन व कॅबिनेट" शिवाय कुणाशीच संपर्क ठेवत नाहीत,मग याची चौकशी कोण करेल ? गेल्या दोन वर्षांपासून नगर पालिकेत "लोकनियुक्त" नाही तर "शासननियुक्त" अधिकारी यांचीच चलती आहे.डॉ.बेंबरे हे गेल्या एक वर्षापासून नगर पालिकेत कार्यरत आहेत आणि होत असलेल्या ह्या कामाची त्यांना काहीच कल्पना नाही असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल.


      जिल्हाधिकारी अजित कुंभार हे मुंबई महानगर पालिकेतून अकोल्यात "डायरेक्ट" जिल्हाधिकारी म्हणून आलेले आहेत.नगर पालिकांमध्ये काय काय आणि कसे चालते हे त्यांच्यापासुन लपून नाही.त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतल्यास या भाजीबाजार प्रकारणांतील "पूर्णसत्य" बाहेर येईल.याची खात्री आहे.


     आजरोजी अकोट शहरासाठी खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करणारे आमदार प्रकाश भारसाकळे हेच अकोटच्या जनतेचे "एकमेव तारणहार" आहेत, त्यांनी मनावर घेतल्यास अकोट शहरातील नागरिकांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या "भोंदू लोकांना" उघडे पाडून आमदार भारसाकळे यांनी शासनाकडे भांडून आणलेल्या पैशांचा खऱ्या अर्थाने शहरातील नागरिकांना लाभ मिळेल.अकोट नगर पालिकेच्या तिजोरीत असलेला पैसा हा नागरिकांच्या हितासाठी वापरला जायला हवा,त्याचा जर कुणी स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करीत असेल तर तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रसंगी जनतेनेच आता पुढाकार घ्यायला पाहिजे.जे मुख्याधिकारी शहरातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कोणता निर्णय घेत नसतील वा जनतेच्या हक्काच्या पैशांची लूट उघड्या डोळ्यांनी पहात असतील तर त्यांना त्या शहरात व पदावर राहण्याचा कोणताच हक्क नाही.त्यांना आता याठिकाणी न ठेवता आमदार प्रकाश भारसाकळे यांनी दुसरा कुणीतरी "चांगला अधिकारी" याठिकाणी आणावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लेखमाला भाग :- ३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या