मंडळ अधिकाऱ्या पाठोपाठ, लाचखोर शिक्षणाधिकारी बायको,पोरासह जेल यात्रेला जातोय...





   चोराने कितीही सफाईदारपणे कोणताही पुरावा मागे न ठेवता चोऱ्या केल्या आणि त्या हरामाच्या पैशांवर मौजमजा केली व समाजात कितीही "साव असल्याचा आव" आणला तरी एक ना एक दिवस त्याच्या पापांची पायली भरते म्हणजे भरतेच.हे कलियुग आहे, इथे केलेल्या "कर्माचा हिशोब" इथेच होतो.पाप पुण्याचा हिशोब ठेवणारा "चित्रगुप्त" देखील आजकाल पाप पुण्याचे सगळ्यांचे "ऑनलाईन खाते" ठेवायला लागला आहे.या भूतलावरील सर्व प्राणिजातीचा हिशोब चित्रगुप्तच्या संगणकात "जेव्हाच्या तेव्हा फीड" होतो. त्याला कुणावर अवलंबून राहावे लागत नाही की त्याच्याकडे आजारी रजा, विकेंडची सुट्टी, लग्नमरणासाठी दांडी मारून कामचुकारपणा करणारा कर्मचारीवर्ग नाही.लाच घेऊन नोंदी गायब करण्याचा तर प्रश्नच नाही.



     आज महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात शिक्षणाधिकारी या पदावर राहून करोडो रुपयांची माया जमविणारया किरण अनंत लोहार याच्याबाबतीत असेच काहीसे घडले आहे. सरकारी नोकरी करीत असतांना हजारो,लाखो नव्हे तर करोडो रुपयांची "अवैध संपत्ती" जमवून त्यातून बायको व पोरांच्या नावावर करोडो रुपयांची अचल संपत्ती उभी करून अगदी थाटामाटात समाजात उजळ माथ्याने वावरत असतांनाच त्याला आपल्या व बायको, पोराच्या आयुष्यात काय लिहून ठेवले आहे त्याचा अंदाजच आला नाही. गेल्या वर्षभरापूर्वीच त्याला २५ हजार रुपयांची लाच घेत असतानाच रंगेहाथ अटक करण्यात आली होती,आणि सोलापूर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केवळ एक वर्षात त्याची संपूर्ण जन्मकुंडली काढून तब्बल ५ कोटी ८५ लाख रुपयांची त्याने कमावलेली अवैध मालमत्ता शोधीत आज त्या संपूर्ण कुटुंबावर अपसंपदेचे गुन्हे नोंदविले आहेत.

   यापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील महसुलचा एक मंडळ अधिकारी सुद्धा असाच अपसंपदेच्या प्रकरणांत बायको व पोरासह जेलमध्ये दोन महिन्यांपूर्वीच गेला आहे. आज पुन्हा त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली असून आता हे शिक्षणाधिकारी महोदय सहकुटुंब जेलयात्रेला जायच्या तयारीत आहेत.

  
     आरोपी १) किरण अनंत लोहार, वय ५० वर्ष,पद-शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद सोलापूर, २) पत्नी सौ.सुजाता किरण लोहार,वय ४४ वर्ष, ३) मुलगा निखिल किरण लोहार, वय २५ वर्ष,सर्व राहणार प्लॉट नं.सी.२,आकांक्षा शिक्षक कॉलनी,  पाचगाव,ता.करवीर,जि.कोल्हापूर, या तिघांच्या विरुद्ध सोलापूर मधील सदर बझार पोलीस ठाण्यांत गुन्हा रजि.नं. ७६८/२०२३ नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम १३(१)(ई),१३(२)                      भारतीय दंड संहिता कलम १०९ तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन २०१८ चे कलम १३(१) (ब), १३(२) सहकलम १२ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या प्रकरणांत उमाकांत नेताजी महाडिक, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर हे फिर्यादी आहेत.
                                                                    
                            
    लोकसेवक किरण लोहार, शिक्षणाधिकारी, प्राथमिक,जिल्हा परिषद,सोलापूर याने लोकसेवक या नात्याने कर्तव्य करीत असताना परिक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किमतीची अशी ५,८५,८५,६२३.८ रूपये  किमतीची अपसंपदा संपादित केल्याचे व त्याची पत्नी नामे सौ.सुजाता किरण लोहार व मुलगा निखिल किरण लोहार या दोघांनी लोकसेवक किरण लोहार याला भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा देऊन व सहाय्य केले असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

  अपसंपदा कमावण्याचा कालावधी हा दि.१५/११/१९९३ ते दि.३१/१०/२०२२ हा असून लोहार कुटुंबाच्या अपसंपदेची              टक्केवारी ही १११.९३% टक्के इतकी आहे.


     सदरहू कारवाई अमोल तांबे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.पुणे परिक्षेत्र,डॉ.शीतल जानवे/खराडे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे,यांचे मार्गदर्शनात गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,सोलापूर,यांचे नेतृत्वात चौकशी अधिकारी उमाकांत महाडिक,पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांनी गेल्या वर्षभरात अहोरात्र परिश्रम घेऊन पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या