आर.आर.आबांच्या भावाचा साधेपणा...



    महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर आर आबा यांचे पोलीस खात्यात असलेले भाऊ राजाराम पाटील उर्फ तात्या आता सेवानिवृत्त झाले आहेत.अनेकांना आबांचे भाऊ पोलीस खात्यात नोकरीत होते हे निवृत्तीदिवशी समजलं.


   राजाराम पाटील हे पोलीस खात्यात आणि परिसरात तात्या म्हणून परिचित आहेत.ते सेवानिवृत्त होताना पोलीस उपअधीक्षक या पदावर होते.त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आपण विसरू शकत नाही. त्यांच्या हातातील घड्याळ एकदम साधे आहे.इतर अधिकाऱ्याच्या मानाने हाताला न शोभणारे!या घड्याळाची गोष्ट ते सांगतात,'ते महाविद्यालयात असताना त्यांच्याकडे घड्याळ नव्हते.त्यांचे एक मित्र विलास खाडे यांनी त्यांना १८० रुपये (एकशे ऐंशी) खर्च करून एक घड्याळ घेतले.एक एकशे ऐंशी रुपये तो मित्र आणि त्याचे आईवडील यांनी शेतावर मजुरी करून मिळवले होते.पुढे राजाराम तात्या पोलीस अधिकारी झाले. त्यांच्या सासुरवाडीच्या लोकांनी त्यांना भारी किंमतीचे घड्याळ दिले मात्र त्यांनी ते स्वीकारले नाही.पोलीस खात्यात दैदिप्यमान कामगिरी केल्यावर त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले तेव्हाही त्यांना काही मित्रांनी ब्रॅण्डेड घड्याळ देऊ केले पण त्यांनी तेही घड्याळ नाकारले,आणि आजअखेर त्यांच्या हातात विलास खाडे या मित्राने दिलेले तेच घड्याळ आहे.


      मला हे घड्याळ पाहिलं की विलास आणि त्याच्या आईवडिलांनी माझ्यासाठी गाळलेला घाम आठवतो.त्यांच्या कष्टाने मला मिळालेली ही अनमोल भेट आहे.मी काळजासारखी जपलीय आजवर. हे सांगताना तात्या भावुक होतात.

     विलास जेव्हा मला भेटायला येतो तेव्हा माझ्या हातातील ते घड्याळ पाहून गहिवरून जातो..आमची मैत्री आणि मैत्रीच प्रतीक असलेले ते घड्याळ आहे असे तात्या सांगतात.

      अधिकारपदावर असलेल्या डीवायएसपी राजाराम पाटील यांना भारी किंमतीचे घड्याळ घेता आले असते,पण आपल्या मित्रांने दिलेल्या अनमोल वस्तूचा विसर पडू नये म्हणून तात्या आजही तेच घड्याळ वापरत आहेत.माजी उपमुख्यमंत्री आर.आर. आबा यांचा भाऊही त्यांच्यासारखाच ग्रेट आहे.

लेखक संपत मोरे यांच्या वॉलवरून साभार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या